Agriculture Equipment Bank : साडेचार हजार फूट उंचावर अवजार बँक उभारणारा रायरी गावातला ‘माउंटन मॅन’

Agriculture Development : इतिहास प्रसिद्ध रायरेश्‍वर पर्वतरांगेतील रायरी गावच्या साडेचार हजार फूट उंचीवर अशोक रामचंद्र जंगम या शेतमजुराने ट्रॅक्टर नेत पंचक्रोशीला आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. या ट्रॅक्टरसोबतच अशोक यांनी उभारलेल्या अवजारे बॅंकेचा म्हणजेच यांत्रिकीकरणाचा लाभ सर्व गावकऱ्यांना होऊ लागला आहे.
Mountain Man
Mountain ManAgrowon
Published on
Updated on

A Bank of Tools : भो र तालुक्यातील साडेचार हजार फूट उंचीवरील रायरी गाव प्रसिद्ध आहे ते रायरेश्‍वरामुळे. येथेच २७ एप्रिल १६४५ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. रायरीवर पिढ्यान् पिढ्या शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांनीच या ऐतिहासिक स्थळाचे जतन केले आहे.

रायरीच्या विशाल पठारावर अनेक संकटांना तोंड देत शेती करणे म्हणजे दिव्यच! येथील तरुण उदरनिर्वाहासाठी शेतीऐवजी मुंबई, पुण्याकडे स्थलांतरित होण्यात धन्यता मानत असतानाच अशोक जंगम मुंबईला रामराम ठोकत पुन्हा रायरीच्या डोंगरावर शेती करत आहेत. अशोकराव सांगतात, ‘‘माझे वडील याच डोंगरावर शेती करत.

मला त्यांनी सातवीपर्यंत शिकवले. इच्छा असूनही पुढे मला शहरात शिकण्यासाठी पाठवणे आर्थिकदृष्ट्या त्यांना शक्य झाले नाही. शाळा सुटली. मी शेती करू लागलो. पण नुसत्या शेतीवर घरखर्च भागेना. त्यामुळे मी रायरीचा डोंगर सोडला आणि थेट मुंबईत गेलो. तेथे मी रेशन दुकानात कामाला लागलो. बांधकामावर मजूर बनलो. परंतु मला सतत गाव आणि शेत आठवायचे. एकेदिवशी साठलेले एक हजार रुपये घेऊन मुंबईतून पुन्हा या डोंगरात शेती कसायला आलो.’’

Mountain Man
Farm Equipment: पारंपरिक ते अद्ययावत शेती अवजारे

अशोकराव हे जंगम असल्यामुळे परिसरामध्ये मिळेल त्या दक्षिणेवर पूजाविधी करण्याचे कामही करू लागले. स्वतःच्या शेतातील कामे उरकली की अन्य शेतकऱ्यांची मजुरीही न लाजता करतात. म्हणजेच एकाच वेळी शेतकरी, पुजारी आणि मजूर अशा तीन भूमिकेत अशोकराव वावरत असतात. ‘‘शेतीकामावरील माझी निष्ठा पाहून एका परिचिताने ट्रॅक्टर घेण्याविषयी सुचवले. या उंच पर्वतावर ट्रॅक्टर आणण्याचे डोक्यात ठेवत सातारा येथील ट्रॅक्टर वितरकाकडून सव्वा सहा लाखाचा ट्रॅक्टर विकत घेतला. त्यासाठी माझी जमीन बॅंकेकडे गहाण टाकावी लागली. जोडीला ९३ हजारांची ट्रॉली, ७० हजारांचे रोटाव्हेटर आणि ४० हजार रुपये गुंतवून नांगर घेतला. त्यामुळे माझी छोटी अवजारे बॅंक तयार झाली,’’ असे अशोकराव म्हणाले.

चक्क डोक्यावर वाहून नेला ट्रॅक्टर

रायरेश्‍वराच्या पायथ्याशी ट्रॅक्टर आणल्यानंतर तो पर्वतावर कसा न्यायचा असा पेच तयार झाला. हा पेच अशोकरावांनी पाठपुरावा करीत सोडवला. त्यांनी या नव्या ट्रॅक्टरचे भाग पूर्णतः सुटे केले. त्यानंतर २० आदिवासी, मित्र व अन्य शेतकऱ्यांच्या मदतीने एकेक भाग डोक्यावर उचलून पर्वतावर वाहून नेला. त्यासाठी संपूर्ण एक दिवस लागला. दुसऱ्या दिवशी अशोकरावांनी ट्रॅक्टर कंपनीशी संपर्क साधला.

Mountain Man
Farmer Success Story : एका गुराख्याचे सीमोल्लंघन

कंपनीला सारी हकिगत सांगितली आणि जोडण्यासाठी कंपनीचे तंत्रज्ञ पाठविण्याची विनंती केली. अशोकरावांची ही जिद्द पाहून पॉवरट्रॅक ट्रॅक्टर कंपनीने दोन तंत्रज्ञ त्यांच्या गावात पाठवले. त्यांनीही दिवसभर मेहनत घेत सर्व सुट्या भागांची पुन्हा जुळणी केली. त्यापासून पुन्हा नवा ट्रॅक्टर उभा केला. विशेष म्हणजे या कामासाठी अशोक यांच्याकडून ट्रॅक्टर कंपनीने एक रुपयाचेही शुल्क घेतले नाही.

पहिल्याच कामाने दिला आत्मविश्‍वास

‘‘या ट्रॅक्टरने माझे भाग्य बदलले. मला पहिले कामच जननीदेवी आणि रायरेश्‍वराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी सामग्री वाहण्याचे मिळाले. त्यापासून ४५ हजार रुपये हाती आल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आता गावातील साऱ्या शेतकऱ्यांना माझा ट्रॅक्टर व अवजारे भाडेतत्त्वावर शेतीकामांसाठी उपलब्ध केली आहेत. भाड्यापोटी मिळालेल्या रकमेतून मी आतापर्यंत १.६५ लाखाचे कर्ज फेडले आहे.

या ट्रॅक्टरच्या व्यवसायातून वर्षाकाठी मला ४० ते ५० हजार रुपये मिळू लागले आहे. त्याची माझ्या उदरनिर्वाहाला जोड मिळत आहेच, पण अन्य शेतकऱ्यांचे कष्ट आधुनिक यंत्रामुळे कमी करण्यात माझा हातभार लागत आहे. याचा आनंद आहे. माझे आयुष्य देणारा हा ट्रॅक्टर आणि अवजारे माझे आयुष्य सुखी बनवत आहेत. ट्रॅक्टर आला तरी या पर्वतावरील मजुरी काम मी सोडलेले नाही. मात्र पर्वतावरील शेती आधुनिक पद्धतीने होत असल्याचा आनंद मिळतो आहे,’’ असे अशोकराव अभिमानाने सांगतात.

कष्टाची कदर व्हावी... आमच्या गावात सर्वजण पारंपरिक साधनांनी शेती करत होतो. मी ट्रॅक्टर आणि अवजारे खरेदी करून यांत्रिकीकरणाकडे पहिले पाऊल टाकले. ट्रॅक्टर व अवजारांसाठी सव्वा लाखाचे अनुदान मिळेल, असे समजल्यामुळे एक वर्षांपासून पाठपुरावा करतोय. मात्र अद्याप अनुदान मिळालेले नाही. माझ्या ट्रॅक्टरने लोकांचे कष्ट कमी झाले असले तरी माझी मजुरी काही अद्याप सुटलेली नाही. सरकारने आमच्या कष्टाची कदर करावी.
अशोक जंगम ९४२१६६०६२९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com