सुदर्शन सुतार
Fruit Company : एकेकाळी मालवाहतूक गाडीचालक असलेल्या टेंभुर्णी (जि. सोलापूर) येथील दत्तात्रेय माळी यांनी माउली फ्रूट कंपनीचे मालक, केळी उत्पादक- निर्यातदार होण्यापर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. दोन हजार टन क्षमतेचे ‘कोल्ड स्टोअरेज’ उभारून व्यापाराचा विस्तार केला आहे. परिसरातील केळी उत्पादकांनाही त्यातून स्थानिक बाजारपेठ तयार झाली आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी गावातील माळी वस्ती येथे दत्तात्रेय माळी यांची पाच एकर शेती आहे. आई रुक्मिणी आणि वडील विठ्ठल दोघेही शेतकरी. दत्तात्रेय यांना रामदास आणि सोमनाथ हे दोन भाऊ आहेत. शेतीतील जेमतेम उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. आर्थिक ताणांमुळे दत्तात्रेय यांना नाइलाजाने दहावीचे शिक्षण सोडून उत्पन्न कमाविण्याकडे लक्ष द्यावे लागले. पानटपरीवरील कामापासून त्यांचा संघर्ष सुरू झाला. सन २००१ च्या दरम्यान पुण्यातील केळी व्यापाऱ्याच्या मध्यम माल वाहतुकीच्या गाडीवर ते क्लीनर म्हणून काम पाहू लागले. पाच-सहा महिन्यांनी त्याच गाडीचे ते ‘ड्रायव्हर’ झाले. लहान भाऊ सोमनाथ यांनाही बारावीचे शिक्षण घेऊन दत्तात्रेय यांच्यासोबत काम सुरू केले.
गाडीचे झाले मालक
माढा, करमाळा भागांतील शेतकऱ्यांकडील केळी पुण्यातील व्यापाऱ्याकडे पोहोच करण्याचे काम दत्तात्रेय यांनी तीन-चार वर्षे नेटाने केले. सन २००८-०९ मध्ये त्यांची मेहनत, प्रामाणिकपणा पाहून व्यापाऱ्याने ही गाडी दत्तात्रेय यांनाच विकली. आता स्वमालकीच्या गाडीतून केळी खरेदी व पोहोच असे कामाचे स्वरूप झाले. शेकडो केळी उत्पादकांशी असलेला संपर्क व संपूर्ण केळी मार्केटचा अभ्यास यातून धाडस व आत्मविश्वास वाढला. त्यातून दत्तात्रेय केळीचे खरेदीदार म्हणून नावारूपास आले.
रायपनिंग चेंबरचा टप्पा
शेतकरी व व्यापारी यांच्यातील विश्वासाचा दुवा अशी दत्तात्रेय यांची ओळख झाली. अनेक शेतकरी ठरवून त्यांच्याकडे केळी देऊ लागले. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने एक-दोन रुपये नफा कमी मिळू दे, पण व्यवहार पारदर्शक करण्यावर दत्तात्रेय यांनी भर दिला. त्यातून व्यवसाय झपाट्याने वाढत गेला. सन २०१२-१३ मध्ये ‘रायपनिंग चेंबर’ ही उभारले. केळीची उतरणी, प्रतवारी, पॅकिंग यांसारखी कामेही घेऊ लागले. त्यातून माउली फ्रूट कंपनी आकाराला आली. त्याद्वारे २०१७-२०१८ मध्ये माढा, करमाळा, पंढरपूर, इंदापूर आदी भागांतून १२०० गाड्या, तर २०१८-२०१९ मध्ये १००० गाड्यांद्वारे केळी खरेदी-विक्री केली.
...झाले केळी उत्पादक
व्यवसाय आणि शेतीतील उत्पन्नाच्या बळावर आपल्या पाच एकर शेताशेजारीच नऊ एकर जागा घेतली. पैकी आज पाच एकरांत कंपनी, शीतगृह यंत्रणा व उर्वरित क्षेत्रात केळी व ऊस आहे. केळीत
पंधरा ते वीस वर्षे अनुभवातून हातखंडा मिळवला आहे. एकरी सरासरी ३० टन उत्पादन ते घेतात.
शीतगृहाचा टप्पा
कामाचा व्याप वाढल्याने शीतगृहाची (कोल्ड स्टोअरेज) गरज भासू लागली. शेतकऱ्यांकडूनही त्याची मागणी झाली. त्यानुसार २०१९-२०२० मध्ये कामाला सुरुवात करून आठ-दहा महिन्यांत बँकेच्या अर्थसाह्याने दोन हजार टन म्हणजे १०० कंटेनर (प्रति २० टनांचे) साठवणूक क्षमतेचे शीतगृह
उभारले. त्यातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे.
-यात १० शीतकक्ष. (कोल्ड रूम्स)
-पाच प्री-कूलिंग’चे कक्ष. यात आठ तास केळी ठेवली जातात.
-यातील तापमान १३ अंश सेल्सिअस.
-प्रत्येकी दहा दिवसांनी एक बॅच बाजारात रवाना केली जाते.
-शीतगृह प्रक्रियेनंतर व्यापाऱ्यांना वा थेट निर्यातीसाठी केळी पाठविण्यात येतात.
-अन्य व्यापाऱ्यांनाही भाडेतत्त्वावर शीतगृह देण्यात येते.
-सन २०२१ मध्ये (पहिल्या वर्षी) संपूर्ण हंगामात एक हजार कंटेनर केळीची साठवणूक. त्यातील ५०० कंटेनर स्वतः खरेदी केलेल्या केळीचे. उर्वरित व्यापाऱ्यांचे.
-सन २०२२ मध्ये २००० कंटेनर साठवणुकीपैकी सातशे कंटेनर स्वतःचे. उर्वरित व्यापाऱ्यांचे.
निर्यातदार म्हणून ओळख
जेमतेम शिक्षण होऊनही अनुभव, जिद्द, चिकाटी, व्यावसायिक हुशारीच्या जोरावर एकेक टप्पा पुढे जात
दत्तात्रेय अलीकडेच केळीचे निर्यातदार झाले आहेत. त्यासाठीचा परवानाही काढला आहे.
तीस टक्के केळीची इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबईला निर्यात केली आहे. ७० टक्के केळी व्यापाऱ्यांना दिली आहेत.
सौरऊर्जेचा वापर
सुमारे दोन एकरांत असलेल्या दोन हजार टन क्षमतेच्या शीतगृहासाठी विजेची गरज लक्षात घेऊन
दोन स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर्स व वीजखर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जेचे पॅनेल्स बसविले आहेत.
सुमारे ३५० किलोवॉट वीजनिर्मिती करण्याची त्याची क्षमता आहे.
दोनशे लोकांना रोजगार
प्रामुख्याने जुलै ते जानेवारी हा केळीचा हंगाम असतो. या काळात केळीची उतरणी, प्रतवारी, पॅकिंग,‘ ‘लोडिंग’, शीतगृहातील व अन्य कामे मिळून परिसरासह परराज्यांतील महिला व पुरुषांना मिळून दोनशे जणांना रोजगार दिला. हंगामाव्यतिरिक्त एरवीही दररोज ५० मजूर कार्यरत असतात.
संपर्क ः दत्तात्रेय माळी, ९४०४६९०३७०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.