Goat Rearing Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Rearing : उन्हाळ्यात चारा, खाद्य व्यवस्थापनावर भर

Article by Gopal Hage : अकोला जिल्ह्यातील तामशी (ता. बाळापूर) येथील गणेश काळे मागील १० वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत.

 गोपाल हागे

Farmer Management

शेतकरी नियोजन : शेळीपालन

शेतकरी : गणेश जगन्नाथ काळे

गाव : तामशी, ता. बाळापूर, जि. अकोला

एकूण शेळ्या : ७६

शेळीपालनाच अनुभव : १० वर्षे

अकोला जिल्ह्यातील तामशी (ता. बाळापूर) येथील गणेश काळे मागील १० वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. सध्या त्यांच्याकडे उस्मानाबादी आणि बेरारी या जातींच्या सुमारे ७० शेळ्या आहेत. सध्या तापमानात वाढ होत असल्याने शेळ्यांच्या खाद्य, पाणी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जात आहे.

विदर्भात दरवर्षी उन्हाची तीव्रता अधिक असते. यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात शेळ्यांचे व्यवस्थापन काटेकोर करावे लागते.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन :

सध्या दररोज साधारण दोन तासांपर्यंत शेळ्या बाहेर चारण्यासाठी सोडल्या जातात. शेळ्या चरून आल्यानंतर त्यांना साखर, मीठ आणि हळद यांचे मिश्रण केलेले पाणी पाजले जाते.

शेळ्यांना भरपूर आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था केली आहे. तसेच नेहमीप्रमाणे शेळ्यांना २०० ग्रॅम खुराक व हिरवा चारा मुबलक प्रमाणात दिला जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत शेळ्यांना बाहेर सर्व प्रकारचा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होतो. ती उणीव भरून काढण्यासाठी दुपारच्या वेळी शेळ्यांना हिरवा चारा दिला जातो.

वाढत्या उन्हापासून शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी शेडनेट बांधून सावलीची व्यवस्था केली आहे. जेणेकरून वाढत्या तापमानामुळे शेळ्यांवर शारीरिक ताण येणार नाही.

लहान करडांची काळजी :

उन्हाळ्याच्या दिवसांत लहान करडांची विशेष काळजी घ्यावी लागते. लहान करडाना हिरवा लुसलुशीत चारा जास्त प्रमाणात दिला जातो. शिवाय इलेक्ट्रॉलचे पाणी दररोज एक वेळा पिण्यास दिले जाते. जेणेकरून अशक्तपणा येणार नाही. इलेक्ट्रॉलचे पाणी पाजल्यामुळे करडांना उन्हाचा ताण व थकवा येत नाही. मागील १० दिवसांत अशा प्रकारे शेळ्या व करडांचे व्यवस्थापन केले जात आहे. येत्या काळात व्यवस्थापनात अन्य बदल करण्याची आवश्यकता सध्यातरी वाटत नाही.

आरोग्य व्यवस्थापनावर भर :

पुढील १५ दिवसांमध्ये शेळ्या व करडांना ईटी व टीटीचे लसीकरण करण्यात येईल. म्हणजेच आंत्रविषार व धनुर्वात या दोन्ही लसीकरणाचे नियोजन आहे.

सर्वप्रथम शेळ्यांना व करडांना सकाळी उपाशीपोटी जंताचे औषध दिले जाईल. त्यानंतर सतत १० दिवस लिव्हर टॉनिक पाजले जाईल. त्यानंतर संध्याकाळी वातावरण थंड असताना लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल. लसीकरण करीत असताना नेहमीप्रमाणे कोल्ड चेन मेंटेन केली जाईल. यामुळे लसीकरणाचा १०० टक्के फायदा मिळण्यास मदत होते. याच लसीकरणाचा १५ दिवसांनी पुन्हा बूस्टर डोस दिला जाईल. लसीकरण केल्यानंतर पुढील दहा दिवस सुद्धा लिव्हर टॉनिक व मल्टी व्हिटॅमीन देण्यावर भर दिला जाईल. तसेच नेहमीप्रमाणे शेळ्यांना हिरवा चारा आणि पाणी मुबलक प्रमाणात दिला जाईल.

गणेश काळे, ९५२७१५६७४७

(शब्दांकन : गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT