गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनात (Agricultural Management) मजूरटंचाईचा (Labor Shortage) चांगला सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील मनस्वप्न महिला गटाने (Women Self Help Group) एकत्र येऊन कंत्राटी पद्धतीने शेतीमधील कामे करण्यास सुरवात केली.
गेल्या बारा वर्षात या गटाने पुरंदर तालुक्यातील तीनशेहून अधिक शेतकरी (Farmer) जोडले आहेत. यातून वर्षभर रोजगाराच्या चांगल्या संधी तयार झाल्या आहेत.
ग्रामीण भागामध्येही कुटुंब आणि शेती विभक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, शेती क्षेत्रात घट होण्यासोबतच घरातील माणसांचा शेतातील राबता कमी होत आहे.
लहान शेतकऱ्यांना मोठी यंत्रे वापरणे परवडत नाही, तर दुसऱ्या बाजूला मजूरटंचाई आहे. ही संधी लक्षात घेऊन सासवड येथील स्वप्नाली टकले यांनी बारा वर्षांपूर्वी गावातील ३० महिलांचा गट तयार केला.
स्वप्नाली टकले यांच्यासोबत विजया निंबाळकर, कल्पना राऊत, सविता चौखंडे, विमल शिवरकर, मंदा म्हेत्रे या जाणत्या महिला पहिल्यांदा एकत्र आल्या.
काही महिला पूर्वीपासून शेतीमध्ये मजुरीचे काम करत असल्या तरी एकटीने जाण्याऐवजी गटाने गेल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, या विचाराने एकत्र आल्या.
शेती कामामध्ये असलेली सर्वांची चिकाटी, काम करण्याची पद्धत, योग्य नियोजन आणि वेळेत काम पूर्ण करण्यामुळे शेतकऱ्यांचा या महिला गटावरील विश्वास वाढत गेला. गटाला मिळणारी कामे आणि योग्य मजुरी पाहता आजही परिसरातील गरजू महिला गटामध्ये सामील होत आहेत.
शेतीकामांची अगोदर नोंदणी :
पुरंदर तालुक्यातील शेतकरी मनस्वप्न महिला गटाला शेती कामाच्या नियोजनानुसार अगोदर मोबाईलवरून संपर्क करून वेळेची चौकशी करतात. त्या वेळी गटाचे दोन ते चार दिवस इतरत्र काम चालू असेल, तर शेतकऱ्यांना पुढील दिवसांतील तारीख दिली जाते.
या वेळी शेतकऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक, कामाचे स्वरूप, वाहतूक व्यवस्था ही माहिती विचारून घेतली जाते. नोंदीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शेतीकामाला जाण्याच्या आदल्या दिवशी गटातर्फे शेतकऱ्याला संपर्क साधला जातो. त्यानुसार वाहतूक आणि शेतीकामाचे नियोजन केले जाते.
नियोजनानुसार गटातील महिला सकाळी १० वाजता सासवडमधील नेताजी चौकामध्ये जमतात. त्याअगोदर गटासाठी शेतकऱ्याने चारचाकी गाडीची वाहतुकीसाठी व्यवस्था केलेली असते.
शेतकऱ्याने सांगितलेल्या कामाच्या स्वरूपानुसार महिला खुरपे, विळा असे आवश्यक साहित्य, जेवणाचा डबा, टोपी, पिशवी सोबत आणतात. काही वेळा शेतकरी स्वतःकडील चार चाकी गाडी घेऊन जातात.
तर काही शेतकरी भाडेतत्वावर गाडी घेऊन गटातील महिलांची ने -आण करण्याची व्यवस्था करतात. एकाच गाडीतून जात असल्याने महिलांनाही सुरक्षित वाटते. काही वेळा शेतकऱ्यास वाहनाची अडचण आल्यास महिला गटातर्फे वाहतुकीसाठी एक गाडी कायमस्वरूपी ठेवलेली आहे.
काटेकोरपणे शेती कामाचे नियोजन ः
गटातील महिला शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यानंतर स्वतःची शेती समजून काम करतात. यामध्ये खुरपणी, वाटाणा काढणी, फुले काढणी, टोमॅटो बांधणी, फळे काढणी, कांदा रोप लागवड, ऊस लागवड, सीताफळ, अंजीर काढणी तसेच पॅकिंग अशी विविध कामे महिला करतात.
ही कामे करताना कोणत्याही प्रकारची टाळाटाळ केली जात नाही. काही ठिकाणी वेळेअभावी काम शिल्लक राहिले तरी ते सर्वानुमते एकत्रित येऊन पूर्ण केले जाते.
काही वेळा काम करताना चुका झाल्यास किंवा शेतकऱ्यांनी शेतीकामातील चुका निदर्शनास आणून दिल्यास त्यामध्ये लगेच सुधारणा केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकप्रकारे विश्वास तयार झाला आहे. त्यामुळे शेतकरी दुसऱ्या वेळेस शेती काम देण्यास कायम तत्पर असतात.
पूर्वीपासून शेतीकामासाठी गावातील महिला जात आहेत. परंतु काही वेळा मजूर महिला शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन अधिक रोजंदारी मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या गटामधील महिला सदस्या यासाठी अपवाद ठरल्या आहेत.
शेतकरी आणि गटाची मजुरीची मागणी याच्या मध्य मार्ग काढून या महिला मजुरी ठरवितात. गेल्या बारा वर्षांपासून हा गट चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. पूर्वी ७० रुपये मजुरी होती आता सर्व महिला गुणवत्तापूर्ण काम करत असल्याने २५० रुपयांपर्यंत मजुरी पोहोचली आहे.
विशेष म्हणजे गटातील महिला कधीही एकमेकांविषयी टीकाटिपण्णी नाहीत. त्यामुळे सर्व महिलांचा एकमेकावर दृढ विश्वास निर्माण झाला आहे. एखाद्यावेळेस एखाद्या महिलेस काही अडचण आल्यास सर्व महिला मदतीला येतात. त्यामुळे महिलांना एकप्रकारे संरक्षण मिळण्यास मदत होते.
गटातर्फे तंत्रज्ञान प्रसार ः
गटातील महिला वर्षभर विविध शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करत असतात. हे काम करत असताना शेतीमधील नवीन तंत्रज्ञान समजून घेतात.
हे तंत्रज्ञान परिसरातील इतर शेतकऱ्यांना देखील या महिला सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढतो. तसेच पीक व्यवस्थापन आणि उत्पादन वाढदेखील मिळाली आहे.
वर्षातून एकदा सहल ः
गटातील महिला दरवर्षी विविध ठिकाणी भेटी देतात. यामध्ये प्रामुख्याने देवदर्शनावर भर आहे. गटाने गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर येथे सहल काढली होती.
त्यानंतर गेल्या आठवड्यात कडेपठार येथे सहल गेली होती. सहलीमुळे महिलांमधील शेतीकामाचा असलेला ताण कमी होऊन एकोपा राहण्यास चांगली मदत होते.
आर्थिक बचतीस प्राधान्य ः
मनस्वप्न महिला गटाच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. एकत्रित येऊन महिलांनी बचत गट स्थापन केला आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हा गट काम करत आहे.
सुरुवातीला गटातील प्रत्येक सदस्या दर महिन्याला शंभर रुपयांची बचत करायची. त्यानंतर ३०० रुपये आणि आता ५०० रुपयांची बचत केली जाते. गटातील महिला मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्य अशा विविध अडचणी सोडविण्यासाठी बचतीतील रकमेचा उपयोग करतात.
संपर्क ः स्वप्नाली टकले, ९५५२७४२३०१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.