Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : सणासुदीच्या काळात गाईंच्या दूधदरात पडझड

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : दसरा-दिवाळीच्या काळात गाईंच्या दुधाला मागणी वाढत असतानाही यंदा मात्र त्यात पडझड सुरु आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी मिळणारा ३८ रुपयांचा दर आता थेट २७ रुपयांपर्यंत आला आहे. शनिवारी (ता. ११) काही ठिकाणी २६ रुपये दर मिळाला आहे.

एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ लागली. चारा दर वाढत असताना दुधाचे दर खाली येत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गाईच्या दुधाला किमान ३४ रुपयाचा प्रतिलिटर दर मिळावा म्हणून शासनाने नेमलेल्या समितीसह पशुसंवर्धन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने दूध व्यवसाय पुन्हा अडचणीत येत आहे.

राज्यात दररोज साधारण ३०० खासगी व ७० सहकारी दूध संघांकडून सव्वा दोन कोटी लिटरपर्यंत दुधाचे संकलन केले जाते. याशिवाय राज्याबाहेरील दूध संघही दुधाचे महाराष्ट्रातून संकलन करतात. मागील काही महिने दुधाचे दर पडल्यानंतर साधारण दहा महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाचे दर वाढून ते ३९ रुपयांपर्यंत गेले होते. मात्र पुन्हा दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे कारण पुढे करत सहा महिन्यांपासून दुधाचे दर पाडले जात आहेत.

गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यासाठी शासनाने समिती नेमली. समितीने अभ्यास करून गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये दर देण्याचे निश्चित केले. त्यानुसार दूध संघांनी २१ जुलैपासून ३.५ फॅट व ८.५ ‘एसएनएप’ला ३४ रुपये दर द्यायची घोषणा केली, परंतु वेगळ्या मार्गाने शेतकरी लुट करण्यासाठी रिटर्नचे दर वाढवून ‘एसएनएफ’च्या प्रतिपॉईंटला ३० पैशाऐवजी १ रुपये व फॅटच्या प्रतिपॉईटला २० पैशांऐवजी ५० पैसे कपात सुरु केली. त्याबाबत शेतकऱ्यांत ओरड झाल्यानंतर पुन्हा हे दर पूर्वीप्रमाणे केले. मात्र दुधाचे दरही कमी करून ३२ रुपये केले.

दरम्यान, त्यानंतर टप्प्याटप्प्याने गाईच्या दुधाचे दर कमी केले जात आहेत. दोन महिन्यात, आणि विशेषतः गणेशोत्सव, गौरी, दसरा, दिवाळी सणाच्या काळातही गाईच्या दुधाचे दर २७ रुपये लिटरवर आणले आहेत. विशेष म्हणजे दुधाचे दर पाडून शेतकरी उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु असताना पशुसंवर्धनमंत्र्यासह सगळेच नेते डोळेझाक करत आहेत.

समिती काय करतेय ?

दूध दर निश्चितीबरोबरच पशुखाद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करूनही काहीही उपयोग झालेला नाही. कारण पशुखाद्याच्या दरात वाढ सुरुच आहे. यंदा राज्यातील बहुतांश भागांत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्याचा फटका दुधधंद्याला बसत आहे.

बाजारातून कडबा हद्दपार झाला असून उसासह मका व अन्य चाऱ्याचे दर गेल्या पंधरा दिवसांत वाढले आहेत. पशुखाद्याचे दरातही वरचेर वाढतच आहेत. दुष्काळाने होरपळ सुरू झालेला शेतकरी अडचणीत असताना दूध व्यवसाय पुन्हा उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. असे असताना शासनाची समिती, पशुसंवर्धन विभाग काय करतोय असा प्रश्न दूध उत्पादकांना पडला आहे.

दुष्काळी परिस्थितीने शेतकरी त्रस्त आहे. त्यात दुधाचे दर ठरवून पाडले जात आहेत. सहा महिन्यांत दहा ते अकरा रुपयांनी दर खाली आणले आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आमच्या गावाला महिन्याला साठ लाखांचा फटका सोसावा लागत आहे. सरकारने लक्ष दिले नाही तर दूध व्यवसाय मोडून पडेल.
- भरत फलके, शेतकरी, निमगाव वाघा, ता. नगर, जि. नगर.
सणासुदीच्या काळात दुधाला मागणी असते. मात्र जास्तीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचा कांगावा करत बहुतांश खासगी दूध संघांनी दर कमी केले आहेत. दु्ष्काळाने होरपळ होत असताना दूध धंदा उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शासन आणि शासनाने नियुक्त केलेली समितीही बघ्याची भूमिका घेत आहे. दूध दराबाबत गांभिर्याने न घेतल्यास दिवाळीनंतर किसान सभा आंदोलन उभारेल.
- डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT