Rainy season vegetables  Agrowon
ॲग्रो विशेष

Rainy Vegetables : आहारात घ्या पावसाळी रानभाज्या

Rainy Season Vegetables : पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जात आहेत.

Team Agrowon

डॉ. अंगद गरडे, सौ. अंकिता गरडे (काळे)

भाजीपाला उत्पादनामध्ये जागतिक पातळीवर भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) यांच्या अहवालानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या आहारात ३०० ग्रॅम भाजीपाला असणे गरजेचे आहे. मात्र भारतीयांच्या आहारामध्ये भाज्यांचे प्रमाण १८० ग्रॅम इतके कमी आहे. कृषी क्षेत्रातून भाज्यांच्या उत्पादनामध्येही आपण आघाडीवर असलो, तरी वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पावसाळ्यात आढळणाऱ्या अनेक वनस्पतींचा वापरही करावा लागणार आहे. सामान्यतः तणे म्हणून दुर्लक्षिल्या जाणाऱ्या वनस्पती अर्थात, रानभाज्याही अत्यंत पोषक असून, औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. ही माहितीच नसल्यामुळे शेतकरी शेतातून त्यांना काढून फेकून देतो किंवा जनावरांच्या चाऱ्यामध्ये जातात. मात्र वाघाटी, माठ, तांदुळजा, आघाडा, सुरण, बांबू, कुर्डूची भाजी, नागरमोथा, खाजकुईरी, तरोटा, अंबाडीची भाजी, पाथरीची भाजी अशा अनेक वनस्पतींद्वारे पोषक घटक उपलब्ध होऊ शकते. अनेक व्याधींवर त्या उपयुक्त ठरू शकतात.

वाघाट/वाघेटी (गोविंदफळ) :

शास्त्रीय नाव : कॅप्पारीस झेलानिका (Capparis zeylanica), संस्कृतमध्ये – व्याघ्रनखी

महत्त्व व औषधी गुणधर्म : फळांची भाजी भूक वाढविण्यासाठी व रक्तदोष कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत होते. पोटदुखी व डायरीया, त्वचेच्या विकारावर वाघाटीची पाने अत्यंत उपयुक्त आहेत. क्षयरोगावर (T.B.) वाघाटीची फळ अत्यंत गुणकारी आहेत. नाडीव्रण विकारावर वाघाटीचे तेल अत्यंत गुणकारी आहे. वाघ्याच्या नखांचे विष वाघाट्याच्या पानाने कमी होत असल्याचा दावा केला जातो.

पाककृती : वाघाट्याची भाजी.

तांदुळजा :

शास्त्रीय नाव : Amranthus viridis

महत्त्व व औषधी गुणधर्म : ‘सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असलेली तांदुळजाची भाजी उष्णतेच्या तापामध्ये विशेषतः गोवर, कांजिण्या व तीव्र तापामध्ये उपयुक्त आहे. विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत या विकारांत पथ्यकर म्हणून जरूर वापरावी. उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यांमध्ये उष्णता कमी करण्यास तांदुळजा फार उपयुक्त आहे. डोळ्यांची आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिटकणे या तक्रारीकरिता उपयुक्त आहे.

पाककृती : तांदुळजाची भाजी.

माठ (पांढरी/लाल) :

शास्त्रीय नाव : Amranthus palmeri

महत्त्व व औषधी गुणधर्म : यातून जीवनसत्त्व ‘सी’ आणि ‘इ’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. कर्करोगाशी सामना करण्याची क्षमता या भाजीमध्ये आहे. हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी व त्वचेची जळजळ थांबविण्यासाठी मदत करते. जीवनसत्त्व ‘अ’ जास्त असल्यामुळे डोळ्यांच्या विकारावर परिणामकारक आहे. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी मदत करते.

पाककृती : माठाची भाजी.

आघाडा (शवक/शारमध्या) :

शास्त्रीय नाव : Achvranthes aspera Linn., कुळ : Amaranthaceae.

संस्कृतमध्ये त्याला अपामार्ग म्हणजेच दोषांना दूर करणारा असे म्हणतात.

महत्त्व व औषधी गुणधर्म : झिंक, तांबे, मॅंगेनीज आणि कॅल्शिअम यांचे भरपूर प्रमाण असते. स्थूलपणा घालविण्यासाठी आघाड्याच्या बियांची खीर उपयुक्त आहे. कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होतात. मधुमेही रोग्यांसाठी उत्तम. आघाडा दातांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आघाड्याची राख हे विषमज्वरावरील औषध बनविण्यासाठी

वापरतात. मूत्रविकार, त्वचाविकार व कफ विकारावर आघाड्याचा वापर करतात.

पाककृती : माठाची भाजी.

सुरण :

शास्त्रीय नाव : Amorphophallus camponulotus BE., कुळ : Araceae.

महत्त्व व औषधी गुणधर्म : भूक वाढविण्यासाठी सुरणाची खीर खाल्ली जाते. आयुर्वेदामध्ये मूळव्याधीवर खात्रीशीर उपाय म्हणून सुरणाकडे पाहिले जाते. पचनशक्ती वाढते. कफ व वातदोषावरही सुरण महत्त्वाचे काम करते.

पाककृती : सुरणाची भाजी, सुरणपाक

बांबू :

शास्त्रीय नाव : Bambusa bambos, कुळ : Gramineae.

