Dr. Jane Goodall Agrowon
ॲग्रो विशेष

Researcher Dr. Jane Goodall : लोकविलक्षण संशोधक : डॉ. जेन गुडॉल

Team Agrowon

मनीषा उगले

ugalemm@gmail.com

Research on Chimpanzees : मानवाच्या ‘डीएनए’शी चिंपांझींचे ९८.६ टक्के साम्य असल्याचे संशोधनाअंती आढळून आले आहे. माणूस आणि चिंपांझी यांच्यात जैविकदृष्ट्या काही साम्य असू शकते, त्यांचाही मेंदू माणसाप्रमाणे प्रगत होऊ शकतो हा विचार पहिल्यांदा पुढे आला तो जेन गुडॉल यांच्या कामामुळे! त्यांच्या या संशोधनाची जगभर चर्चा आणि प्रशंसा झाली. सुखासीन नागर जीवन जाणीवपूर्वक सोडून अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत, जीवावरचा धोका पत्करून सुमारे पन्नास वर्षे असाधारण परिस्थितीत संशोधनकार्य करणाऱ्या जेन गुडॉल यांचा जीवनपट अतिशय चित्तवेधक आहे.

चार वर्षांची छोटी जेन सकाळपासून हरवली म्हणून तिच्या घरच्यांची शोधाशोध सुरू होती. तिचे आईवडील फारच घाबरले होते. जेन होती तरी कुठे? कोंबडीच्या बुटक्या खुराड्यात ती अंग चोरून चार तासांपासून बसली होती. कोंबडी अंडं कसं देते हे तिला बघायचं होतं. अखेर एकदाचं अंड्याचा जन्म होताना तिने बघितलं आणि ती आनंदाने धावत घरी निघाली. घरी आल्यावर आईला तिने सगळी गंमत सांगितली आणि तिच्या आईने न रागावता ती ऐकूनदेखील घेतली.

लहानगी जेन मुंग्या आणि गांडुळांसारखे किडेमाकोडे आणि लहानसे प्राणी यांच्याशी खेळण्यात रमायची. कधीकधी एखाद्या मेलेल्या प्राण्याची हाडंही ती घरी घेऊन यायची, त्याबद्दल प्रश्न विचारून आईला भंडावून सोडायची. आईसुद्धा न वैतागता आपल्या लेकीच्या प्रश्नांना जमेल तशी उत्तरं द्यायची. तिच्यातली निसर्गाची, प्राण्यांविषयीची आवड आईनेच तर जोपासली होती. जेनच्या दुसऱ्या वाढदिवसाला आईवडिलांनी तिला भेटवस्तू म्हणून चिंपांझी बाळाचा 'टेडी' दिला होता. ते तिचं अत्यंत आवडतं खेळणं होतं. त्यावेळी त्यांनी कल्पना देखील केली नसेल की आपल्या मुलीचं पुढचं अख्खं आयुष्यच चिंपांझींच्या सहवासात जाणार आहे.

तीन एप्रिल १९३४ या दिवशी जेन गुडॉलचा जन्म लंडनमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला निसर्गाची आवड होती. शाळेत जायला आणि अभ्यास करायला तिला फारसं आवडत नव्हतं. तिला प्राण्यांच्या अभ्यासातच जास्त रस होता. पण एके दिवशी आईने तिला समजावलं, मोठेपणी वैज्ञानिक होऊन आवडीच्या क्षेत्रात काम करायचं असेल तर तुला चांगला अभ्यास करून उत्तम गुण मिळवावे लागतील. जेन तेव्हापासून व्यवस्थित अभ्यास करायला लागली. अभ्यास सुरू असतानाच जेनने आपल्या शाळासोबत्यांसाठी 'द एलिगेटर' नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं. त्यात ती जीवजंतू आणि प्राणी यांच्याबद्दल लिहीत असे. तिची आई वेन तिच्यासाठी हे साप्ताहिक टाइप करून द्यायची.

