Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2024 : चांगल्या मॉन्सूनचे आठवे वर्ष

Monsoon Update : मागील सात वर्षे, म्हणजे २०१७ पासून २०२३ पर्यंत सातत्याने, देशावरील मॉन्सूनचा पाऊस सामान्य श्रेणीत, अथवा दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक/उणे १० टक्क्यांत सीमित, राहिला आहे. यंदाचे वर्ष याच मालिकेतील आठवे वर्ष आहे. आपल्या देशासाठी हा एक चांगला काळ होता, असे म्हणायला हरकत नाही.

डॉ. रंजन केळकर

डॉ. रंजन केळकर

Monsoon Forecast : मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचा हिशेब ठेवण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ १ जून ते ३० सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी वापरतात. याचा अर्थ हा लावू नये, की त्याआधीच्या मे महिन्यात किंवा त्यानंतरच्या ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडत नाही. महाराष्ट्र राज्यात मॉन्सूनचा पाऊस १० जूनच्या सुमारास सुरू होतो आणि तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चालतो. तरीही संपूर्ण देशावरील मॉन्सूनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १ जून ते ३० सप्टेंबरचा कालावधी अनेक दृष्टींनी सोयीचा असतो. सप्टेंबर महिना नुकताच संपला आहे आणि यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनचे देशभराचे पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या १०८ टक्के भरले आहे ही एक अत्यंत समाधानाची बाब आहे.

पूर्वानुमान खरे ठरले

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सून येण्याच्या बऱ्याच आधी १५ एप्रिल २०२४ रोजी हे पूर्वानुमान जाहीर केले होते, की यंदाचा मॉन्सून चांगला राहील आणि पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के राहील. त्यानंतर २७ मे २०२४ ला पुन्हा एकदा हवामान विभागाने या पूर्वानुमानाची पुष्टी केली. हवामानशास्त्र विभागाने दिलेले हे दीर्घावधी अंदाज अगदी खरे ठरले आहेत. वर्ष २०२४ मध्ये ‘ला नीना’चा प्रभाव वाढेल अशी शक्यता होती आणि तो भारतीय मॉन्सूनसाठी एक चांगला संकेत होता. ‘ला नीना’ची प्रगती अपेक्षेपेक्षा काहीशी सावकाश झाली तरीसुद्धा ‘ला नीना’ वर्षांत मॉन्सून चांगला राहतो या अनुभवाला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला. प्रशांत महासागरावरील तापमानामध्ये चढ-उतार होत असतो. तापमान सरासरीपेक्षा वाढले तर त्याला ‘एल निनो’ म्हणतात आणि कमी झाले, तर ‘ला नीना’ म्हणतात. ‘एल निनो’ उद्‍भवणे भारतावरील मॉन्सूनसाठी धोक्याची सूचना मानली जाते, पण ‘ला नीना’ हा शुभसंकेत असतो.

केरळवरील मॉन्सूनचे आगमन ३१ मेच्या सुमारास होईल हे हवामान विभागाचे पूर्वानुमानही बरोबर होते, पण मॉन्सूनची पुढची प्रगती अपेक्षित वेगाने झाली नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याची १५ जूनपर्यंत वाट पाहायला लागली. पेरणीच्या वेळी जशा स्वरूपाचा पाऊस लागतो तसा पडला नाही. तरीपण जून महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारली आणि महाराष्ट्रावर चांगला पाऊस सुरू झाला. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तिन्ही महिन्यांत महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यांत पाऊस समाधानकारक राहिला.

१ जून ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान एकंदर महाराष्ट्र राज्यात दीर्घकालीन सरासरीपेक्षा २६ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे, तर कोकणात २६ टक्के, मराठवाड्यात २० टक्के आणि विदर्भात १५ टक्के अधिक झाला. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के जास्त पाऊस पडला, तर धुळे, परभणी, लातूर, जालना अशा अनेक जिल्ह्यांत तो ३० टक्के जास्त पडला.

