Mumbai News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर देणार असल्याचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत मंगळवारी (ता. २) केले. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी साठा शिल्लक असल्याने प्रतिकिलो ३० रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याचेही विखे पाटील यांनी जाहीर केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर पडल्याने दुधाच्या दरात मोठी पडझड झाली होती. गेल्या एक वर्षापासून गायीच्या दूधदराचा प्रश्न ऐरणीवर होता. दुधाचे दर पडल्याने राज्य सरकारने पाच रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र त्यासाठी दूध संघांनी प्रतिलिटर किमान रक्कम द्यावी, अशी अट घातली होती. त्यामुळे काही संघांनी पळवाट काढत किमान रक्कम कमी केली होती. परिणामी, शेतकऱ्यांना अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे सरकारने आता ३० रुपये प्रतिलिटर दूध दर देणे बंधनकारक केले आहे.
या बाबत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदन केले. जुलैपासून देण्यात येणारे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळणार असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
विखे पाटील म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाच्या भुकटी आणि लोण्याचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदीवर झाला आहे.
ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने अर्थ संकल्पात पाच रुपये अनुदान वाटपाच्या योजनेला मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी, सहकारी दूध संस्था, तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. शेतकऱ्यांची मागणी विचारात घेता, प्रतिलिटर ३० रुपये भाव शेतकऱ्यांना द्यावा, असे या बैठकीत ठरले. सरकार पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. जेणेकरून ३५ रुपये प्रतिलिटर दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरीच्या दरावर परिणाम झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. या बाबत उपाययोजना म्हणून राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील, त्यांना निर्यात प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलो ३० रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. १५ हजार टन दूध भुकटी निर्यातीकरिता हे अनुदान असेल. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.राधाकृष्ण विखे पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.