जेनचं शालेय शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तिचे आईवडीलही विभक्त झालेले होते. उच्च शिक्षणासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने सेक्रेटरी ट्रेनिंग स्कूलमधून आपलं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं आणि लंडनच्या एका चित्रपटनिर्मिती संस्थेत नोकरी करायला सुरुवात केली. पण या सगळ्यात तिचं मन रमत नव्हतं. तिला प्राण्यांचा अभ्यास करायचा होता. तशातच एक छान गोष्ट घडली. केनियाच्या एका मैत्रिणीने जेनला आपल्या फार्महाऊसवर राहायला बोलावून घेतलं. वयाच्या तेविसाव्या वर्षी जेनने आफ्रिकेच्या भूमीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्या मुक्कामात तिने जिराफ, झेब्रा आणि हत्तीसारखे प्राणी खुल्या जंगलात फिरताना बघितले. ती खूप रोमांचित झाली होती, कारण यापूर्वी तिने हे कधी बघितलं नव्हतं.

जेन पुढे केनियाची राजधानी नैरोबीला गेली. तिथे राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयात काम करणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. लुईस लिकी यांच्याशी तिची भेट झाली. ते अनेक वर्षांपासून प्राणिशास्त्राचा अभ्यास करत होते. जेनला त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम करण्यासाठी विचारलं, तिने ते आनंदाने स्वीकारलं. काम करताना जेनने मानववंशशास्त्र आणि जीवाश्मशास्त्र या शाखांचं अध्ययन केलं. डॉ. लिकी दाम्पत्यासह तिने ओल्डुवाई गोर्ज या ठिकाणाला भेट दिली. तिथल्या उत्खननातील लाखो वर्षांपूर्वीच्या जीवाश्म आणि हाडांच्या संशोधन कार्यात जेनने लिकींना मदत केली. तिकडून परतताना डॉ. लिकी यांनी तिला टांझानियामधील टांगानिका सरोवराच्या किनारी असलेल्या चिंपांझी समूहांबद्दल माहिती दिली. त्यांचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे असं लिकींचं मत होतं. हा अभ्यास करायला तुला आवडेल का? असं त्यांनी विचारलं तेव्हा जेनच्या आनंदाला पारावार राहिला नाही. हेच तर तिचं स्वप्नं होतं.

पण तिची आर्थिक अडचण मोठी होती. टांझानियातल्या अभ्यासाचा खर्च उचलणारं तिला कोणीतरी पाहिजे होतं. काही महिने वाट पाहिल्यानंतर अखेर विल्की फाउंडेशनने तिला सहा महिन्यांची शिष्यवृत्ती देऊ केली. पण त्यांची एक अट होती, जेनसारख्या तरुण मुलीने आफ्रिकेच्या घनदाट जंगलात एकटीने जायचं नाही. सोबत कुणीतरी जबाबदार व्यक्ती हवी. जेनला सुरुवातीपासून पाठिंबा देणारी तिची आई वेन तिच्यासोबत जायला तयार झाली आणि जेनच्या प्रवासाला हिरवा कंदील मिळाला.

१९६० च्या उन्हाळ्यात अनेक अडचणींवर मात करत अखेर आठशे मैलांचं अंतर पार करून गुडॉल मायलेकी किमोगा येथे पोहोचल्या. तिथून बोटीने प्रवास करत गोम्बे येथील चिंपांझी अभयारण्याच्या दक्षिण हद्दीत त्यांना पोहोचायचं होतं. तिथल्या किनाऱ्यालगत कोळ्यांच्या वस्त्या होत्या. तिथल्या लोकांनी जेन आणि वेनचं उत्साहाने स्वागत केलं. एक मोकळी जागा स्वच्छ करून त्यांनी तिथे तंबू ठोकला आणि आपल्या मुक्कामाची व्यवस्था केली. त्यांच्या मदतीला डॉमिनिक नावाचा स्वयंपाकी होता. गोम्बेतलं घनदाट जंगल, उंचच उंच पर्वत, खोल दऱ्या, हिरवागार निसर्ग, निळेशार पाणी आणि शुद्ध हवा यांनी जेनचं मन मोहून टाकलं. इथल्या परिसरातून मिळणाऱ्या नव्या अनुभवांसाठी ती मोठ्या उत्सुकतेने सज्ज झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT