Indian Agricultural
Indian Agricultural Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agricultural : शेतकऱ्यांच्या अंतहीन वेदनांची मूक घुसमट

अनंत देशपांडे

Farmer Story : कोणत्याही खेड्यात कधीही जा समोर येणारं चित्र समान आहे. वेदना, वेदना आणि वेदनाच आहेत. शेतकरी कोणत्याही पिकाचा असो त्याचा घाटा ठरलेला, तो कर्जाखाली दबून गेलेला. वीज नाही, असली तर कधीही येते कधीही जाते. त्यामुळे रात्रीअपरात्री जिवावर उदार होऊन राबावे लागते.

पाणी उपलब्ध असूनही देता येत नाही. आली तर वीजपुरवठ्याचा दाब कमी अधिक होत असतो. कारण शहरांना पुरवून शिल्लक राहिलेली आणि साठवता न येणारी वीज शेतीसाठी दिली जाते. बियाणे खात्रीशीर मिळण्याची खात्री नाही.

खतात भेसळ केलेली नसेलच याची गॅरंटी देणार कोण? ऐन मोसमात मजुरांची वानवा, अशा कितीतरी समस्या!

या साऱ्‍या संकटावर मात करून शेतकऱ्‍यांनी कितीही मेहनत घेतली, तरी किती पीक पदरात पडेल, हे त्या वर्षीचा निसर्ग ठरवतो. निसर्गाचे चांगले दान पडून भरभरून पीक पदरात पडले, तर माथेफिरू निर्णय घेणारे आणि शेतीमालाचे भाव पाडायला सरकार टपून बसलेले असते.

सभोवताली अडचणीचे असंख्य डोंगर उभे असलेल्या शेतकऱ्यांनी कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे? गावागावांत शेतकऱ्यांच्या अंतहीन आणि मूक वेदनांची नुसती घुसमट चालू आहे. या घुसमटीतूनच आजपावेतो साडेचार लाख शेतकऱ्‍यांनी आत्महत्यांचा मार्ग पत्करला आहे,

आजही दररोज चाळीस, पन्नास शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य मरण कवटाळत आहेत. त्यांच्या वेदना आम्हाला जाणवतात की नाही, हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. त्यांनी खुशाल झाडाला लटकावे आणि आम्हाला स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे.

नाही दिले तर आम्ही महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारच! या मानसिकतेला काय म्हणावे? सरकार नावाच्या निर्दयी आणि संवेदनशून्य संस्थेबद्दल तर काय बोलावे? प्रत्येक राजकारण्याला सत्तेत स्थान मिळवण्यात आणि टिकवण्यातच रस आहे. सत्ता मिळवण्यालाच ते शेतकऱ्‍यांची सेवा समजतात इतकी निगरगट्ट ही जमात बनली आहे.

परवा अहमदपूर तालुक्यातील थोरल्या वडीचे मोहनराव वलसे नावाचे शेतकरी मित्र भेटले. पूर्वीचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पुढे ते पोलिसात नोकारीला लागले, आता रिटायर झाले. शेतीची प्रचंड आवड आहे.

सिड प्लॉट घेतात, टरबूज लावतात, काकड्या घेतात, म्हशी पाळतात दूध विकतात, नुसता व्याप आणि मनस्ताप! मी म्हणालो, ‘‘कशाला म्हातारपणात व्याप वाढवता आणि मनस्ताप करून घेता? बरं, एवढा व्याप करून काही पदरात पडतं का?’’ म्हणाले, ‘‘काय सांगू आत्तापर्यंत भीत भीत सांगतो पंचवीस लाख तर घातलाव शेतात.

खरा हिशोब लावला तर हा आकडा पन्नास लाख होऊ शकतो. कशाचा कशाला थांग लागत नाही. आता वाटुलालया शेताच्या नादाला लागलो नसतो तर तेवढे पैसे वाचले असते.’’ सांगत होते मी शेतात बटाट्यापासून टोमॅटोपर्यंत अनेक पीक घेतोय, पण एकही पीक असं नाही जे जनावराला खाऊ घालावं लागलं नाही.