अतिवृष्टीमुळे नुकसान

१ जून ते ३० सप्टेंबरच्या एकूण पावसाचे आकडे चांगले दिसत असले तरी या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या अनेक घटना शेतकऱ्यांसाठी विपरीत आणि त्रासदायक ठरल्या होत्या. हल्लीच्या काळी अतिवृष्टीच्या घटना

वाढत चाललेल्या आपण पाहत आहोत. वादळी पाऊस, भूस्खलन, पूर, अशांमुळे शेतीचे नुकसान होते आणि पिकांना वाचवायचे प्रयत्न विफल ठरतात. ज्या पाण्याची शेतीला गरज नाही त्याचा निचरा कसा करता येईल, ते साठवून ठेवण्यासाठी काय करता येईल, वादळी वाऱ्यांपासून पिकांचा बचाव कसा करता येईल, अशा गोष्टींवर व्हावा तेवढा विचार केला गेलेला नाही. या बाबतीत संशोधन केले तर उपाय सापडतील. अतिवृष्टीमुळे नुकसान होत असले तरी काही फायदेही असतात. एक तर धरणे लवकर भरतात आणि पावसाळा संपल्यावरही बाकीच्या कोरड्या महिन्यांसाठी धरणात पाणी उपलब्ध राहते. दुसरे हे, की जमिनीत भरपूर ओलावा राहतो जो रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयोगी ठरतो. मागील काही वर्षांत देशातील रब्बी उत्पादन वाढत चालले आहे यामागचे हे एक कारण आहे.

अन्नधान्यांचे वाढते उत्पादन

मागील सात वर्षे, म्हणजे २०१७ पासून २०२३ पर्यंत सातत्याने, देशावरील मॉन्सूनचा पाऊस सामान्य श्रेणीत, अथवा दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक/उणे १० टक्क्यांत सीमित, राहिला आहे. यंदाचे वर्ष याच मालिकेतील आठवे वर्ष आहे. हे देशभरासाठीचे सरासरी चित्र आहे. हे खरे आहे की, काही वर्षी भारतातील काही प्रदेशात पाऊस व्हावा तितका पडलेला नाही, किंवा गरजेपेक्षा अधिक पडलेला आहे. तरीसुद्धा आपल्या शेतीसाठी व अन्न सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या देशासाठी हा एक चांगला काळ होता, असे म्हणायला हरकत नाही. वर्ष २०११ पासून २०१६ पर्यंत भारताचे वार्षिक अन्नधान्य उत्पादन २५०-२६० दशलक्ष मेट्रिक टनाच्या आसपास खोळंबले होते. २०१७ पासून त्याची पुन्हा वाढ होत गेलेली आहे. वर्ष २०१७ मध्ये ते २७५ दशलक्ष मेट्रिक टन झाले, २०१८ मध्ये २८५, २०२० मध्ये २९८, २०२१ मध्ये ३११ आणि २०२३ मध्ये म्हणजे मागील वर्षी त्याने ३३० दशलक्ष मेट्रिक टनांचा आजवरचा उच्चांक गाठला. याचे फार मोठे श्रेय शेतकऱ्यांच्या श्रमाला आणि अपारंपरिक शेतीच्या प्रयत्नांना जाते यात शंका नाही. त्याशिवाय अन्नधान्य उत्पादनातील लक्षणीय वाढीचे आणखी एक कारण म्हणजे मॉन्सूनच्या पावसाने दिलेली साथ आणि त्याविषयीचे हवामानशास्त्रज्ञांनी वेळोवेळी दिलेले अचूक अंदाज, हेही आहे.

परतीचा पाऊस

सप्टेंबरच्या मध्यावर नैर्ऋत्य मॉन्सून माघार घेऊ लागतो. ही माघार पश्‍चिम राजस्थानपासून सुरू होते आणि हळूहळू देशाचे इतर भाग कोरडे पडू लागतात. मात्र जसे मॉन्सूनचे आगमन एका ठरावीक तारखेला अपेक्षित असते तसे किंवा तितक्या काटेकोरपणे त्याची माघार होत नाही. यंदाच्या मॉन्सूनची माघार काहीशा संथ गतीने २३ सप्टेंबरला सुरू झाली आणि अजूनही देशाच्या अनेक भागांत मॉन्सूनचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र राज्यात पुष्कळदा परतणाऱ्या मॉन्सूनचे वारे बाष्प घेऊन येतात आणि त्यामुळे पाऊस पडत राहतो. विशेषतः राज्यातील दक्षिणेकडेच्या जिल्ह्यांत ऑक्टोबरमध्ये पावसाच्या सरी पडत राहतात. हवामानशास्त्रज्ञ नैर्ऋत्य मॉन्सूनच्या पावसाची आकडेवारी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांपुरती संकलित करत असले, तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा गैरसमज करून घेऊ नये, की आता पाऊस संपला आहे. बदलत्या परिस्थितीवर त्यांनी लक्ष ठेवावे आणि त्यानुसार रब्बी हंगामासाठी पिकांची योग्य निवड आणि पेरणीचे नियोजन करावे.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT