मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Electricity : गोदाम आणि शीतगृह निर्मितीचे कृषी पणन क्षेत्रातील महत्त्व आणि शेतीमाल साठवणुकीचे महत्त्व, शेतीमाल साठवणुकीस अर्थसाह्य हा महत्त्वाचा विषय आहे. केंद्र शासनामार्फत सहकार विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पीककर्ज, स्वस्त धान्य दुकान, कृषी निविष्ठा,
धान्य तारण योजना इत्यादी सुविधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जोडलेल्या महाराष्ट्र राज्यातील सुमारे २१,०४४ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी कोणतेही कामकाज न करणाऱ्या संस्था बंद करून नव्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची मार्च २०२५ अखेर निर्मिती करण्यात येणार आहे. देशभरात सुमारे १०,००० प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या बाबतीत अशाप्रकारे घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी जाहीर केलेल्या निर्णयापैकी जगातील सर्वांत मोठ्या धान्य गोदाम साखळीची निर्मिती या विषयाच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेत देशभरातील ३० प्राथमिक कृषी सहकारी संस्थांमार्फत पथदर्शक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित होते. परंतु त्यापैकी ११ राज्यांतील संस्थांच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९,७५० टन क्षमतेच्या गोदामांची निर्मिती पूर्ण झाली असून, यानंतर आणखी १० राज्यात ५९९ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात गोदामांची निर्मिती करण्यात येणार आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्यात सुमारे २५८ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात नवीन गोदामांची निर्मिती करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करताना भांडवल उभारणी व व्याजात सूट याकरिता अर्थसाह्य करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB), राज्य सहकारी बँक (MSCB), राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC), प्रकल्प अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट प्रकल्प (SMART-६० टक्केअनुदान), कृषी पायाभूत निधी (AIF-३ टक्के व्याजात सूट),
कृषी विपणन पायाभूत निधी (AMIF-३३.३३ टक्के अनुदान), बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने अॅग्रिबीड प्लॅटफॉर्म , महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (MCDC), नाफेड (NAFED) व एनसीसीएफ (NCCF) यांच्या संयुक्त सहभागाने अर्थसाह्य, अनुदान आणि बाजारपेठ इत्यादीसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. गोदाम उभारणीच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी तज्ञ यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सहकार्य करणार आहेत.
गोदाम व्यवस्थापन
गोदाम उभारणी करताना वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी अत्यंत आवश्यक आहे. गोदामाला योग्य रंगकाम, वीज नियंत्रक यंत्रणा, इलेक्ट्रिक वायरिंग व विजेची सुविधा असावी.
वीज नियंत्रक यंत्रणा
गोदाम निर्मिती झाल्यावर पावसाळ्यात पडणाऱ्या विजांपासून गोदामाचे संरक्षण करण्यासाठी वीज नियंत्रकाची गोदाम परिसरात सुविधा निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. विजेपासून गोदाम आणि गोदामातील मौल्यवान साठवणूक करण्यात आलेल्या साहित्याचे संरक्षण करण्यासाठी विजरोधक अथवा वीज नियंत्रक यंत्रणा उभारणे अत्यंत आवश्यक असते. सन १७५२ मध्ये बेंजामिन फ्रॅंकलिन या शास्त्रज्ञाने पावसाळ्यात पडणाऱ्या विजेपासून संरक्षण करण्यासाठी वीज नियंत्रक यंत्रणेचा शोध लावला. आजपर्यंत विजेपासून संरक्षण करणारे शाश्वत तंत्रज्ञान म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
गोदाम निर्मितीतील व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून विजेपासून संरक्षण करण्यासाठी वीज नियंत्रक यंत्रणेची उभारणी आवश्यक आहे. वीज नियंत्रक यंत्रणेमध्ये तीन रॉड असलेल्या मॉडेलची उभारणी करण्यात येते. या तीन रॉडमध्ये थेट विजेला विरोध करण्याची क्षमता असते. या तीन रॉडमध्ये अल्टरनेट करंट (A/C), डेटा लाईन आणि नियंत्रक लाइन या तीन वायरिंगचा समावेश असतो. यासोबतच जमिनीतील वीज संरक्षण यंत्रणा असे सर्व मिळून वीज नियंत्रक यंत्रणेची निर्मिती करण्यात येते.