वलसे या शेतकऱ्याप्रमाणे रिटायर्ड नोकरदार, नोकरीत, राजकारणात, व्यापारी, गुत्तेदार या क्षेत्रात असलेला एक वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीत पैसे घालतो आहे. गाठीशी शेतीबाहेरून कमावलेले पैसे आहेत, पेन्शन चालू आहे.

वेगवेगळ्या नोकरीत असलेली शेतकऱ्‍यांची मुलं बापा-भावाला पैसे पुरवत आहेत. या शेतकऱ्‍यांना शेतीच्या तोट्याची आच जाणवत नाही. शेतीबाहेरून कमावलेल्या पैशातून ही मंडळी शेतीचा तोटा भरून काढतात.

याच शेतकऱ्‍यांचे बंगले उभे राहताहेत, घरासमोर गाड्या उभ्या राहताहेत. केवळ शेतीवर अवलंबून असणारे, प्रामाणिकपणे काम करणारे शेतकरी प्रचंड दबावात आहेत. त्यांना वाटते की बहुदा आपलंच काही चुकत असलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याकडे यांच्याप्रमाणे काही शिल्लक राहत नसणार?

दुसरे नदीवडीचे शेतकरी भेटले न्यानबा (ज्ञानोबा) पाटील, ते पंचवीस, तीस वर्षांपासून ऊस लावतात. हे जातिवंत शेतकरी, यांना बाहेरून पैसा येत नाही. चुलवण, कलया, वगैरे गूळ करण्याचा सर्व बारदाना अद्ययावत आहे.

आम्दा किती आदनं निघाले पाटील? म्हणाले, नव्वद. गूळ तयार करण्याचा किती खर्च आला? म्हणाले, ‘‘ते काई ईचारू नका. एका आदनात अडीच क्विंटल गूळ निघतोय. दोन ते अडीच हजार भाव हाय. बावीसशे भाव धरला, तर एका आदनाचे पाच ते सहा हजार होतात.

ऊस तोडून त्याचा गूळ करेपर्यंत मजुरी जाते अडीच हजार रुपये. याचा अर्थ केवळ शेवटच्या काढणीच्या मजुरीत पस्तीस ते चाळीस टक्के पैसे जातात. वर्षाच्या खर्चाचा हिशोब लावला तर हाती काही लागत नाही.’’

परवा सोलापूरच्या शेतकऱ्‍याला कांदे विकून खर्च वजा जाता दोन रुपये शिल्लक राहिलेले, ही बातमी ताजी आहे. त्यानंतर बातमी आली एका शेतकऱ्‍याला कांदे विकून १६८८ रुपये पट्टी आली. त्यातील १६८७ खर्चात गेले, वरून १४० रुपये खर्चाचे वेगळे भरावे लागले.

१९८५-८६ ची गोष्ट असेल. मी एक पोतं भेंडी घेऊन लातूरच्या बाजारात गेलो. भेंडी तोडल्यानंतर बाजारात जाण्याचा आणि विक्रीचा खर्च झाला सव्वादोन रुपये, हातात आला दीड रुपया. हे काही आजच चालू आहे, असं नाही. या आणि अशा घटना खेड्यात हरघडी घडत असतात.

सगळ्या देशात पाण्याची सोय, खते, बऱ्‍यापैकी बियाणे, उपलब्ध झाले आणि त्याला वाढत्या आर्थिक उलाढालीची जोड मिळाली. त्यामुळे सर्वच पिकांचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. इकडे सरकार बाजारात हस्तक्षेप करून भाव पाडण्याचे कारस्थान कायमच करत असते.

शेतीबाहेरील पैसे शेतीत ओतणारे शेतकरी असोत की आपल्या सामर्थ्यावर शेती करणारे शेतकरी असोत, त्यांची शेती तोट्यातच आहे. शेतकऱ्‍यांच्या व्यवसायाच्या बाबतीतच असे का घडते? याचं आर्थिक, राजकीय आणि व्यवस्थात्मक विश्लेषण उद्याच्या अंकात पाहूया.

(लेखक शेतकरी संघटना न्यास आंबेठाणचे विश्‍वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT