Ecozen's Company : इकोजेन ही क्लीन तंत्रज्ञाननिर्मितीमधील एक प्रमुख कंपनी आहे. कंपनीने हवामान-स्मार्ट तंत्रज्ञान, संसाधने विकसित केली आहेत. या तंत्रज्ञानामुळे पीक उत्पादन वाढ आणि शेतीमालाची नासाडी कमी करण्यास मदत झाली आहे. पंधरा वर्षांच्या अविरत प्रयत्नांतून आयआयटी, खरगपूरच्या तीन पदवीधर युवकांनी ही कल्पना सत्यात उतरवली आहे.
‘इकोजेन’चा आतापर्यंतचा प्रवास आणि संशोधनाच्या आधारे विकसित केलेल्या उत्पादनांविषयी जाणून घेणे, प्रेरणादायी आहे. एखादा स्टार्टअप शून्यातून कसा आकाराला येतो आणि समाजाच्या आर्थिक विकासाला कसा हातभार लावतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इकोजेन.
‘इकोजेन’ची सुरुवात
कॉलेजचा अभ्यास प्रकल्प म्हणून देवेंद्र गुप्ता, प्रतीक सिंघल आणि विवेक पांडे या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी २००९ मध्ये छत्तीसगड येथील शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास केला. तेव्हा असे लक्षात आले, की वेळेवर वीजपुरवठा नसल्याने पिकाला पाणी देण्यासाठी पंप सुरू करणे कटकटीचे आणि खर्चिक आहे.
या तिघांनी त्यावर अभ्यास करून सौर ऊर्जा पंप नियंत्रक तयार केला. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी २०१० मध्ये ‘इकोजेन कंपनी’ची स्थापना करून हे संशोधन शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरेल याबाबत नियोजन केले. आज भारतातील सौर पंप संचामध्ये एक अग्रगण्य ब्रँड म्हणून इकोजेन कंपनी इकोट्रॉन स्मार्ट सोलर पंप कंट्रोलर्सद्वारे सुमारे १,८०,००० हून अधिक भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.
तंत्रज्ञानाचा फायदा
भारतातील पहिल्या ४ जी कनेक्टिव्हिटीसह सक्षम सौर पंप नियंत्रकामुळे शेतकरी आता शाश्वत आणि प्रगत सिंचन तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारू लागला आहे. ‘इकोजेन’चा कंट्रोलर प्रगत तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे. त्यामुळे शेतकरी त्यांची पंप प्रणाली चालू आणि बंद करू शकतात. इकोट्रॉन मोबाइल ॲपद्वारे शेतात न जाता पाणी सोडण्याचे प्रमाण आणि प्रवाह दराचे निरीक्षण करू शकतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही सर्व माहिती कंपनीच्या एआय प्लॅटफॉर्मवर (ecozen.ai) पाठवली जाते. कंपनीचे तज्ज्ञ अभियंते या माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक देखभाल करण्यास आणि गरज पडल्यास सोलार पंप यंत्रणा दुरुस्त करण्यास आवश्यक स्पेअर्स आणि टूल्ससह सेवा देतात. यामुळे सेवेसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो. ही सर्व अचूक माहिती नेहमी सरकारी संस्थांकडे उपलब्ध असते. अशाप्रकारे क्लीनटेक, डेटा, एआय आणि आयओटी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे भारतातील कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यात सरकारला मदत करणे हे ‘इकोजेन’चे उद्दिष्ट आहे.
एकीकडे आयआयटीसारख्या नामवंत संस्थेतून बाहेर पडलेले तज्ज्ञ आणि दुसरीकडे प्रत्यक्ष शेतात जाऊन, शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या सूचनांवर विचार करून कंपनीची पुढची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच कोरोना लॉकडाउनमध्ये त्यांनी संधीत रूपांतर केले. ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही किंवा वर्षातील काही ठरावीक काळासाठीच शेतीमाल साठवायचा आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कंपनीने सोलर कोल्ड रूम भाडेतत्त्वावर देणे सुरू केले, याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
टिकाऊ उत्पादने हेच ध्येय
सौरपंपाबाबत माहिती देताना ‘इकोजेन’चे सहसंस्थापक आणि सीईओ देवेंद्र गुप्ता म्हणाले, की वापरकर्त्यांना अनुकूल अशी टिकाऊ उत्पादने तयार करणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या उत्पादनांद्वारे शेतकऱ्यांना जोडणे आणि त्यांचे काम सुलभ करणे हे महत्त्वाचे आहे. ‘पीएम कुसुम’ योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी ९० टक्के अनुदानित किमतीत सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून दीर्घकाळासाठी शाश्वत पर्याय निवडू शकतात.
