विकास जाधव
Beekeeping Business : सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हा निसर्गाचे वैभव लाभलेला तालुका आहे. येथील डोंगराळ व जंगल परिसारत अनेक शेतकरी मधमाशीपालन व्यवसाय करतात. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या बाजूस वाळणे (तापोळा) येथील चंद्रकांत मारुती नलावडे यांना पंचवीस वर्षांहून अधिक काळ मधमाशीपालनाचा भक्कम अनुभव आहे.
निसर्गरम्य वाळणे डोंगरालगत त्यांची चार एकर शेती आहे. अतिशय दुर्गम भाग. असल्याने पूर्वी शिक्षणाच्या फारशा सुविधा नसल्याने सातवीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. घरची २० ते २५ जनावरे असल्याने त्यांना चरावयास नेण्याची जबाबदारी आली.
हा नित्यक्रम झाल्याने मधमाशांची जवळून ओळख झाली. हा पूरक व्यवसाय करण्याची इच्छा झाली. पण आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने मधपेट्या घेणे शक्य नव्हते. स्वयंभू उत्तेश्र्वर मंदिराच्या डोंगर परिसरात १९९८ च्या दरम्यान पैसे जमवून सिमेंटची पेटी व लाकडी फ्रेम याद्वारे मधमाशीपालन सुरू केले. सुरवातीला सिमेंटच्या वासामुळे मधमाशांची वसाहत त्यात रुजली नाही. एक वर्ष जुनी झाल्यावर मात्र त्यात वसाहत तयार होऊ लागली.
व्यवसाय केला गतिमान
पुढे सुमारे ५० लाकडी पेट्या तयार करून घेतल्या. जनावरे चरावयास नेण्याच्या अनुभवातून संपूर्ण जंगल परिसर, तेथील फुलोऱ्याचा चांगला अभ्यास झाला होता. त्यानुसार जागोजागी पेट्या ठेवण्यास सुरवात केली.
५० ते १०० किलो मध मिळू लागला. त्या काळात एक किलो मधाची बाटली दहा रुपयांना ते देत. गावपरिसरातील अनेक जण कामानिमित्त मुंबईत होते. ते गावी येत त्यावेळी मध घ्यायचे. शिल्लक मध खासगी संस्थांना दिला जायचा. एकदा जंगलास वणवा लागल्याने सर्व ५० पेट्या जळून गेल्या. व्यवसाय आर्थिक अडचणीत आला.
नलावडे झालेल्या घटनेमुळे व्यथित झाले. पण हिंम्मत हारले नाहीत. आर्थिक स्थिती बेताची असली तरी शेतीतील पैसे साठवणे सुरू ठेवले. जमलेल्या पैशातून पाच पेट्या खरेदी केल्या. संकटांना तोंड देत चिकाटी व सातत्यातून ते एकेक पाऊल पुढे निघाले. आज त्यांच्याकडील पेट्यांची संख्या २५० वर पोचली आहे. एक किलो मधनिर्मितीपासून सुरू झालेला प्रवास आज वर्षाकाठी ५०० ते ७०० किलोपर्यंत पोचला आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन
नलावडे यांनी मधमाशीपालनातील प्रशिक्षण तीनवेळा घेतले आहे. मध संचालनालय, मधूसागर यांच्याकडून अनुदानावर पेट्या मिळाल्या आहेत. कृषी विभागाचे सहकार्य मिळते. सुमारे ५० शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी प्रेरणा व मदत नलावडे यांनी केली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. मात्र शासनाने पेट्यांसाठी ५० टक्क्यांऐवजी ७५ टक्के अनुदान दिले जावे असे ते म्हणतात. पुढील काळात मधाचे स्वतःचे ब्रॅडिंग करण्याचा मानस आहे.
अर्थकारण उंचावले
मधमाशीपालनाने कुटुंबाचे अर्थकारण उंचावले. मुलगी सोनालीला नर्सिंग अभ्यासक्रमाचे तसेच मुले स्वप्नील, नीलेश यांना महाविद्यालयीन शिक्षण देणे शक्य झाल्याचे नलावडे सांगतात. पत्नी संगीता यांची शेतीत मोठी मदत होते. गहू, भात, नाचणी, घेवडा ही पिके ते घेतात. शेततळे उभारले असून डोंगरातून येणारे पाणी पाइपद्वारे त्यात घेतले आहे. सुमारे १२ जनावरे आहेत.
मध निर्मिती व विक्री
वर्ष मध उत्पादन (किलो)
२००० ४८०
२०२१ ५३५
२०२२ ५१०
२०२३ ६००
तालुक्यातील मधुबन, मधूसागर या संस्थांना पाचशे रुपये प्रति किलो दराने विक्री.
ग्राहक घरूनही घेऊन जातात. त्याचा दर जास्त.
आजचा व्यवसाय दृष्टीक्षेपात
सातेरी मधमाशीपावन केले जाते. पाऊस संपल्यावर दसरा ते जानेवारी काळात जंगलात पेट्या ठेवतात. या काळात जंगलातील झाडांना फुलोरा असतो.
पावसात फुवोरा गळण्याची भीती असते. फुलोरा कमी झाल्यावर किंवा मधमाशांची वसाहत विस्कळित होऊ नये यासाठी काहीवेळा पेट्यांचे रात्री स्थलांतर करावे लागते.
एप्रिल, मे महिन्यात मध मिळण्यास सुरवात होते.
वणव्यांपासून बचाव तसेच अंजनी माशी, सरडा यांच्यापासून पेट्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अस्वलापासून जपण्यासाठी झाडावर मचाण उभारून पेट्या ठेवल्या जातात. झाडास काटेरी कुंपण करण्यात येते.
माशा किडी-रोगांपासून मुक्त राहतील याची काळजी घेतली जाते. एखाद्या पेटीत प्रादुर्भाव झाल्यास ती वेगळी केली जाते. गरम पाण्याची प्रक्रिया करूनच पुनर्वापर होतो.
पेटीच्या फक्त वरील भागातूनच मध घेतला जातो. याला शेतकरी ‘सुपर’ असे म्हणतात.
मधयंत्र डोक्यावरून वाहून नेऊन प्रत्येक पेटीजवळ जाऊन त्या आधारे मध काढला जातो. त्यास हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेतली जाते.
मध स्टीलच्या भांड्यातच ठेवला जातो.
सेंद्रिय असल्याने स्वाद व गुणवत्ता चांगली.
चंद्रकांत नलावडे ९४२१९६८०३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.