महत्त्व व औषधी गुणधर्म : अंगात कडकी मुरली असेल तर दूध व खडी साखरेबरोबर अर्धा ग्रॅम वंशलोचन (वेळू) घ्यावे. एक आठवड्यात कडकी कमी होते. सुक्या खोकल्यावर गुणकारी. शक्ती देणारे उत्तम औषध. सितोपलादी चूर्ण हे क्षय, जीर्णज्वर, खोकला वगैरेवर उत्तम औषध आहे. लघवी साफ न होणे, दाह होणे (आग होणे) हे विकार वंशलोचनाने बरे होतात.

पाककृती : बांबूची भाजी, वंशलोचन, चूर्ण.

कुर्डू (त्रासदायक तण) :

शास्त्रीय नाव : Celosia argentea Linn., कुळ : Amaranthaceae.

महत्त्व व औषधी गुणधर्म : मूतखड्यावर गुणकारी. कोवळ्या पानाची भाजी करतात. पाल्याची भाजी झोप येण्यासाठी करतात. कुर्डूच्या बिया पौष्टिक व शीतल असतात.

पाककृती : कुर्डूची भाजी.

नागरमोथा : शास्त्रीय नाव : Cyperus rotandus linn. मोथा, (Cyperus scarioscus R.Br.) नागरमोथा, कुळ : Cyperaceae.

महत्त्व व औषधी गुणधर्म : नागरमोथ्यापासून सुवासिक तेल मिळवतात. मुळाचा काढा ज्वरावर उपयुक्त आहे. ताजे कंद बाळंतिणीचे दूध वाढवितात. उदबत्ती, हीना व सुगंधी तेल, साबण व सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचा उपयोग करतात.

खाजकुईरी (गरिबांचा बदाम) :

शास्त्रीय नाव : Macuna prurita Hock, Macuna pruriens Bak D.C., कुळ : Papilionaceae.

महत्त्व व औषधी गुणधर्म : अशक्तपणामध्ये खाजकुईरी बियांचे चूर्ण दररोज अल्प प्रमाणात घेतल्यास खूप फायदा होतो. मनोरुग्णामध्ये चांगली सुधारणा होते. आंत्रविकार व गर्भाशयाच्या विकारावर वापरतात. हत्तीरोगावर मुळ्याच्या लेपाचा उपयोग केल्यास फायदा होतो. वातविकारासाठी फायदेशीर. काम, मेधा, कांती, बल यांची वाढ करते. श्‍वसन, पांडूरोग, राजयक्ष्मा, कास उसण, सूज, मेद, वायू, धातूक्षय, कंड बहूमूत्र यासाठी खाजकुईरी पाक उपयुक्त आहे.

टीप : या वेलीच्या शेंगेवरील केस चुकून जरी अंगाला लागले तरी सर्वांगाला खाज सुटते म्हणून या वेलीला खाजकुईरी असे म्हणतात. मात्र या शेंगेच्या आतील बिया अतिशय पौष्टिक असतात.

पाथरी :

शास्त्रीय नाव : Launaea procumbens, कुळ : Asteraceae.

महत्त्व व औषधी गुणधर्म : ही वनस्पती शीतल, कडू, गुणांची आहे. या भाजीच्या सेवनामुळे स्तनदा स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. या वनस्पतीचे चाटण सुक्या खोकल्यात गुणकारी आहे. जनावरांना पाथरीचे गवत खायला दिले, तर दुधामध्ये वाढ होते. जुने त्वचारोग, पचन प्रक्रिया सुधारणा, कावीळ, यकृत व पित्त यासाठी ही भाजी गुणकारी आहे.

पाककृती : पाथरीची भाजी.

तरोटा :

शास्त्रीय नाव : Cassia tora

महत्त्व व औषधी गुणधर्म : तरोट्याचे सेवन केल्यास कफ, कृमी, दमा, ज्वर, मधुमेह, खोकला आदी आजारांपासून सुटका होते. कुष्ठरोगासाठी उपयुक्त. शरीरातील सुस्ती घालवून रक्ताची वाढ करते. तरोट्याची भाजी पौष्टिक व वातनाशक असते. प्रसूतीनंतर तरोट्याची भाजी करून स्त्रियांना खायला देतात.

पाककृती : कोवळ्या पानांची भाजी करतात.

अंबाडी :

शास्त्रीय नाव : Hibiscus cannabinus,

संस्कृतमध्ये अन्वष्टा असे म्हणतात.

महत्त्व व औषधी गुणधर्म : अंबाडीमध्ये टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल (THC) या रसायनाचे प्रमाण जास्त असते. ओमेगा -३ व ओमेगा-६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात. लोह, जीवनसत्त्व ‘सी’, जीवनसत्त्व ‘अ’, जीवनसत्त्व ‘ब६’, फोलेट, कॅल्शिअम, झिंक आणि ॲन्टीऑक्सिडेन्ट अशी पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढवते. कोलेस्टेरॉल प्रमाण कमी करते. रक्तदाब नियंत्रित ठेवते. तंतुमय पदार्थांचे चांगला स्रोत असून, तो वजन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. महिलांच्या आरोग्यासाठी विशेषतः मासिक पाळीदरम्यान वेदना कमी करणे, अति रक्तस्राव रोखणे यासाठी उपयुक्त. मासिक पाळीदरम्यान नियमित कालावधीसाठी अंबाडी चहाच्या स्वरूपात वापरल्यास फायदा होतो. होमोसिस्टीन पातळी नियंत्रित करते. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. पोट शांत ठेवायला मदत करते. केसांच्या, डोळ्यांच्या आरोग्यासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे. हिमोग्लोबिन वाढवते.

पाककृती : अंबाडीची भाजी, अंबाडीचा चहा.

डॉ. अंगद गरडे, ८४०८८३८४५०

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, खरपुडी, जालना)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT