Dr. Pandurang Khankhoje Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Pandurang Khankhoje : डॉ. पांडुरंग खानखोजे : एक दुर्लक्षित नायक

Article by Hrushikesh Tahkik : डॉ. स्वामिनाथन यांनी ज्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे. भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या कार्यातही ते सहभागी झाले होते. एक शेतमजूर ते मेक्सिकन कृषी क्रांतीचे जनक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचाही भारतरत्न पुरस्काराने गौरव करायला हवा होता; परंतु त्यांच्या पदरी उपेक्षाच आली.

Team Agrowon

Father of the Mexican Agrarian Revolution : जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात डॉ. पांडुरंग खानखोजे यांनी अविस्मरणीय कार्य केले; परंतु त्यांच्याबद्दल आपल्याकडे फार कमी लोकांना माहिती आहे. लॅटिन अमेरिका आणि मेक्सिकोत त्यांना खूप मानाचे स्थान आहे. मेक्सिकोतील शापिंगो येथील नॅशनल ॲग्रिकल्चरल स्कूल येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. त्या पुतळ्याखाली मेक्सिकन भाषेत लिहिलेल्या ओळी फार बोलक्या आहेत- आता कोणीही गरीब भुकेने मरणार नाही! या विधानावरून त्यांच्या कार्याची प्रचीती येते.

पांडुरंग खानखोजे यांचा जन्म वर्धा येथील पलकवाडी या लहानशा खेड्यात झाला. त्याचे वडील सदाशिव खानखोजे हे न्यायालयात पीटिशन रायटर होते. ब्रिटिश काळात सर्वसामान्य भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अर्ज लिहून देण्याचे काम ते करत.

पांडुरंग यांचे आजोबा व्यंकटेश खानखोजे १८५७ च्या स्वातंत्र्य समरात सामील होते. पांडुरंग यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपूर येथील नील हायस्कूल मध्ये झाले. माध्यमिक शाळेत असताना त्यांचा संबंध बांधव समाज या सामजिक चळवळीशी आला. या माध्यमातून त्यांनी १८९९ मध्ये दुष्काळी भागात शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित केले होते.

क्रांतीचा वसा आणि ठसा

देशात स्वातंत्र्य चळवळ वेग घेत होती. अनेक तरुण सशस्त्र क्रांतीच्या विचारांनी भारावून गेले होते. याच काळात पांडुरंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी छिंदवाडा येथील गोंड आदिवासी समाजाची बाजू घेऊन ब्रिटिश दडपशाही विरुद्ध बंड पुकारले.

मात्र हे बंड फसले आणि पांडुरंग यांना भूमिगत व्हावे लागले. ब्रिटिश सरकारने पांडुरंग यांचे नाव काळ्या यादीत टाकले. या कारणाने पांडुरंग हे प्रथमच चर्चेत आले. त्यानंतर त्यांचा संबंध देशभरातील विविध संघटना आणि जहाल क्रांतिकारकांशी आला. लोकमान्य टिळकांशीही त्यांची भेट झाल्याची माहिती मिळते.

तसेच वि. दा. सावरकर यांच्याशीही त्यांनी पत्रव्यवहार केला होता. भूमिगत असतानाच सशस्त्र क्रांतीचे कार्य पुढे नेण्यासाठी पांडुरंग जपानमध्ये गेले. तेथे युद्ध शास्त्र आणि सैनिकी प्रशिक्षण घेण्याचा त्यांचा विचार होता. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली.

मजूर ते संशोधक

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को हे शहर १९०६ मध्ये भूकंपाने बेचिराख झाले होते. या शहराच्या पुनर्बांधणीसाठी जगभरातून मजूर आणले जात होते. मजुरांना घेऊन जाणाऱ्या अशाच एका जहाजातून संधीच्या शोधात पांडुरंग अमेरिकेत पोहोचले. सुरुवातीला तिथे कोणीच ओळखीचे नसल्यामुळे त्यांनी तेथे शेतमजुरी करून आपली उपजीविका चालवली.

अमेरिकेतील वास्तव्यात १९११ मध्ये पांडुरंग यांनी वयाच्या २५ व्या वर्षी ओरेगॉन येथील कृषी विद्यापीठातून बी. एस्सी. (ॲग्रिकल्चर) ही पदवी मिळवली. पुढे १९१३ मध्ये एम.एस्सी. पदवी मिळवून वॉशिंगटनमधील कृषी महाविद्यालयात नोकरी मिळवली. त्या वेळी त्यांची ओळख प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी झाली.

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा कृषी संशोधन कार्याचे महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पांडुरंग यांनी शेतीविषयक पुढचं शिक्षण चालू ठेवलं. त्यांनी १९१९ मध्ये मिनेसोटा विद्यापीठातून कृषी शास्त्रातील पीएच.डी. मिळवली. या पदवीसाठी त्यांनी गव्हावर सखोल संशोधन केलं होतं.

डॉ. खानखोजे यांनी त्यानंतर काही वर्षे मेक्सिकोमधील राष्ट्रीय कृषी विद्यापीठाच्या कृषी रसायन प्रयोगशाळेत काम केले. स्थानिक मळेवाले आणि शेतकऱ्यांचे माती परीक्षणाचे अहवाल बनवण्याचे काम तेथे चालत असे. या वेळी त्यांचा तेथील शेतकऱ्यांशी जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजण्यासाठी मदत झाली.

दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक मेक्सिकन भाषा शिकून घेतली. मेक्सिकोत तेव्हा मका हे मुख्य पीक होते. डॉ. खानखोजे यांनी संशोधनासाठी मका या पिकाची निवड केली. सोनोरा येथील राष्ट्रीय संशोधन परिषदेत त्यांच्या संशोधन अहवालाला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांच्या संशोधनाची दखल घेतली गेली. त्यांना कृषी महाविद्यालयात अध्यापनाचे आणि संशोधनाचे काम मिळाले.

