Indian Milk Production : Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Production : दूध उत्पादनाचे अर्थशास्त्र मांडा...

डॉ. पराग घोगळे

डॉ. पराग घोगळे

Economics of Milk Production : भारतातील शेतकऱ्यांकडून, दूध उत्पादकांकडून दुधाचे सर्वांत जास्त वार्षिक उत्पादन २३० दशलक्ष टन घेतले जाते. त्याखालोखाल भात (१२९ दशलक्ष टन), गहू (११० दशलक्ष टन), मका (३५.९१ दशलक्ष टन), साखर (३४ दशलक्ष टन) इत्यादी उत्पादने आहेत. जगातील एकूण दूध उत्पादनापैकी २४ टक्के उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक आहे.

२०१४ पासून युरोपीय महासंघ आणि अमेरिकेला मागे सारून भारत दूध उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश बनला. दुग्ध व्यवसायाचा भारतीय अर्थकारणासाठी हातभार लागला आहे. सहकारी तत्त्वावर गावोगावी सुरू झालेल्या या व्यवसायाला आज मोठ्या उद्योगाचे स्वरूप आले आहे.

वार्षिक १५.०४ दशलक्ष टन उत्पादनासह महाराष्ट्र दूध उत्पादनात भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. दूध उद्योगासोबतच पशुखाद्य, सप्लिमेंट्‍स, चारा, औषधे, दूध उद्योगाला लागणारी यंत्रणा, रेतमात्रा इत्यादी अनेक उद्योगांना चालना मिळाली. परंतु दूध उत्पादन वाढीला शासनाकडून आधारभूत विक्री किंमत न मिळाल्यामुळे आणि हे नाशिवंत उत्पादन असल्याने, मिळेल त्या किमतीला विकणे याशिवाय उत्पादकांकडे पर्याय नाही.

कोरोना काळात दूध उत्पादनाला सर्वांत जास्त फटका बसला. या वेळी गायीच्या दुधाचा खरेदी दर १७ ते १८ रुपये प्रति लिटर इतका कमी झाला. त्यानंतर लम्पी स्कीन आणि दरवर्षी येणारा लाळ्या खुरकूत विषाणूजन्य आजारामुळे आर्थिक फटका बसला. सध्या तीव्र उन्हाळा असूनही दूध दर मात्र त्यामानाने वाढलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला जगातील मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन करणारे देश त्यांच्या दुग्धजन्य उत्पादनांना भारतीय बाजारपेठ कधी उपलब्ध होणार, याची वाट पाहत आहेत. अशा वेळी भारतातील दूध व्यवसाय टिकविण्यासाठी आधारभूत किंमत मिळणार का? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा सामना करण्यासाठी भारतीय दूध उत्पादक दुधाच्या उत्पादन दर्जा सुधारणार का? हे प्रमुख प्रश्‍न आहेत.

दुग्ध व्यवसायातील उत्पादन खर्च

गोठा सुरू करताना लागणाऱ्या मूलभूत गोष्टी

जनावरांचा गोठा, चारा यासाठी प्रति १० जनावरे सुमारे १ ते १.५ एकर जमीन लागते.

नवीन गाय विकत आणताना ६० ते ८० हजार खर्च, म्हशीसाठी ८० हजार ते १.३० लाख खर्च येतो.

गोठा उभारणी, जनावरांचे ऊन, पाऊस इत्यादीपासून संरक्षण करण्यासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च.

दूध काढणी यंत्र, चॉफ कटर, फॉगर यंत्रणा, मिल्क कुलरचा खर्च.

दहा गायींच्या गोठ्यासाठी खर्च

दहा जनावरांसाठी एकूण सुमारे १२ ते १५ लाख रुपये भांडवल लागते. यातील निम्मा खर्च हा जनावरे खरेदीसाठी गृहीत धरला जातो.

एकदाच होणारा खर्च

गायींची किंमत : उदा. ७०,००० × १० गायी, यातील ८ दुधामध्ये आणि २ गाभण-भाकड गाई.

गायींचा घसारा : समजा ७० हजार रुपयांना घेतलेली गाय चार वर्षांनी ३० हजार रुपयांना विकली, तर दरवर्षी १० हजार रुपये गाईची घसारा किंमत. म्हणजेच गाईची दर वर्षी कमी होत जाणारी किंमत.

लागणारी जागा : एका गाईला बंदिस्त गोठ्यात ५० ते ७० फूट जागा आणि सुमारे १०० फूट जागा मुक्त गोठ्यामध्ये लागते. यासाठी जमिनीचा खर्च स्वतःची जमीन किंवा भाडे तत्त्वावर.

बांधकामाचा खर्च : गोठ्यातील बांधकामासाठी सुमारे २५० ते ३०० रुपये प्रति चौरस फूट. खुल्या जागेतील बांधकामासाठी १०० रुपये प्रति चौरस फूट खर्च येतो. बांधकामाचे आयुष्यमान २५ ते ३० वर्षे, त्याप्रमाणे दर वर्षी येणारा घसारा १० टक्के.

यंत्रणा आणि रोज लागणाऱ्या वस्तूंचा खर्च : दूध कॅन, चारा कुट्टी यंत्र, वेसण, दूध काढणी यंत्र, शेणाची ट्रॉली, इत्यादी उपकरणांचे आयुष्यमान ८ ते १० वर्षे असते. त्यामुळे दरवर्षी येणारा घसारा २० टक्के.

