Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : अनावश्यक कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांवर भडिमार

Fertilizer : कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांवर अनावश्यक कृषी निविष्ठांचा भडिमार होत असल्याचे नांदेड जिल्ह्यात उघड झाले आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांवर अनावश्यक कृषी निविष्ठांचा भडिमार होत असल्याचे नांदेड जिल्ह्यात उघड झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी स्टिंग ऑपरेशन करून धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांचे धन वाचविण्याचा प्रयत्न केला. मुखेड तालुक्यातील शिकारा येथील कपाशी उत्पादकाला अनावश्यक निविष्ठा देऊन त्याच्या उत्पादन खर्चात भर घातल्याचे सिद्ध झाले आहे.

नांदेडला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) म्हणून भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना कपाशी तसेच सोयाबीन पिकासाठी उत्पादन खर्च अधिक असल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना कृषी विक्रेत्यांकडून अनावश्यक तसेच चुकीच्या कृषी निविष्ठांचा वापर करण्यासाठी भडिमार होत असल्याचे दिसून आले.

उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेवटी काही शिल्लक राहत नव्हते. अशा वेळी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढून ते आत्महत्येसारखे पाऊल उचलत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याबाबत भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी ‘चला जाऊ गावाकडे’ या त्यांच्या विस्तार कार्यांतर्गत शेतकरी मार्गदर्शन शिबिरे व व्यसनमुक्ती साखरे कार्यक्रम गावात घेतले.

यातून प्रबोधन होऊन अनेक शेतकऱ्यांनी योग्य कृषी सल्ला घेऊनच कृषी निविष्ठा वापराकडे कल वळविला. परंतु आजही अनेक गावांतील शेतकऱ्यांना अनावश्यक कृषी निविष्ठा पुरवून त्यांचा खर्च वाढविला जात असल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी मंगळवारी (ता. २९) मुखेड तालुक्याचा दौरा केला. या वेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी विलास नारनाळीकर होते. या पार्श्‍वभूमीवर श्री. बऱ्हाटे यांनी स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरविले.

शिकारा (ता. मुखेड) येथील शेतकरी देविदास जाधव यांच्या कपाशीवर रोग पडल्यामुळे ते वाळले जात होते. या कपाशीची पाने घेऊन संबंधित शेतकऱ्याला मुखेडमधील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याकडे पाठविले. त्या विक्रेत्याने नेहमीप्रमाणे देविदास जाधव यांना १६१० रुपयांच्या मोनोक्रोटोफॉस, असिफेट, बोरॉन व हेक्झाकोनोझॉल अशा चार प्रकारच्या निविष्ठा माथी मारल्या. श्री. बऱ्हाटे यांनी कपाशीवरील रोगाचे निदान करण्यासाठी नांदेड कापूस संशोधन केंद्राच्या सहायक प्राध्यापक डॉ. अरविंद पांडागळे यांना कपाशीच्या पानाचा फोटो पाठविला.

डॉ. पांडागळे यांनी कपाशीवर पावडरी मिल्ड्यू (भुरी) रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, यासाठी केवळ एका हेक्झाकोनोझॉल या बुरशीनाशकाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच इतर निविष्ठांची गरज नसल्याचे सांगितले. अनावश्यक कृषी निविष्ठा देऊन त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होत असून, शेतकरी खर्चाच्या ओझ्याखाली गुदमरत असल्यामुळे त्यांनी आवश्यक तेवढ्याच निविष्ठा शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत यासाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेश त्यांनी जिल्ह्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना अनावश्यक निविष्ठा होती थोपविण्यात येत असल्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ असल्याचे सिद्ध होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. परंतु कृषी विषयातील तज्ज्ञांना इतर कामात गुंतवून ठेवल्यामुळे विस्तार कार्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे करोडो रुपये पाण्यात जात आहेत.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Elections : कोल्हापूर जिल्ह्यात दुरंगी आणि तिरंगी लढतीने धुरळा उडणार, बंडखोरांचे आव्हान

Fertilizer Shortage : जळगाव जिल्ह्यात खतांची टंचाई कायम

Organic Farming : पेठमध्ये सेंद्रिय शेतीला मिळतेय चालना

Kharif Paiewari : अकोल्याची सुधारित पैसेवारी ५० च्या आत

Solapur ZP : ‘झेडपी’ स्वनिधीतून तीनशे तेहतीस शेतकऱ्यांना कडबाकुट्टीचा लाभ

SCROLL FOR NEXT