
मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Facilities : केंद्र व राज्य सरकार गोदाम उभारणीवर भर देताना प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी पर्यायी बाजारपेठ उभारणीच्या अनुषंगाने गोदाम आधारित पुरवठा साखळीशी निगडित विविध योजनांची निर्मिती करीत आहे. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या गोदाम व्यवसायात डिजिटायझेशनचा अंतर्भाव आणि वैज्ञानिक पद्धतीने गोदामांची उभारणी यावर गोदामधारकाने किंवा गोदाम असणाऱ्या संस्थांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने आगरोधक यंत्रणा, गोदाम परिसरात पाण्याची व्यवस्था, वाहनतळ इत्यादीची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. गोदामाचे आयुष्य वाढविण्याच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
गोदाम परिसरात वाहनतळ
गोदाम क्षमता आणि गोदाम केंद्रात धान्यसाठा घेऊन येणाऱ्या, जाणाऱ्या ट्रकची रोजची वर्दळ यावर गोदामाची वाहनतळ क्षमता आणि वाहनतळ उभारणीसाठी आवश्यक जागा हे घटक अवलंबून असतात. तसेच प्रत्येक शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीमुळे ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण होत असल्याने जर गोदामासाठी वाहनतळाची सुविधा नसेल व गोदामात येणारी वाहने रस्त्यावर उभी करावी लागली तर, वाहतुकीस अडथळा तयार होतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कमीत कमी जागेत एमआयडीसी किंवा महानगरपालिकेच्या नियमानुसार वाहनतळ उभारणे आवश्यक असते.
वाहनाच्या प्रकारानुसार वाहन ठेवण्यासाठी आवश्यक जागा
कार = २.५० x ५.०० मीटर = १२.५० चौरस मीटर
स्कूटर = २.५० x १.२० मीटर = ३.०० चौरस मीटर
सायकल = २.०० x ०.७० मीटर = १.४० चौरस मीटर
ट्रक = ३.७५ x १०.०० मीटर = ३७.५० चौरस मीटर
ट्रेलर ट्रक = ५.०० x २०.०० मीटर = १००.०० चौरस मीटर
ट्रक ठेवण्यासाठी आवश्यक जागा
गोदामाच्या प्रत्येक २०० चौरस मीटर जागेनंतर एक टप्पा ट्रक उभ्या करण्यासाठी मोकळा ठेवण्यात यावा. याकरिता खालील उदाहरणावरून वाहनतळ उभारणीबाबत आपल्याला कल्पना येऊ शकते.
समजा गोदाम उभारणीसाठी जमिनीच्या प्लॉटचे आकारमान १०० x १५० चौरस मीटर म्हणजेच १५००० चौरस मीटर असेल, तर १५००० चौरस मीटरसाठी शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त उपलब्ध एफएसआय ५० टक्के गृहीत धरून १५००० x ०.५ = ७५०० चौरस मीटर जागेत गोदाम बांधकाम होईल.
गोदाम बांधकामाव्यतिरिक्त वाहनतळ उभारणी करताना ट्रक ठेवण्यासाठी आवश्यक जागा = ७५०० चौरस मीटर/२०० = ३७.५० म्हणजेच ३८ ट्रक उभे राहू शकतात.
जर ट्रेलर ट्रक येणार असतील तर याच जागेत जेवढ्या ट्रक उभ्या असतील त्या तुलनेत १०० चौरस मीटरने गणित केले तर सुमारे १४ ट्रक ट्रेलर उभे राहतील.
जर कारखाना असेल तर संपूर्ण जागेच्या किमान १० टक्के जागा वाहनतळासाठी राखीव ठेवावी.
गोदामामध्ये आगरोधक यंत्रणेची सुविधा
गोदामाच्या दोन्ही रोलिंग शटर्सचे अंतर ४५ मीटरपेक्षा जास्त नसावे.
प्रत्येक गोदामाच्या इमारतीसाठी जमिनीखाली ५००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची पाणी साठवणुकीसाठी व्यवस्था करावी. कोणत्याही परिस्थितीत हे पाणी आग विझविण्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी वापरण्यात येऊ नये.
गोदामाच्या प्लॅटफॉर्म जवळच कार्बन डायऑक्साइडच्या बॉटल्स आग विझविण्यासाठी ठेवण्यात याव्यात.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारे साहित्य जसे की कापूस गाठी (५० मिलीमीटर व्यास) जर साठविण्यात येत असतील, तर पाणी फवारण्याच्या यंत्रणा मुख्य पाण्याच्या टाकीपासून गोदामापर्यंत बसविण्यात यावी. त्यासाठी जीआयचा पाइप वापरण्यात यावा.
रोजच्या कामकाजात घ्यावयाची काळजी
गोदामातील अंतर्गत जमिनीवर निष्काळजीपणे साहित्याची आदळआपट केल्याने खड्डे पडू शकतात.
कापूस गाठीचे वजन सुमारे १७० किलो प्रति बेल आणि उंची सुमारे ३ ते ५ मीटर असते. गोदामात पूर्णपणे प्रेस केलेल्या कॉटन बेल ठेवताना त्या गोदामातील जमिनीवर आदळल्यास मोठे खड्डे पडू शकतात. असे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामातील जमिनीवर कॉटन बेल्स उतरविताना त्या रबर टायरवर उतरविण्यात याव्यात. यामुळे जमिनीचे नुकसान होत नाही.