रोजचा खर्च

खाद्य आणि चाऱ्यावरील खर्च (हिरवा चारा आणि कोरडा चारा या दोन्हींचे समतोल प्रमाण)

मजुरांचा खर्च. घरचे लोक काम करीत असले तरी हा खर्च नोंदवावा.

वीजबिल, पाणीपुरवठा इत्यादीवर होणारा खर्च.

औषध उपचार, कृत्रिम रेतन, पशुतज्ज्ञांसाठी होणारा खर्च.

जनावराचा विमा खर्च (जनावराच्या किमतीच्या ६ टक्के)

उदाहरण : सरासरी ५०० किलो वजन, १५ लिटर दूध देणाऱ्या गायीला ३ टक्के प्रमाणे १५ किलो एकूण ड्राय मॅटर देणे आवश्यक असते. यामध्ये पशुखाद्य ६.५ किलो, कोरडा चारा ५ किलो. हिरवा चारा २२.५ किलो.

शासनाकडून कृषी आधारित उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ठरवताना, येणारा एकूण उत्पादन खर्च, लागणारी जमीन, पाणी इत्यादीची किंमत, बाजारातील विक्री किंमत, मागणी व पुरवठा याचा अभ्यास, मागील काही वर्षांतील किमती, महागाई निर्देशांक, राहणीमानातील बदल, आर्थिक व्यवहार्यता इत्यादींचा अभ्यास करून ठरवली जाते. राज्यातील एक लिटर दुधाचा एकूण उत्पादन खर्च लक्षात घेता सध्याच्या काळात दूध व्यवसायाच्या अर्थकारणाचा अभ्यास करावा. हा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग काढावा लागणार आहे.

प्रति गाय प्रति दिन १५ लिटर दूध उत्पादनासाठी गोठ्यावर येणारा रोजचा खर्च

प्रमाण (किलो) प्रति किलो किंमत (रु.) येणारा एकूण खर्च (रु.)

पशुखाद्य ६.५ ३२ २०८

हिरवा चारा २२.५ ४ ९०

कोरडा चारा ५ १० ५०

मिनरल मिक्स्चर इ. १०० ग्रॅम २०० २०

एकूण खर्च सरासरी ३६८ रु.

प्रति लिटर आहार खर्च २४.५३ रु.

आहाराव्यतिरिक्त येणारा व्यवस्थापन खर्च

व्यवस्थापन खर्च प्रति लिटर खर्चाचे विश्‍लेषण

१) पशुवैद्यकीय औषध-उपचार खर्च/ कृत्रिम रेतन/ जंतनाशक / लसीकरण/ पशुतज्ज्ञ फी /विमा १.२८ रुपये सरासरी ७००० रुपये प्रति गाय/३६५ दिवस = १९.१७ रु. /१५ लिटर = १.२८ रु. प्रति लिटर

२) कामगार खर्च (घरची माणसे गोठ्यात काम करीत असतील तरी हा खर्च पकडावा) २.६६ रुपये १२,००० रुपये प्रति कामगार प्रति महिना/ ३० दिवस = ४०० /१० गायी = ४० रुपये / १५ लिटर दूध =२.६६ रुपये प्रति लिटर.

३) गाय, म्हशींची घसारा रक्कम (दर वर्षी कमी होत जाणारी किंमत) १.८२ रुपये जनावर खरेदी किंमत ७५,००० रुपये. पाच वर्षांनी विक्री किंमत २५,००० रुपये. दर वर्षी कमी होत गेलेली रक्कम १०,००० प्रति जनावर /३६५ दिवस = २७.३९ रुपये / १५ लिटर दूध = १.८२ रुपये.

४) भाकड काळातील खर्च (शेवटचा गाभण काळ) २.३३ रुपये १७५ रुपये प्रति दिन ६० दिवसांसाठी = १०,५०० रुपये / ४५०० लिटर एका वेतनातील दूध (१५ लिटर सरासरी प्रमाणे) = २.३३ रुपये

५) एकूण व्यवस्थापन खर्च / प्रति लिटर ८.०९ रुपये

टीप :  एक लिटर दुधाचा एकूण उत्पादन खर्च = आहार खर्च २४.५३ रुपये + व्यवस्थापन खर्च ८.०९ रुपये = ३२. ६२ रुपये. (दिवसाला १५ लिटर दूध देणाऱ्या गाईसाठी सरासरी खर्च). यातील खर्चाची आकडेवारी संदर्भासाठी आहे. प्रत्येक विभागानुसार अर्थकारण बदलणार आहे,याची नोंद घ्यावी.

यामध्ये कर्ज असेल तर बँकेचा हप्ता व गोठ्याचा बांधकाम खर्च (फिक्स कॉस्ट), इतर मशिनरी व त्याचा घसारा खर्च इत्यादी गृहीत धरलेला नाही. तसेच वासरे व कालवडी, बैल इत्यादींवर होणारा खाद्य व इतर खर्च गृहीत धरलेला नाही.

गोठ्यातील दुधाची प्रति लिटर किंमत ठरविताना यामध्ये आपल्या गोठ्यातील गाई, म्हशींवर होणारा प्रत्यक्ष खर्च गृहीत धरावा. त्यानुसार अर्थकारण मांडावे.

डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९ (लेखक पशू आहारतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT