Pune News : मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतीसह सर्वसामान्यांना बसला आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, धाराशिव, जालन्याला पावसाचा तडाखा बसला आहे. तर विदर्भातील यवतमाळबरोबरच खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. यावरून नुकसानग्रस्त जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.३) दिले आहेत.
विदर्भासह खानदेश आणि विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे घरांची पडझड आणि पिकांसह पशुधनाची हानी झाली आहे. त्यामुळे सर्व बाबींची माहिती घेऊन त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच पाऊस, पुरस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांमधील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, नुकसानीचे पंचनामे आणि माहिती वेळोवेळी ताबडतोब शासनाला सादर करावी अशाही सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
त्याचबरोबर नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू ठेवण्यासह मदत आणि पुनर्वसनाचे कार्य सुरू ठेवावे, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास केल्या आहेत. तर शिंदे यांनी, सध्याच्या स्थितीत विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करावे असेही आदेश दिले आहेत. तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेल्या लोकांसाठी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवाऱ्यासह कपडे, अन्न शुद्ध पाणी, औषधांचा पुरवठा ताबडतोब करण्यात यावा, असेही निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मराठवाड्यात पिकांचे नुकसान
मराठवाड्यातील जिल्ह्यांना गेल्या चार दिवसात पावसाने चांगलंच झोडपलं. अतिवृष्टीमुळे वित्त आणि जीवित हानी झाली असून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत पावसामुळे ११ लाख ६७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात १० जणांचा मृत्यू झाला असून एक हजारहून अधिक घरांची पडझड झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरिपाच्या शेतीला मोठा फटका बसला.
नांदेड जिल्ह्यात ४८ हजार ६७७ शेतकरी बाधित झाले असून येथील २ लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ५ लाख हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली असून येथे क्रमश: पाच हजार ६८० आणि सात हजार २७२ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. खानदेशातही अंदाजे ३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून कापूस, उडीद, मूग पिके हातची गेली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.