ज्या वेळेस जोराचा वारा सुटतो अथवा वादळ येते त्या वेळेस तत्काळ गोदामाचे सर्व शटर्स बंद करावेत जेणेकरून गोदामात वारा शिरून गोदामाच्या छताचे नुकसान होणार नाही. गोदामातील रोजच्या कामकाजाचा एक भाग म्हणून गोदामाचे समोरासमोरचे शटर हवा खेळती राहण्याच्या अनुषंगाने उघडे ठेवावेत.
गोदामाच्या आतील जमिनीच्या विविध समस्यांवर उपाय
गोदामात विविध प्रकारच्या वस्तू साठविण्यात येतात. त्यामुळे गोदामातील जमिनीवर वारंवार साहित्याची उचल ठेव करण्यामुळे गोदामातील जमिनीची झीज होत असते. या जमिनीच्या झीज होण्याबरोबरच त्याचा परिणाम गोदामातील इतर घटकांच्या नुकसानीमध्ये होतो. यामध्ये जमिनीला भेगा पडणे, सिमेंट काँक्रीटला खड्डे पडणे, सिमेंट प्लास्टरला तडे जाणे, विटांचे नुकसान होणे, रोलिंग शटर्सचे नुकसान होणे आणि व्हेंटिलेटर्सच्या काचा खराब होणे इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. यासाठी मूळच्या बांधकामात विशेष दुरुस्ती करून गोदामाचे आयुष्य वाढविता येते किंवा गोदामाचे बांधकाम करतेवेळी खालील प्रमाणे विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
गोदामाच्या पायाचे बळकटीकरण
गोदामाच्या पायाची निर्मिती करताना प्लिन्थ लेवलपर्यंत कामकाजात पाया भरणीमध्ये कडक मुरूम भरणे आवश्यक असते. प्रत्येक ३० सेंटिमीटर मुरुमाच्या भरतीनंतर ९५ टक्के प्रॉक्टर डेन्सिटीची टेस्ट करावी. त्या निकालाच्या आधारे मुरमाची गोदामाच्या पायात समाधानकारकपणे भरती झाली की नाही हे दिसून येईल.
उंदीर, घुशी गोदामाच्या पायाला पोखरून आत मुरूम पोखरून पायाचे नुकसान करू शकतात. त्यामुळे गोदामाच्या पायात मुरुमाची भर घातल्यानंतर त्यावर १५ सेंटिमीटर जाडीचा चाळलेल्या वाळूचा थर देणे आवश्यक असते. या सर्व कारणांमुळे गोदामाचे बांधकाम करताना वैज्ञानिक पद्धतीनेच गोदाम बांधावे, असा आग्रह वारंवार धरला जातो.
त्यानंतर २५ सेंटिमीटर जाडीचा मोठा व लहान आकाराचा ६५:३५ टक्के प्रमाणात असणाऱ्या मुरुमाचा पुन्हा थर देण्यात यावा.
त्यावर १० सेंटिमीटर जाडीचा M-१० ग्रेडचे पिसीसी काँक्रीटचा थर द्यावा.
त्यानंतर २० सेंटिमीटर जाडीचा ट्रिमिक्स सिमेंट काँक्रीटचा M-२० ग्रेडचा थर व्हॅक्युम डिवॉटरिंग पद्धतीने देण्यात यावा.
कठीणपणा देणारी सिलिकेटची पावडर ४ किलो प्रति चौरस मीटरने घेऊन गोदामाच्या पॅसेज किंवा कॉरिडॉरमध्ये ट्रिमिक्स सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा.
गोदामाची जमीन तयार करताना ट्रिमिक्स सिमेंट काँक्रीटचा थर देताना काँक्रीट प्रसरण पावण्याची शक्यता असल्याने मध्ये जोड ठेवण्यात येऊन त्यात पॉलीसल्फाईडचे सिलन्ट भरण्यात यावे. अशीच प्रक्रिया गोदामाचे प्लॅटफॉर्म तयार करताना करावी.
(माहिती स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
गोदाम तयार झाल्यानंतरची काळजी
गोदामाचा प्लॅटफॉर्म, आतील फ्लोरिंग अति वापरामुळे त्यावर जड वस्तूंची आदळआपट केल्यामुळे खराब होऊ शकतो. त्याला मोठे खड्डे पडू शकतात. असे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामाच्या आतील भागात व्हॅक्यूम ट्रिमिक्स सिमेंट काँक्रीट करताना त्यात हार्डनोट आर्यन पावडर किंवा सिलिकेट पावडर टाकावी. या पावडरचे प्रमाण (कमी/माध्यम/जास्त) त्या गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या साहित्यावर अवलंबून असेल.
बऱ्याच वेळा गोदामात खते साठविल्यामुळे खताच्या गोण्या गोदामाच्या भिंतीला टेकून रचल्या जातात. त्यामुळे खताच्या गोणीतील नायट्रोजनमुळे गोदामाची भिंत, भिंतीचा रंग, सिमेंट आणि विटा यांच्यासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन गोदामाच्या भिंतींचे नुकसान होते.
खताच्या पिशव्या वजनाच्या हिशेबाने एकमेकांवर रचल्या जातात परंतु निष्काळजीपणे ठेवल्याने त्या गोदामाच्या भिंतीला चिकटतात. खतातील रसायनांच्या हायग्रोस्कोपिक प्रक्रियेमुळे सिमेंटचे विघटन होऊन सिमेंट प्लास्टर खराब होते. त्यानंतर विटांचे नुकसान होऊन गोदामाची भिंत कमकुवत होते. हे नुकसान टाळण्यासाठी गोदामाचे आराखडा आणि खर्च बनविताना त्यात ४० ते ५० मिलिमीटर जाड आणि १००० मिलिमीटर उंच पॉलिश केलेली कोटा अथवा शहाबाद फरशी गोदामाच्या भिंतीला बसवावी.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.