Kharif season 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2023: खरीप हंगामात शेतकरी प्रश्नांच्या चक्रव्यूहात

डॉ. सोमिनाथ घोळवे

Sugarcane Cutting : ऊसतोडणी मजुरांच्या संदर्भातील एका मीटिंगसाठी गुरुवारी नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे गेलो होतो. महामंडळाच्या बसने प्रवास केला. बस वेगाने चालत नसल्याने अंगात आळस येऊ लागला होता.

तेवढ्यात गंगापूर फाट्यावर लालपरीमध्ये एक शेतकरी चढले आणि माझ्या शेजारी येऊन बसले. बसमध्ये पाच-सात मिनिटांनी आमच्यात शेतीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली. चार एकर पैकी दीड एकर बागायती आणि अडीच एकर जिरायती शेती असलेले शेतकरी त्यांच्या अनुभवाच्या आधारे शेतीतील समस्या-अडचणी सांगत होते. मी ऐकून घेत होतो.

मी एक प्रश्न विचारला, " या वर्षीच्या खतं, बी-बियाण्यांचं काय केलं?"

त्यावर शेतकरी म्हणाले, "घेतले नाही, पण काहीतरी करावं लागेल. दर वर्षाला काहीतरी (कर्ज घेऊन किंवा उधारीवर) करत असतो? शेती कुटुंबाला जगवते, म्हणून करण्याची हाय, शेती परवडते का? शेती आणि घराखर्चाला घेतलेले कर्ज दरवर्षी वाढत हाय.

कमी होयला नाव घाईना, दरवर्षी कर्जामध्ये बुडलेलो आहेच. एक्या वर्षी शेती नफ्यात आहे, असं होतं नाही. शेतीचा खर्च देखील भरपूर वाढला आहे. शेती करणं शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर चालली आहे. शेतीपरिस मजुरी चांगली."

मी म्हणालो, ‘‘शेती परवडत नाही? तरीही शेती का करता?''

त्यावर शेतकरी म्हणाले, ‘‘जमीन पडीक ठेवायची का? तसं केलं तर लोक काय म्हणतील?

कुणब्याने शेती पडीक टाकू नये. काळ्या आईची ओटी भरून टाकायची असती. पेरणी करणं काळ्या आईचे देणं हाय. काळी आई देत नाही का? देते ना पण आपल्याला हावं जास्त हाय. काळ्या आईकडून मिळालं तरीही बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्याला काळीआई काय करील...'' असं मला बरंच ऐकवलं. मीही मन लावून ऐकत होतो.

बसस्टँडवर उतरल्यावर माझ्या डोक्यात विचारांचं चक्र चालू झालं. ते असेः शेतकरी-शेतमजुरांचे ह्या दिवसांमध्ये नेमके काय चालू असेल? काय विचार करत असतील? त्यांच्या समोर कोणकोणते प्रश्न निर्माण झाले असतील? त्या प्रश्नांना कसे तोंड देत असतील? म्हत्वाचे म्हणजे खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. या हंगामाच्या पेरणी कशी पूर्ण करायची? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे टाकलेले आहेत.

हवामान विभाग आणि खासगी हवामान तज्ज्ञांच्या विविध अंदाजांमुळे शेतकऱ्यांच्या मनात पावसाबद्दल संभ्रम निर्माण झालाय. एकीकडे पाऊस कमी पडणार, दुष्काळ पडणार असं हवामान विभाग सांगतंय तर दुसरीकडे खासगी हवामान तज्ज्ञांच्या मतानुसार पाऊस चांगला पडणार आहे. नेमका कोणाचा अंदाज खरा मानायचा? कोणता पीक पॅटर्न ठेवायचा? त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक कोठून मिळवायची? असे अनेक प्रश्न आहेत.

पावसाचे दिवस तोंडावर आले आहेत. रोहिणी नक्षत्र चालू आहे, ७ जूनला मृग नक्षत्र चालू झाले. या नक्षत्रात पाऊस चांगला होईल, असा आशावाद शेतकऱ्यांमध्ये असतो. याच नक्षत्रात खरिपाची पेरणी चांगली होईल, अशी आशा ठेवूया. पण पेरणी करण्यासाठी गुंतवणूक करावी लागणाऱ्या भांडवलाचे काय? हा प्रश्न शासन, व्यापारी, राजकीय व्यवस्था यांनी खूपच गंभीर बनवला आहे. गेल्या वर्षाचा पूर्ण आढावा घेतला, तर शेतकऱ्यांची कोंडी लक्षात येईल.

शेतकऱ्यांच्या बाजूने निसर्ग राहिला नाही की शासन राहिले नाही. अतिवृष्टी, गारपीट, रोगराई अशी अनेक संकटे शेतकऱ्यांवर आली. या संकटांत पंचनामे करण्यासाठीही पुढाकार घेतला गेला नाही; मदत मिळण्याचे तर दूरच राहिले. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे बराच शेतमाल वाया गेला.

माळरान आणि रब्बी हंगामात पिकलेल्या शेतमालाला व्यापारी वर्गाने (दलाल, मध्यस्थी) भाव मिळू दिला नाही. तिसरीकडे, शासनाने विविध शेतमाल आयात करून किंवा आयात कर कमी करून बाजारात आवक वाढती राहील, हे पाहिलं. परिणामी शेतकऱ्यांनी शेतमाल जपून ठेवला असला तरी त्याला भाव मिळू दिला नाही.

आजघडीला घरात सांभाळून ठेवलेला कापूस आणि सोयाबीन अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तसेच पडून आहे. शिवाय अतिवृष्टी, पावसाचा खंड, रोगराई आणि गारपीट या कारणांनी शेतमालाचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले, तरीही विमा कंपन्यांनी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे दावे मंजूर केलेले नाहीत.

पूर्वीप्रमाणे शेतीच्या मशागतीसाठी बैलाचा वापर कमी होऊन यंत्राने शेती करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. यंत्राने शेती करायची म्हटले की गुंतवणूक वाढते. त्यासाठी पैसे कोठून आणायचे हा पश्न आहे. बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके दर्जेदार मिळतील का, हाही प्रश्न आहे.

कारण गेल्या तीन वर्षापासून कंपन्यांचे बियाणे बोगस निघाले. त्यांचा दर्जा चांगला नाही. त्यात घरगुती बियाणे वापर चळवळ चालू आहे. पण या चळवळीत बियाणे गेल्या वर्षी कोणत्या तरी कंपनीचे खरेदी करून पेरणी केलेले पकडले असल्याने, या वर्षी पकडलेले बियाणे चांगले वापेल का आणि त्याचा उतार किती राहील, हे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत.

गेली तीन वर्षं सतत अतिवृष्टी आणि गारपीटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अपेक्षित उतारा भेटला नाही. भावही पडलेले. त्यामुळे बँका, खासगी सावकार आणि मायक्रोफायनान्स कडून घेतलेल्या पिककर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही.

शेतकरी कर्जबाजारी आहे. त्यामुळे या संस्था नव्याने शेतकऱ्यांना पीककर्ज देतील, असे दिसून येत नाही. उलट नुतनीकरण करून घ्या, असे बँकेतील अधिकारी वर्ग सांगत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे बँकांचे पीककर्ज पेरणी कालवधीत कधीच मिळत नाही. पेरणी झाल्यानंतर कर्ज वाटपाची प्रकिया चालू होते. तोपर्यंत दुकानदाराची उधारी किंवा खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन पेरणी उरकावी लागणार आहे. शेतकरी-शेतमजूर यांच्या समोर असे कितीतरी प्रश्न उभे राहिलेले आहेत. यातून त्यांना मार्ग काढावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT