मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Construction : केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार विभागामार्फत गोदाम निर्मितीवर भर देताना प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येत आहे. गोदाम उभारणीच्या अनुषंगाने गोदाम आधारित पुरवठा साखळीशी निगडीत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध व्यवसायांच्या यादीतील गोदामविषयक व्यवसायास प्राधान्य देण्यात येत असून, जगातील सर्वांत मोठी धान्य साठवणूक योजना असे त्यास नाव देण्यात आले आहे.
यापूर्वी सुमारे ३० पथदर्शक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येऊन आता संपूर्ण तयारीनिशी सदर योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय लक्ष्यांक देण्यात आले आहेत. या संस्थांना नाममात्र व्याजदराने जिल्हा सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक यांच्याद्वारे कर्ज देऊन नाबार्डमार्फत बँकांना पुनर्वित्तसाह्य करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. यामुळे प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी गुणवत्तापूर्ण गोदामाची उभारणी करताना आणि गोदामाचे आयुष्य वाढविण्याच्या अनुषंगाने गुणवत्तापूर्ण बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
बांधकामाची गुणवत्ता
गोदामाचा पाया भरताना प्लिन्थ लेव्हलपर्यंत बांधकाम तयार करतेवेळेस प्लिन्थ पर्यंत मुरूम भरून गोदामाच्या आतील जमीन मजबूत होण्याच्या अनुषंगाने ९५ टक्के प्रॉक्टोर डेन्सिटी टेस्ट करून प्लिन्थवरील जमीन योग्य आणि मजबूत झाल्याची चाचणी करावी. गोदामाच्या आतील जमिनीचे कॉँक्रिटीकरण, गोदामाचे खांब, आडवे खांब, स्लॅब इत्यादी घटकांच्या मजबूत उभारणीसाठी आयएस : ४५६ या गुणवत्तेच्या मानांकनाचे निकष पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सिमेंट काँक्रीट क्यूब तपासणी करावी.
गोदामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्या आयएस : २२६ आणि आयएस : २०६२ या गुणवत्तेच्या मानांकनाचे निकष पूर्ण करणाऱ्या असाव्यात. यात प्रामुख्याने रासायनिक चाचणी (केमिकल टेस्ट), लोखंडाची लवचीकता आणि मजबुतीची क्षमता (यिल्ड ट्रेस) इत्यादी चाचण्या कराव्यात. जेणेकरून लोखंडाच्या सळ्यांची गुणवत्ता समजू शकेल. गोदामाच्या कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या विटांची गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी विटांमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चाचणी आणि बांधकाम केल्यावर त्यावर पाणी मारल्यानंतर बांधकामाच्या वरील थरावर पांढरे मीठ दिसणे या कारणाची तपासणी करण्यासाठी इनफ्लोरोसन्स तपासणी चाचण्या करणे अपेक्षित आहे.
बांधकाम करताना घ्यावयाची काळजी
गोदामाची रचना करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी न घेतल्यास भविष्यात गोदामाच्या विविध भागांचे नुकसान होऊन खर्चात वाढ संभवते. गोदामाच्या भिंतीना आतील व बाहेरील बाजूस वादळी पावसाचे पाणी आणि उन्हामुळे तडे जाऊन भिंती खराब होऊ शकतात. त्यामुळे गोदाम आणखी खराब होऊ नये, आतील साठवणूक केलेले मूल्यवान साहित्य खराब होऊ नये यासाठी वेळोवेळी दुरुस्ती करावी.
गोदामाच्या आतील भागात असणारी जमीन, गोदामाच्या छतावरील व इतर भागातून येणारे पाणी वाहून नेणाऱ्या गटार व्यवस्थेला जाणारे तडे यांना पॉलिसल्फाइड सिलंटचा मुलामा देऊन दुरुस्ती करावी. तसेच त्यावर ओलावारोधक किंवा वॉटरप्रूफ बिटूमिनस पेंट लावण्यात यावा. ड्रेनेजला गेलेल्या तड्यांमुळे अधिक नुकसान झाले असल्यास तो भाग तोडून गवंड्याकडून दुरुस्ती करून नूतनीकरण करावे. रोलिंग शटर्स व व्हेंटीलेटर्स यांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. चांगल्या गुणवत्तेच्या ग्रीसचा वापर रोलिंग शटर्ससाठी करावा. छत शक्यतो अॅसबेसटॉस शीट किंवा गॅल्व्हनाइज्ड शीटचे असावे. या दोन्हींसाठी खालील प्रमाणे पद्धत वापरावी.
छताचा लोखंडी सांगडा तयार करताना त्याची पातळी एकसमान ठेवावी. गोदामाच्या छताचा लोखंडी सांगडा तयार झाल्यानंतर त्यावर पत्रे टाकताना गोदामाच्या डाव्या बाजूने सुरुवात करून उजव्या बाजूला काम संपवावे.गोदामाच्या खालच्या दिशेने सुरुवात करून वरच्या भागांपर्यंत पत्रे बसवावेत. छताला बसविण्यात येणाऱ्या पत्र्याची गडद रंगाची बाजू आकाशाच्या दिशेने असावी. पावसाळ्यात छताची दुरुस्ती करू नये. शक्यतो पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गोदामाच्या आवश्यक दुरुस्त्या कराव्यात.
