Pune News : मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ११ लाख ६७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांसह राज्यातील महत्वाचे नेते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बांधावर पोहचले आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागातील पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.
७२ तासांच्या आत पंचनामेच : कृषिमंत्री
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा बुधवारी (ता.४) दौरा केला. यावेळी मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ७२ तासाच्या आत पिक विमा कंपन्यांना माहिती देण्यासाठी ऑफलाईन सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनास केल्याची माहिती दिली. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अनेक ठिकाणी नेटवर्क नाही. त्यामुळे मंगळवारीच (ता.३) छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना पंचनाम्यासह ७२ तासाच्या आत पिक विमा कंपन्यांना माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
५ आणि ५० रूपयांचे चेक देऊ नका : आदित्य ठाकरे
यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील बुधवारी (ता. ४) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करताना, अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत देणे गरजेचे आहे. पंचनामे होतील. पण मागच्या प्रमाणे ५ आणि ५० रूपयांचे चेक देऊ नका, असा सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारचे कोणीही शेतकऱ्यांसोबत उभं नाही. आता राज्याला कृषिमंत्र्यांचे नाव देखील माहित नसल्याची, टीका आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली आहे.
तातडीने पंचनामे करा : महाजन
नांदेड जिल्ह्यातही सर्वदूर अतिवृष्टी झाली असून यामुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाऊस थांबताच प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.
सत्तारांची बाधित गावांना भेटी
हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाने कहर केला असून पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी हिंगोलीचे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पावसाने बाधित झालेल्या गावांना भेटी देण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सोडेगाव, धोंगरदाव पूल आणि सावरखेडा येथे जाऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामे लवकर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
तातडीने मदत करावी -अमित देशमुख
कांग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी प्रशासनाने अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
अशोक चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावर
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बुद्रुक) व (खुर्द) या गावात जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. तसेच पूरस्थितीमधील नुकसानीबाबत हजर असलेल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.