गोदामासाठी वीज पुरवठ्याची तरतूद करताना गोदामाच्या बाजूला एक लोखंडी पोलची उभारणी करून त्यावर तीन रॉडची जोडणी व जमिनीत खड्डा घेऊन त्यात वाळू, खडी, मीठ इत्यादी साहित्य योग्य प्रमाणात टाकून त्यात या तीन रॉडची दुसरी बाजू जोडून खड्डा मातीने झाकून घ्यावा. अशा प्रकारे अर्थिंगची तरतूद करून संपूर्ण वीज नियंत्रक यंत्रणेच्या किमान एक युनिटची तज्ञ इलेक्ट्रिशियनच्या सल्ल्याने उभारणी करावी. पावसाळ्यात वीज पडल्यास या तीन रॉडकडे ती खेचली जाऊन जमिनीत सोडली जाते. त्यामुळे गोदामावर वीज पडण्याचा धोका टळून गोदामाचे संरक्षण होते.
गोदामातील अंतर्गत आणि बाह्यस्तरावरील वीज सुविधा :
गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या धान्याच्या पोत्यांना व्यवस्थित मजबूत शिलाई करणे आवश्यक असते. हे कामकाज काही वेळेस रात्रीच्या सुमारास सुद्धा करावे लागण्याची शक्यता असते. शासनाच्या मालकीच्या गोदामांमध्ये नियमानुसार गोदामाच्या आतील बाजूस आगीपासून साठवणूक करण्यात आलेल्या धान्याला आग लागू नये, यासाठी विजेची सुविधा करण्यास मनाई करण्यात येते.
गोदामाच्या चारही कोपऱ्यात बाहेरील बाजूस पाण्यापासून व वातावरणापासून सुरक्षित राहू शकणाऱ्या वीज खांबांची उभारणी करून परिसरातील रस्ते व गोदाम परिसर रात्रीच्या वेळेस दिसावा, यासाठी वातावरणापासून संरक्षित प्रकाश दिवा लावला जातो. प्रत्येक शटरच्या वरच्या बाजूस एक मोठ्या प्रकाशाचा दिवा लावावा, जेणेकरून शटरसमोरील प्लॅटफॉर्म दिसण्यास मदत होईल. एक आणि अर्धा असे दोन लाइटचे पॉइंट रोलिंग शटरच्या बाजूला वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने बसविण्यात यावेत, जेणेकरून तेथून वीजपुरवठा घेऊन पोत्यांचे वजन, शिलाई यंत्र चालविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.
गोदामाच्या जवळील कार्यालय आणि कॅंटीनमध्ये विजेची सुविधा :
कार्यालय आणि कँटीनच्या इमारतीच्या आतील बाजूस प्रत्येक खोलीत विजेची तरतूद करावी. कँटीन व प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्यात बाहेरच्या बाजूस प्रत्येकी एक वॉटरप्रूफ आणि वातावरणापासून संरक्षित प्रकाश दिवा बसविण्यात यावा.
वीजपुरवठा कमी जास्त होताना होणारी तफावत नियंत्रित करण्यासाठी गोदाम, प्रशासकीय इमारत, कँटीनची इमारत, वाहनतळ आणि वजनकाटा इत्यादीकरिता स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटर सोबत एमसीबी (मिनीएचर सर्किट ब्रेकर) बसवावा. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र मीटरसोबत वीज संरक्षण यंत्रणेची तरतूद करण्यात यावी.
थ्री-फेज वीजपुरवठा :
ज्या गोदामाच्या ठिकाणी सिमेंट, साखर, धान्ये इत्यादी साहित्यांच्या पोत्यांची साठवणूक व हाताळणी ही कॉन्वेयर बेल्टच्या साहाय्याने करण्यात येते, तेथे थ्री-फेज कनेक्शनची आवश्यकता असते.
प्लग-पॉइंट्स :
प्रत्येक शटरच्या बाजूला व प्लॅटफॉर्मच्या जवळ धान्याची पोती शिवण्यासाठी वीजपुरवठ्याची आवश्यकता असते. त्याकरिता प्लग पॉइंटची तरतूद करावी. हे प्लगपॉइंट गोदामाच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूस बसवावेत. या प्लगपॉइंटचे संरक्षण करण्यासाठी त्यास एक जीआय मेटल बॉक्स बसवावा, जेणेकरून आतील भागाची चोरी होणार नाही.
गोदाम परिसरातील अंतर्गत रस्ते, प्लॅटफॉर्म आणि गोदामाच्या इमारतीत होणाऱ्या गर्दीमुळे जमिनीखाली गाडलेल्या इलेक्ट्रिकच्या केबल वारंवार पडणाऱ्या दबावामुळे खराब होण्याची शक्यता असते.
रस्त्याच्या कडेला लावलेल्या अवजड वाहनामुळे जमिनीखालील केबल पावसाळ्यात खराब होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आरसीसी पासून बनविण्यात आलेल्या पाईपमध्ये केबल टाकून जमिनीखाली किमान ६०० ते ९०० मिलिमीटर खोल गाडावी. तसेच आरसीसी पाईपभोवती वाळूचे आवरण अंथरूण त्याच्या संरक्षित थरामुळे पाईप, केबल याचे संरक्षण होते.
(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.