महत्त्वाची उत्पादने
इकोट्रॉन सोलर पंप कंट्रोलर सेट
मोड्यूलर सोलर कोल्ड रूम
इकोफ्रॉस्ट उणे तापमानावर चालणारी सोलर कोल्ड रूम
इकोफ्रॉस्ट सोलर फ्रिझर
सोलर कोल्ड रूम
इकोट्रॉन सौर पंपामुळे उत्पादकता आणि उत्पन्न वाढले, तरीही धान्याची नासाडी होण्याची समस्या तशीच होती कारण शेतकऱ्यांकडे काढणीनंतरचे योग्य व्यवस्थापन तंत्र उपलब्ध नव्हते. फळे, फुले, धान्य, भाज्या हा नाशवंत शेतीमाल असल्यामुळे शेतकरी येईल त्या दरात मध्यस्थाला विकून टाकतात. परंतु शेतीमालाची कापणी झाल्यानंतर पहिल्या २ ते ४ तासांमध्ये जर योग्य पद्धतीने शीतगृहात साठवण केली आणि योग्य वेळ येताच विक्री केली तर शेतकऱ्यांचे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होऊन आर्थिक लाभ होतो.
परंतु यामध्ये एक अडचण होती ती म्हणजे शीतगृहासाठी लागणारी वीज आजही शेतावर पोहोचलेली नाही. यावर उपाय म्हणून कंपनीने २०१४- २०१६ मध्ये पाण्यावर चालणारे थर्मल बॅकअप तंत्रज्ञान विकसित केले, जे तीस तासांपर्यंत बॅकअप देते. या तंत्रज्ञानामध्ये वीज न वापरता पाण्याचे रूपांतर बर्फात करून त्याद्वारे रात्रीच्या वेळी तापमान नियंत्रित करून शेतीमाल टिकवून ठेवता येतो. पाण्यावर आधारित थर्मल बॅकअप तंत्रज्ञान वापरून बनवलेली ‘इकोजेन'ची सोलर कोल्ड रूम हा उत्तम पर्याय आहे. कंपनीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाला दहा पेटंट्स मिळाली आहेत. अशाप्रकारे कंपनी व्यावसायिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
मॉड्यूलर सोलर कोल्ड रूम
आपल्या देशात हवामान आणि भौगोलिक परिस्थिती सर्वत्र वेगवेगळी आहे. प्रत्येक शेतकऱ्याची पीक उत्पादनानुसार समस्या वेगळी असते. हे लक्षात घेऊन कंपनीने २०१९ मध्ये मॉड्यूलर सोलर कोल्ड रूम विकसित केली. हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले. आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार शेतकरी हे शीतगृह हलवू शकतात, वापरू शकतात.
देशाच्या कोणत्याही भागातून कुठेही शेतीमाल शेतकरी त्यांच्या सोयीनुसार पाठवू शकतात. कारण शेतीमाल साठवण्याचा किफायतशीर मार्ग त्यांना ‘इकोजेन'ने दिला आहे. साठवणुकीमध्ये शेतीमालानुसार तापमान योग्य ठेवले जाते. कंपनीने अशा पद्धतीने तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रत्येक राज्यात कंपनीने नेमलेले प्रतिनिधी ग्राहकाच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करतात. कंपनीतील कृषितज्ज्ञांची टीम विविध उत्पादनांचा सतत अभ्यास करत असते.
इकोफ्रॉस्ट
इकोफ्रॉस्ट ही उणे तापमानामध्ये कार्यरत असणारी सोलर कोल्ड रूम आहे. हे तंत्रज्ञान मासे, मांस, डेअरी उत्पादने, पल्प, शीतपेये, यांच्या साठवणुकीसाठी विकसित करण्यात आली आहे. कंपनीतर्फे इकोफ्रॉस्ट सोलर फ्रिझर बाजारात येत आहे. यामध्ये डेअरी उत्पादने, मांस, मासे तसेच धान्य साठवून ठेवणे शक्य आहे. व्यापारी आणि दुकानदार यांच्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे.
रवींद्र डोलारे (अध्यक्ष, इकोजेन),
९८३३४१३५२६
www.ecozensolutions.com
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.