पत्र्यांना तडे गेले असल्यास ते वापरू नयेत. पत्रे बसविण्यापूर्वी त्याची खडबडीत बाजू पांढऱ्या चुन्याच्या निवळीने धुवून घ्यावी. आठ मिलिमीटर व्यासाचे हूक छताला पत्रे बसविण्यासाठी वापरावेत. तसेच जे (j) बोल्टचा वापर करताना २ मिलिमीटर पेक्षा जास्त व्यासाचे बोल्ट वापरावेत. बोल्ट बसविण्यासाठी पत्र्याला ड्रील मशिनने छिद्रे पाडावीत. पंचिंग मशिनने पाडू नयेत.
भिंतींना वॉटरप्रूफिंग
वातावरणीय बदलामुळे अॅसबेसटॉस शीटला पॅराफीट भिंतीच्या जवळ तडे जातात. त्यामध्ये पाणी शिरून ते भिंतीत मुरण्याचा धोका असतो. त्यामुळे भिंत ओली होऊन गोदामात दमटपणा निर्माण होतो. या दमटपणामुळे गोदामातील धान्याला बुरशी लागते. हे नुकसान टाळण्यासाठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. पॅराफीट भिंत आणि त्यावरील बाजूस पत्रे बसविताना ०.५० मिलिमीटर जाडीचा गॅल्व्हनाइज्ड शीटचा (जी. आय.) पत्रा पॅराफीट भिंतीच्या जाडीच्या रुंदीच्या अर्ध्या भागापर्यंत बसविण्यात यावा. पॅराफीट भिंतीचे जून झालेले सिमेंट प्लास्टर काढावे. वॉटरप्रूफिंग घटक मिसळून पुन्हा नवीन प्लास्टर करावे.
पॅराफीट भिंत आणि गॅल्व्हनाइज्ड शीटचा पत्रा यांचा ज्या ठिकाणी जोड असेल तेथे एपॉक्सी पॉलिमर मॉर्टेर टाकून १०-१२ मिलिमीटर जाडीचा थर देऊन त्यावर सिमेंटच्या पातळ द्रावणाचा थर द्यावा. सुमारे ७ दिवसांपर्यंत हे सिमेंट काम सुकू द्यावे किंवा लवकर सुकण्यासाठी त्यावर इंजिनिअरचा सल्ला घेऊन एक विशिष्ट रंग लावावा. गोदामाच्या आतील बाजूचे ओलाव्यापासून संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रूफ सिमेंट रंग वापरावा.
(माहिती स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
गोदामातील घटकांचे संरक्षण
बऱ्याच वेळेस पुरेशी काळजी घेऊनही गोदाम परिसरातील अंतर्गत रस्ते आणि गोदामाच्या आतील बाजूस धान्य पडून राहते. खराब झालेल्या धान्यामुळे उंदीर, घुशी इतर प्राणी आणि पक्षी यांच्या उपद्रवामुळे गोदाम परिसरात अस्वच्छ वातावरण तयार होते. यामुळे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने पुरेशी काळजी घेणे आवश्यक असते.
परिसरातील अंतर्गत रस्ते
उंदीर व घुशींचा बंदोबस्त करण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला या प्राण्यांनी केलेल्या खड्यामध्ये लोखंडी तारांचे तुकडे, सिमेंट काँक्रीट किंवा बिटूमिनस काँक्रीटमध्ये क्लोरपायरिफॉस आणि काचेचे तुकडे एकत्रित करून भरावेत.
आतल्या बाजूच्या भिंतीस सिमेंटचा मुलामा
सुरुवातीला उंदीर व घूस यांनी केलेल्या खड्ड्यातील माती बाजूला काढावी. या खड्ड्याची दुसरी बाजू शोधून लोखंडी तारांचे तुकडे, सिमेंट काँक्रीट किंवा बिटूमिनस कॉँक्रीटमध्ये क्लोरपायरिफॉस आणि काचेचे तुकडे एकत्रित करून भरावेत. या खड्ड्याची दोन्ही तोंड बंद करावीत.
स्वच्छता आणि देखरेख
रोज गोदामाच्या आतील व बाहेरील भाग स्वच्छ ठेवावा. तसेच अंतर्गत रस्तेसुद्धा स्वच्छ ठेवण्यात यावेत. प्रामुख्याने ठिकठिकाणी सांडलेले धान्य रोजच्या रोज गोळा करावे.
गोदाम व्यवस्थापकाने रोजच्या रोज गोदाम परिसरात गोदाम, रस्ते आणि तेथील स्वच्छता, खड्डे, खराब झालेले धान्य इत्यादींवर वेळोवेळी लक्ष ठेवून गोदामावर काळजीपूर्वक देखरेख करावी. जेणेकरून भविष्यातील नुकसान टाळता येऊ शकेल.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.