PM Narendra Modi  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Narendra Modi : महात्मा गांधींच्या कर्मभूमीतून संकल्पास ऊर्जा मिळते

Team Agrowon

Wardha News : बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २०) केले.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणाले, ‘‘विश्वकर्मा योजना म्हणजे देशात हजारो वर्षांपासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागीदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमूहाची आहे. या समूहातील कारागीर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृद्धीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याचीही ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

आजच्याच दिवशी १९३२ मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले, की विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समूहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पीछेहाट झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कचे ई-भूमिपूजन

अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमुळे तीन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. या भागाच्या औद्योगिक क्रांतीसाठी हे क्रांतिकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांच्या हस्ते वर्धा येथून नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण

पंतप्रधानांनी कळ दाबून राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्‌घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या १ लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र, तसेच १ लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील ७५ हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

विकसित भारतासाठी सरकारचे पूर्ण सहकार्य

बलुतेदार समाज समूहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी पीएम विश्‍वकर्मा योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपूर्ण योगदान देईल, असा विश्वास या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Boar Control : रानडुक्कर नियंत्रणासाठी पर्यावरणस्नेही पद्धती

Vermicompost : अभियांत्रिकी प्राध्यापकाची दर्जेदार गांडूळ खत निर्मिती

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांचा डेटा बेस तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखान्यांना सूचना

Ginger Crop : आले पिकावर ‘कंदकुज’चा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर पिकाला फटका

Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

SCROLL FOR NEXT