Illegal Agricultural Inputs : गुजरातच्या अवैध निविष्ठांनी ४० टक्के बाजार व्यापला

Agriculture Input Market : मागील दोन महिन्यांपासून खानदेशात गुजरातमधून अवैध कीटकनाशके व खते येत आहेत. दुय्यम दर्जाची ही कीटकनाशके व खते कमी दरात शेतकऱ्यांना दिली जात असून, खानदेशात या अवैध व्यापाराने बाजारातील ४० टक्के व्यवसाय काबीज केला आहे.
Agricultural Inputs
Agricultural InputsAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कापूस बियाण्याचा अवैध काळाबाजार करून अनेकांचे खिसे गरम झाले. आता मागील दोन महिन्यांपासून खानदेशात गुजरातमधून अवैध कीटकनाशके व खते येत आहेत.

दुय्यम दर्जाची ही कीटकनाशके व खते कमी दरात शेतकऱ्यांना दिली जात असून, खानदेशात या अवैध व्यापाराने बाजारातील ४० टक्के व्यवसाय काबीज केला आहे. दरवर्षी १०० कोटी रुपयांवर व्यवसाय अंकलेश्‍वर व लगतच्या कंपन्या अवैध कीटकनाशके, तणनाशके आदींच्या विक्रीतून खानदेशात करीत आहेत.

अवैध कीटकनाशके विक्रीचे केंद्र गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले अंकलेश्‍वर हे शहर आहे. या शहरालगत व शहरात अनेक कीटकनाशके निर्मिती करणारे कारखाने आहेत. राज्यात किंवा खानदेशात कृषी केंद्रांत विविध कंपन्यांची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके बाजारात ज्या दरात मिळतात, त्यापेक्षा ६० ते ७५ टक्के कमी दरात अंकलेश्‍वर येथे कीटकनाशके व तणनाशके, बुरशीनाशके मिळत आहेत. यामुळे खानदेशात अधिकृतपणे कृषी केंद्रांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.

Agricultural Inputs
Agriculture Inputs : विनापरवाना विक्रीप्रकरणी बियाणे कंपनीचा परवाना रद्द

शेतकऱ्यांसाठी वाहने व निवासाची सुविधा

खानदेशातील धुळे, नंदुरबारपर्यंत हा व्यवसाय दोन तीन वर्षे मर्यादित होता. परंतु मागील दोन वर्षांत हा व्यवसाय जळगावातही फोफावला आहे. पुढे बुलडाणा, छत्रपती संभाजीनगरपर्यंत या व्यवसायाचे तार जुडू लागले आहेत. अंकलेश्‍वर व परिसरातील कीटकनाशके उत्पादक, पुरठादारांची मोठी लॉबी आहे.

या लॉबीचे तार खानदेशातील कृषी विभागापर्यंत आहेत. यामुळे कुठेही मोठी कारवाई होत नाही. खानदेशात नंदुरबारातील शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, यावल, जामनेरपर्यंत तेथील कंपन्यांचे हस्तक सक्रिय आहेत.

खानदेशातून अनेक शेतकरी अंकलेश्‍वर येथे गट बनवून मोठ्या प्रवाशी वाहनातून ही कीटकनाशके, तणनाशके खरेदीसाठी जातात. आपल्याकडे शेतकरी आणण्यासाठी मोठ्या वाहनांची व्यवस्थाही अंकलेश्‍वरमधील रॅकेटची मंडळी करते. तसेच तेथे मुक्काम करण्याची वेळ आल्यास निवासस्थानही पुरविले जातात. मोठे सिंडिकेट तेथे तयार झाले आहे.

बिलांतही फसवणूक

अंकलेश्‍वरात कीटकनाशके खरेदी केल्यानंतर तेथील मंडळी जीएसटी क्रमांकाची बिले देते. परंतु हा जीएसटी क्रमांकच अवैध असतो. अर्थात बनावट बिले शेतकऱ्यांना दिली जातात. कमी दर व शेतकऱ्यांमधील भाबडेपणाचा गैरफायदा तेथे घेतला जात आहे.

अधिकचा डोस वापरण्याचा सल्ला

जी कीटकनाशके व तणनाशके शेतकऱ्यांना अंकलेश्‍वरला मिळतात, त्याच्या वापरासंबंधी तेथील मंडळी एक सूत्र लिहून देते. त्यात डोसचे प्रमाण वाढवून लिहून दिले जाते. अर्थात, आपल्याकडे कृषी केंद्रात ज्या किटक किंवा तणनाशकाचा डोस ३० मिलिलिटर असतो, अंकलेश्‍वरमधील तणनाशक किंवा कीटकनाशकासाठी हा डोस ४५ ते ५० मिलिलिटर एवढा लिहून दिला जातो. यामुळे चांगले परिणाम शेतकऱ्यांना आपल्या शेतात संबंधित तणनाशक व कीटकनाशकाच्या वापरानंतर दिसतात. यामुळे हा व्यवसायही फोफावला आहे.

Agricultural Inputs
Bogus Agriculture inputs : अनधिकृत कीडनाशके, खतांबाबत कारवाई शून्य

खानदेशात कृषी विभाग मात्र या बाबत बघ्याची भूमिका घेत आहे. कुठेही ठोस कारवाई केली जात नाही. नाक्यांवर तपासणी केली जात नाही. अवैध कापूस बियाणे जसे मार्च - एप्रिलपासूनच खानदेशात गुजरात व अन्य भागांतून येते, तशीच ही कीटकनाशके व तणनाशकेदेखील गुजरातेतून खानदेशात बिनदिक्कतपणे येत आहेत.

जे नामांकित कंपनीचे कीटकनाशक जळगाव किंवा खानदेशात अधिकृतपणे चार हजार रुपये प्रति लिटर या दरात मिळते, त्याच कीटकनाशकातील घटकांसारखेच बनावट कीटकनाशक अंकलेश्‍वर व तेथील अन्य भागीत ११०० ते १२०० रुपयांस मिळते. अनेक शेतकरी वर्षभर पुरतील एवढी कीटकनाशके, तणनाशके अंकलेश्‍वर किंवा गुजरातमधून आणत असल्याची स्थिती आहे.

एका कंपनीच्या अधिकाऱ्याला कृषी विभागाने केले बेदखल

गुजरातमधील अवैध कीटकनाशके, खते, तणनाशके आदींच्या खानदेशातील अवैध विक्रीमुळे अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायावर खानदेशात मोठा परिणाम झाला आहे. यामुळे कंपन्यांतही खळबळ उडाली आहे.

अवैध कीटकनाशके, त्याचे सिंडिकेट व सर्रास विक्रीचा मुद्दा घेऊन एका नामांकित कंपनीचे खानदेशात नियुक्त अधिकारी जळगाव येथे कृषी विभागात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले. तेथे मात्र या अधिकाऱ्याचे काहीएक फेकून घेण्यात आले नाही.

शेतकरी आणतात, त्यांना चांगला परिणाम आपल्या पिकांबाबत दिसतो, त्यांना कमी दरात तेथे कीटकनाशके, तणनाशके मिळतात, त्यांचा लाभ होत आहे, आम्ही शेतकऱ्यांना कसे थांबवू शकतो, असे उत्तर देऊन कृषी विभागातील अधिकाऱ्याने हा मुद्दा तेथेच थांबविला.

परंतु या अवैध कीटकनाशके, तणनाशकांचे प्रतिकूल परिणाम पुढे दिसतील, जमिनी नापीक बनू शकतील, अशी भीती एका कंपनीच्या अधिकाऱ्याने ‘अॅग्रोवन’शी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बोलताना व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com