Cashew Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard : काजू बागेत खतांसह कीड, रोग व्यवस्थापनावर भर

Team Agrowon

शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : राजाराम महादेव वळंजू

गाव : खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र : ५ एकर

काजू लागवड : दोन एकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे (ता. वैभववाडी) येथे राजाराम वळंजू यांची ५ एकर शेतजमीन आहे. त्यातील दोन एकरांमध्ये त्यांनी १४० काजू झाडांची लागवड केली आहे. त्यात प्रामुख्याने वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातींची लागवड आहे. काजू बागेत सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर दिला जातो. शिवाय वेळोवेळी बागेतील झाडांचे निरिक्षण केले जाते. त्यामुळे बागेतील झाडांवर झालेला कीड-रोगांचा प्रादुर्भाव लक्षात येतो. त्यानुसार व्यवस्थापन करणे सोयीचे होते.

व्यवस्थापनातील बाबी

जून महिन्यात मॉन्सूनचा पाऊस झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात झाडांना सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्या जातील. परंतु या वर्षी पाऊस लांबल्यामुळे जूनच्या अखेरीस झाडांना खते दिली.

सेंद्रिय खत प्रति झाड चार ते पाच किलो प्रमाणे दिले.

त्यानंतर झाडाखाली पडलेला सर्व पालापाचोळा गोळा करून घेतला. गोळा केलेला पालापाचोळा झाडाभोवती चर काढून त्यात टाकून घेतला. झाडाच्या बुंध्यात टाकलेला पालापाचोळा कुजतो. ते झाडांसाठी फायदेशीर ठरते.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत भातपिकांसह विविध कामे सुरू असतात. याशिवाय पावसाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे काजू बागेत कोणतीही कामे करणे शक्य होत नाही. परंतु सप्टेंबरच्या अखेरीनंतर बागेत वाढलेली झाडेझुडुपे तोडून बाग स्वच्छ करण्यावर भर दिला जातो. या वर्षी पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. त्यामुळे काजू बागेत नियोजनानुसार कामे करता आली नाहीत. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पाऊस थांबल्यानंतर संपूर्ण बाग स्वच्छ करून घेण्यात आली.

काजू बागेतील तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर वर्षातून एक वेळ केला जातो. त्यानंतर आलेले गवत ग्रास कटरच्या साह्याने काढले जाते. याशिवाय नोव्हेंबर महिन्यात बागेभोवतीच्या माळरानावर

वाढलेले गवत जाळून घेतले जाते. आणि आगरेषांची आखणी केली जाते. जेणेकरून वणवा लागणार नाही.

दरवर्षी साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात काजू झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. मात्र तुलनेने या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान किरकोळ प्रमाणात पालवी आली होती. आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी पहिली रासायनिक फवारणी घेतली. डिसेंबरमध्ये बऱ्यापैकी पालवी झाडांवर दिसून आली.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर झाडांना चांगली पालवी फुटण्यास सुरुवात झाली. त्यानंतरच्या काळात झाडांना मोहोर आला. परंतु जानेवारी महिन्यात चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस झाला. आलेल्या मोहरावर अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. त्यासाठी शिफारशीनुसार रासायनिक फवारण्या घेतल्या. जेणेकरून मोहोर टिकवून ठेवण्यास मदत होईल.

अवकाळी पावसानंतर जानेवारीच्या अखेरीपर्यंत ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहिली. त्यामुळे काजूवर फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. फुलकीड नियंत्रणासाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली. तसेच वेळोवेळी संपूर्ण काजू बागेचे निरीक्षण करण्यावर भर दिला.

हंगाम लांबण्याची शक्यता

दरवर्षीच्या अनुभवानुसार सुरुवातीच्या टप्प्यात वेंगुर्ला चार या जातीची काजू बी आधी परिपक्व होण्यास सुरुवात होते. त्यानंतर वेंगुर्ला सात या जातीचे काजू बी परिपक्व होते.

सध्या वेंगुर्ला चार जातीच्या काजू झाडांचे काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत त्यांच्या बागेतील काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात होईल. मात्र दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा काजू हंगाम उशिराने सुरु होणार आहे. त्यामागे पालवी येण्यास झालेला विलंब, मोहोर येण्यास सुरुवात झाल्यावर पडलेला अवकाळी पाऊस अशी काही कारणे आहेत. हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम काजू झाडांवर होत असल्याचे राजाराम वळंजू सांगतात.

आगामी नियोजन

सध्या वेंगुर्ला चार जातींच्या काजू झाडांचे काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवसांत ते काढणीयोग्य होण्याचा अंदाज आहे. तर वेंगुर्ला सात या जातीचे काजू बी परिपक्व होण्यास अद्याप पंधरा ते वीस दिवसांचा वेळ लागण्याचा शक्यता आहे.

दरवर्षी झाडावरून खाली जमिनीवर पडलेले काजू बी गोळा करण्याचे काम केले जाते. त्यानंतर बोंडापासून काजू बी वेगळे केले जाते. काढलेले काजू बी स्वच्छ धुऊन त्यास कोवळे ऊन दिले जाते. त्यानंतर व्यवस्थित पॅक करून ठेवले जाते.

या वर्षी काजूचा हंगाम काहीसा उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे हा हंगाम १५ एप्रिलपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे.

हंगाम संपल्यानंतर काजू बागेत पडलेला पालापाचोळा गोळा करून बाग स्वच्छ केली जाते. त्यानंतर गोळा केलेला पालापाचोळा झाडांच्या बुंध्याभोवती कुजण्यासाठी रचून ठेवला जाईल.

राजाराम वळंजू, ९४२०७३९४५७ (शब्दांकन ः एकनाथ पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT