संदीप नवले
Shirur Goat and Sheep Market : नगर जिल्ह्यातील सुपे तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात चराऊ जमीन उपलब्ध आहे. अनेक शेतकरी घोडनदीच्या काठी राहत असल्याने चाऱ्याची उपलब्धता चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या, मेंढ्याचे संगोपन करणे सोयीचे होते.
आर्थिक अडचणीच्या काळात या जनावरांची विक्री केल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येतो. शिरूर येथील बाजार समिती शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. येथे दर शनिवारी बाजार भरतो. त्यादिवशी अडीच ते तीन हजारांपर्यंत जनावरे विक्रीसाठी दाखल होतात. त्यासाठी बाजार समितीत भव्य शेड उभारले आहे.
असे आहे बाजाराचे स्वरूप
शिरूर बाजार समितीचे काम पणन महामंडळाच्या अंतर्गत चालते. त्यामार्फत तळेगाव ढमढेरे, पाबळ, वडगाव रासाई, जांबूत, पिंपळे जगताप येथे उपबाजार भरतात. शिरूर येथील बाजार १९७०-७१ च्या सुमारास सुरू करण्यात आला. लोकप्रियता व विश्वासार्हता वाढू लागल्यानंतर टप्याटप्याने शेळ्या- मेंढ्यांचा बाजार सुरू करण्यात आला.
बाजारात १०० ते १२५ व्यापारी खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. बाजार समितीमार्फत त्यांना खरेदी विक्रीचे परवाना दिले आहेत. बाजार समिती नगर-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. त्यामुळे पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, संगमनेर, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर अशा भागातून मोठ्या प्रमाणात येथे जनावरे येतात.
उस्मानाबादी, संगमनेरी, बीटल, आफ्रिकन बोअर अशी विविधता दिसून येते. सर्वाधिक संख्या उस्मानाबादी शेळ्याची असते. यंदा खरिपात झालेल्या कमी पावसामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी आहे. शेळ्या-मेंढ्याचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बाजारात सध्या त्यांची जास्त आवक दिसून येत आहे.
दर आणि मागणी
बाजारात आल्यानंतर शेतकरी एका ठिकाणी दहा ते पंधरा शेळ्या बांधतात. त्यानंतर उपस्थित असलेले व्यापारी व खरेदीदार यांच्यात समोरासमोर संवाद होतो. उच्चबोलीनुसार दर ठरविण्यात येतो. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार दर निश्चित होतात. पुणे, अलिबाग, रत्नागिरी, सातारा, महाड, महाबळेश्वर, खोपोली, लोणावळा, सासवड, बार्शी, तळेगाव दाभाडे अशा विविध ठिकाणांहून या जनावरांना मोठी मागणी असते.
मेंढ्यांच्या मटणाला असलेली चांगली मागणी ओळखून येथील बाजारात शिरूर तालुक्याच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मेंढ्या विक्रीसाठी येतात. त्यानंतर व्यापारी वजनानुसार दर ठरवितात. साधारणपणे प्रति नग ६ ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळून १२०० ते १५०० मेंढ्यांची खरेदी विक्री होते. शेळ्या-मेंढ्यांना सर्वाधिक मागणी मार्च ते मे या यात्रेच्या काळात तसेच बकरी ईदच्या काळात असते. श्रावण, मार्गशीर्ष महिन्यात ती कमी होते.
शेळ्यांचे दर
जात रुपये (प्रति नग)
उस्मानाबादी ७००० ते १५, ०००
संगमनेरी ७००० ते १४, ०००
बीटल ७००० ते १५०००
आफ्रिकन बोअर ७००० ते २००००
वार्षिक उलाढाल
वर्ष शेळ्या-मेंढ्या आवक उलाढाल (रुपये)
२०२०-२१ १,३२,३७८ १४,३२,७०,५००
२०२१-२२ १,१७,२२१ १९,२५,९६,०३०
२०२२-२३ १,३३,२७९ १९,८२,७१,८५६
चालू आर्थिक वर्षात एक लाख ६१ हजार १०२ शेंळ्या-मेंढ्यांची विक्री झाली. त्या माध्यमातून सुमारे १७ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपयांची उलाढाल झाली. मार्च अखेरीसपर्यत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बाजारातील उपलब्ध सुविधा
बाजारात चोऱ्यांसारखे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ध्वनीक्षेपकावरून वेळोवेळी सूचना दिल्या जातात.
शेतकरी तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा. विश्रांती व भोजनासाठी स्वतंत्र खोल्या.
सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे.
उन्हाळ्यात झाडांद्वारे सावली.
जनावरांसाठी वजनकाटा.
शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी बाजार समितीतर्फे सेवक उपलब्ध.
संरक्षण भिंत. पावसाळ्यात पाणी साचले जाऊ नये याची खबरदारी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.