मेक्सिकोत कृषी विद्यापीठातील कृषी सुधार प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यांमध्ये डॉ. खानखोजे सहभागी झाले. स्थानिक शेतकरी, मळेवाल्यांकडून त्यांच्या समस्यांचे स्वरूप जाणून घेतले आणि गहू व मका यांचे सुधारित वाण विकसित करण्यासाठी संशोधनास सुरूवात केली.

त्यामध्ये पावसाळी व उन्हाळी हंगामात अधिक उत्पादक देणारे वाण, बर्फाळ प्रदेशातही टिकून राहणारे कणखर वाण, कोरडवाहू जमिनीत टिकाव धरणारे वाण, उंच डोंगरातल्या शेतात पिकू शकणारे वाण, गव्हावर पडणाऱ्या तांबेऱ्याला प्रतिबंध करणारे वाण अशा विविध गुणधर्मांचे वाण त्यांनी विकसित केले.

तसेच त्यांनी ‘टिओझिंटे’ या मक्याच्या मूळ जंगली प्रकारच्या गवताशी संकर घडवून आणत अधिक उत्पादन देणारे आणि टपोऱ्या दाण्याचे मक्याचे नवीन वाण विकसित केले. पुढे डॉ. खानखोजे यांनी मेक्सिकोत सुदूर भागात ३० कृषी शाळा उघडल्या. आपल्या खासगी मिळकतीतून मेक्सिकोत जमिनी खरेदी करायच्या आणि त्या गरजू शेतकऱ्यांना वाटून टाकायचा सपाटा चालवला.

भारतभूमीत परत

डॉ. खानखोजे यांनी १९०६ ते १९४९ अशी ४३ वर्षे मेक्सिकोत राहून तेथील कृषी आणि सामाजिक सुधारणेच्या कार्याला वाहून घेतले. भारत स्वतंत्र झाल्यामुळे त्यांनी भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्यांनतर मध्य प्रदेशचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी त्यांना कृषी सुधार समितीच्या कामासाठी निमंत्रित केलं. त्यानुसार ते एप्रिल १९४९ मध्ये भारतात दाखल झाले; परंतु त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. कारण ब्रिटिशांनी तयार केलेल्या काळ्या यादीत डॉ. खानखोजे यांचं नाव अजूनही होतं. परंतु योग्य शासकीय छाननी होऊन त्यांना मुक्त केलं गेलं.

डॉ. खानखोजे यांना भारतात आल्यावर महात्मा गांधींच्या प्रेरणेने ग्रामसुधाराची ओढ लागली होती. म्हणून त्यांनी ‘मुक्तग्राम’ चळवळीचा एक आराखडा तयार केला. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला व्याख्यानं देण्यास सुरुवात केली. त्यांनी १९५६ ते १९६४ या काळात ८० व्याख्यानं दिली. या काळात त्यांचं वास्तव्य ग्रामीण भागात होतं. नागपूर येथे १९६७ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उपेक्षेचे धनी

मेक्सिको हा देश १९१० च्या क्रांतीनंतर वसाहतवादाच्या बेड्या झटकून प्रजासत्ताक बनण्याचा प्रयत्न करत होता. कला, वैज्ञानिक विकास आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात मोठे बदल घडत होते. या प्रवासात डॉ. पांडुरंग खानखोजे यांचे योगदान अमूल्य ठरले. ते आपल्या जुन्या क्रांतिकारक मित्रांच्या मदतीसाठी मेक्सिकोला पोहोचले.

त्या वेळी ते ब्रिटिशांच्या तावडीत सापडले असते, तर त्यांना कदाचित फाशीची शिक्षा झाली असती. अमेरिकेतील तरुण गदर क्रांतिकारकांच्या प्रशिक्षणात सहभाग घेत असताना मेक्सिकन लोकांनी त्यांच्याशी मैत्री केली होती. मेक्सिकोने खानखोजेंना मनापासून स्वीकारले. देश, धर्म, भाषा कुठलीही असो भुकेची प्रेरणा सर्वांची सारखीच असते.

हे फार विशेष आहे की डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी भारतातील हरितक्रांतीसाठी संशोधन करण्यासाठी मेक्सिकोमधील सोनोरा येथील संशोधन संस्थेची निवड केली होती; तेथील प्रयोगशाळेत डॉ. खानखोजे यांनी मूलभूत संशोधन केले होते.

भारतात मात्र डॉ. पांडुरंग खानखोजे यांच्या कर्तृत्वाचे यथायोग्य चीज झाले नाही. त्यांची उपेक्षा करण्यात आली. आपल्याकडे खऱ्या हिऱ्याची पारख आणि किंमत क्वचितच होते. डॉ. खानखोजे यांची एक दुर्लक्षित नायक म्हणून इतिहासात नोंद होईल.

(लेखक गांधेली येथील एमजीएम जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Subsidy Scheme: शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार दर्जेदार बियाणे

Gopinath Munde Scheme: योजना ऑनलाइन असूनही अनुदान ऑफलाइनच

Kharif Awareness Campaign: खरीपपूर्व जनजागृती मोहिमेत आधुनिक तंत्रज्ञानावर भर

Illegal HTBT Cotton Seeds: अवैध एचटीबीटी कपाशीचे ५६ लाखांचे बियाणे जप्त

Health Cards Scheme: दररोज दहा हजार कार्ड काढण्याचे नियोजन करा

SCROLL FOR NEXT