Beekeeping  Agrowon
ॲग्रो विशेष

Honey Revolution : मधक्रांतीसाठी ड्रीम प्रोजेक्टची गरज ः रवींद्र साठे

बाळासाहेब पाटील

Mumbai News : नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते कारण, त्याचा कोणताही भाग निरुपयोगी नाही. त्याप्रमाणे मधमाशीपासून निर्माण होणारा कोणताही भाग निरुपयोगी नाही. जगभरात मधाला मोठी मागणी आहे.

त्यासोबतच मधमाशीच्या विषालाही मागणी आहे. मात्र, त्याचे शास्त्रीय आकलन, संशोधनाला देशात वाव नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट हाती घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित दोन दिवसीय मध महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महामंडळाच्या सीईओ आर. विमला होत्या. या वेळी प्रगतिशील मधपालन सन्मानाचे वितरण करण्यात आले.

यामध्ये लातूर येथील निगर पाटील, अहमदनगर येथील राजू नाकवडे, मधाचे गाव असलेल्या महाबळेश्वरमधील मांघरचे सरपंच गणेश जाधव, कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे सरपंच वसंत वास्कर, पालघर जिल्ह्यातील घोलवडचे सरपंच रवींद्र बुड, उपसरपंच कुणाल शहा यांचा सन्मानचिन्ह, धनादेश देऊन सन्मान केला.

साठे म्हणाले की, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ६० टक्के मधनिर्मितीची क्षमता आहे. मात्र, केवळ ५ ते सहा टक्केच मधनिर्मिती केली जाते. पुढील काळात गाव तेथे मधाची पेटी हे ब्रीद घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मधमाशी पालनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रात मधक्रांतीसाठी शेतकऱ्यांबरोबरच आदिवासींना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

मधमाशीच्या विषाला जगभरात औषधनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी आहे. मात्र, त्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे एकत्र माहिती संकलनाबरोबरच मधउद्योगाचे सर्वेक्षण, ब्रीडींग, राणी माशीची पैदास, कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी स्थलांतर करणे, सेंद्रिय खतांचा वापर आदींबाबत प्रशिक्षणाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारच्या सर्व विभागांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.’

सीईओ आर. विमला म्हणाल्या, ‘एकवेळ रस्ते बनवणे सोपे आहे पण एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील माणसे तयार करणे अवघड गोष्ट आहे. या जाणिवेने खादी ग्रामोद्योग प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात मधक्रांती घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मध ही सोन्याची खान आहे. मध निसर्ग, पर्यावरणाशी जोडला गेला आहे.

सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे मध आहेत, पण आम्ही शेतकऱ्यांकडून संकलित केलेला मध विशिष्ट प्रकारे संकलित करून तो उपलब्ध करून देतो. सध्या सेंद्रिय मधाला मागणी आहे. पण तो तयार करण्यासाठी आधी तीन वर्षे सेंद्रिय शेती करावी लागते याचीही माहिती असायला हवी.’ या वेळी महाराष्ट्र राज्य एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, उद्योग विभागाचे उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

‘दारूच्या १० बाटल्यांमागे एक मधाची बाटली’

मध महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य मंत्र्यांना निमंत्रण होते. मात्र, एकही मंत्री वेळेत न आल्याने कार्यक्रम लांबला. अखेर सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपून आभार मानल्यानंतर मुनगंटीवार कार्यक्रमस्थळी आले.

त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी झालेल्या भाषणात मुनगंटीवार यांनी ‘जो कुणी दारू पितो त्याला १० दारूच्या बाटल्यांमागे एक मधाची बाटली घेण्यास प्रोत्साहन द्या. आपोआप मधविक्री वाढेल,’ असा सल्ला दिला. तसेच मध आणि मत्स्यपालनासारखे कमी कालावधीत उत्पन्न देणाऱ्या व्यवसायांना राज्य सरकार भरघोस मदत करेल असेही सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT