शेतकरी नाव : योगेश उत्तमराव दुधाटे
गाव : पांगरी, ता. अर्धापूर, जि. नांदेड.
एकूण क्षेत्र : आठ एकर
हळद क्षेत्र : अडीच एकर
Turmeric Crop : अर्धापूर तालुक्यात पांगरी आणि रोडगी शिवारात योगेश उत्तमराव दुधाटे यांची आठ एकर शेती आहे. त्यात केळी चार एकर, हळद अडीच एकर आणि गहू दीड एकर अशी पिके आहेत. हळद हे वडिलोपार्जित पीक आहे. पूर्वी त्यांच्याकडे सरीमध्ये हळदीची लागवड करीत असत. त्यात बदल करून ११ वर्षापासून योगेश यांनी गादीवाफ्यावर हळदीची लागवड सुरू केली आहे. या वर्षी २२ जून रोजी अडीच एकर क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली.
त्याचे व्यवस्थापन साधारणपणे असे होते.
लागवडीपूर्वी शेताची ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरट करून केली. यानंतर मोगडा फिरवून रोटर करून घेतले. साडेचार फूट अंतरावर बेड तयार केले. यानंतर या बेडवर दोन ओळीतील अंतर एक फूट तर दोन बेण्यातील अंतर पाच ते सहा इंच ठेवले. झिगझॅग पद्धतीने सेलम जातीच्या हळद कंदाची लागवड केली. लागवडीसाठी एकरी साडेनऊ क्विंटल बेणे लागते. त्यातून दरवर्षी एकरी ३० ते ३५ क्विंटल उत्पादन येते. तर हळदीसाठी एकरी ६०-६५ हजार रुपये खर्च येत असल्याचे योगेश यांनी सांगितले.
* लागवडीपूर्वी बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या द्रावणामध्ये बेणे बुडवून घेतले जाते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जमिनीतून येणाऱ्या कीड रोगांना अटकाव होतो.
* लागवडीनंतर ४० दिवसांनी खतांचा बेसल डोस दिला. यात एकरी डीएपी दोन पोते, निंबोळी पेंड एक पोते, अमोनिअम सल्फेट एक पोते, पोटॅश एक पोते, सूक्ष्म अन्नद्रव्ये दहा किलो, दाणेदार कीटकनाशक पाच किलो यांचा समावेश होता.
* लागवडीनंतर १५ दिवसानंतर १६ एमएम चे ड्रीप लॅटरल टाकून सिंचनाची व्यवस्था केली.
* उगवणीनंतर ४५ दिवसांनी ह्युमिक ॲसिड एकरी एक किलो ठिबकद्वारे दिले.
* लागवडीनंतर ९० दिवसांनी खताचा दुसरा डोस दिला. यात १०:२६:२६ एकरी दोन पोते, एक पोते अमोनिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो, पोटॅश एक पोते असे दिले.
* यानंतर बुरशीनाशकाची एक आळवणी केली, तर बुरशीनाशकाची एक फवारणी घेतली. यानंतर फवारणीद्वारे विद्राव्य १२:६१:० दिले.
* लागवडीच्या १२० दिवसानंतर विद्राव्य खते दिली. यात १३:४०:१३ साडेबारा किलो व ०:५२:३४ हे विद्राव्य खत १० किलो यांचा समावेश होता. लागवडीच्या १६० दिवसांनी ०:५२:३४ दिले. यानंतर वीस दिवसांनी पोटॅशयुक्त खते दिली.
यापुढील नियोजन
* सध्या ठिबकद्वारे पाणी सुरू
* १५ फेब्रुवारीनंतर पाणी बंद करण्यात येईल.
* सुप्त अवस्थेत पाला बसल्यानंतर मार्च पहिल्या आठवड्यात हळदीची काढणी सुरू करण्यात येईल.
----
योगेश उत्तमराव दुधाटे : ९७६६२१८४८२
(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.