M. S. Swaminathan Agrowon
ॲग्रो विशेष

M. S. Swaminathan : शेती अन् शेतकऱ्यांमध्येच रमलेले डॉ. एम. एस. स्वामिनाथन

Green Revolution : प्रत्येक क्षेत्रात उच्चपदावर म्हणण्यापेक्षा उच्च पातळीवर पोहोचलेल्या व्यक्ती असतात, यापैकीच डॉ. एम. एस. स्वामिनाथन. भारतीय हरितक्रांतीचा पाया रचण्यामध्ये त्याचे मोठे योगदान आहे.

अमित गद्रे

Latest Agriculture Update : प्रत्येक क्षेत्रात उच्चपदावर म्हणण्यापेक्षा उच्च पातळीवर पोहोचलेल्या व्यक्ती असतात, यापैकीच डॉ. एम. एस. स्वामिनाथन. भारतीय हरितक्रांतीचा पाया रचण्यामध्ये त्याचे मोठे योगदान आहे.

तेरा वर्षांपूर्वी चेन्नई (तमिळनाडू) येथे डॉ. स्वामिनाथन फाउंडेशन आणि जागतिक अन्न व कृषी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या वार्तांकनाला जाण्याची संधी मला मिळाली होती. डॉ. स्वामिनाथन फाउंडेशनचे कृषी संशोधन आणि विस्तार कार्य पाहण्यासाठी मी चार दिवस जास्तीचे ठेवले होते.

चेन्नईमधील एका मोठ्या हॉलमध्ये भरगच्च चार दिवसांच्या परिषदेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री, तसेच विविध खात्याचे मंत्री, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. परिषदेचा हॉल देशभरातील कृषितज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी भरलेला होता. स्टेजवर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ बसलेले.

प्रमुख पाहुणे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी येण्याची वेळ झाली होती. परंतु मुख्य स्टेजवर डॉ. एम. एस. स्वामिनाथन दिसत नव्हतेच... ते होते पार हॉलच्या शेवटच्या कोपऱ्यात शेतकऱ्यांच्या घोळक्यामध्ये... शेतकऱ्यांच्या त्या घोळक्यात मी घुसलो आणि डॉ. स्वामिनाथन यांना नमस्कार केला.

‘ॲग्रोवन’चे ओळखपत्र दाखविले, दैनिकाची थोडक्यात माहिती दिली. कृषी पत्रकार म्हटल्यावर डॉक्टरांनी हातात हात घेतले आणि म्हणाले, की आता मी देशभरातील शेतकऱ्यांबरोबरीने बोलत आहे, हा उद्‍घाटन समारंभ संपला, की मला भेट. त्याच्या मदतनीसाकडे माझे कार्ड देऊन त्याला वेळही सांगितली.

देश आणि तमिळनाडू राज्यातील आलेला शेतकऱ्यांचा घोळका इतका आत्मीयतेने डॉ. स्वामिनाथन यांच्यासोबत बोलत होता, की बस... मोठ्या भावाला शेती, गाव, कुटुंबाच्या समस्या, शेतीमधील प्रयोग सांगतोय आणि मोठा भाऊ ते ऐकून समस्यांची उकल सांगतोय.

काही शेतकरी तर भात बियाणे त्यांच्या हातात देऊन गौरवीत होते, काही शेतकरी थेट साष्टांग नमस्कारच घालत होते. एकाचवेळी तमीळ, कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेत डॉक्टरांचा शेतकऱ्यांसोबत संवाद रंगलेला..

तर दुसऱ्या बाजूला स्टेजवर मान्यवरांकडून डॉक्टरांना बोलावले, की स्टेजवर या, मुख्यमंत्री येत आहेत. तरीही डॉक्टर शेतकऱ्यांच्या घोळक्यात... शेवटी मुख्यमंत्र्यांची गाडी हॉलच्या प्रवेशद्वारावर आली, तेव्हा शेतकऱ्यांच्या एका गटानेच डॉक्टरांना स्टेजवर नेले.

परिषदेचा मुख्य कार्यक्रम संपला. त्यानंतर मी त्यांच्या पीए सोबत केबिनच्या बाहेर उभा होतो. ते मुख्यमंत्र्यांना गेटवर सोडून केबिनकडे येत होते, सोबत शेतकऱ्यांचा घोळका होताच. पुन्हा एकदा मी त्यांना भेटीचे प्रयोजन सांगितले. डॉ. स्वामिनाथन यांनी ॲग्रोवन दिवाळी अंकासाठी सविस्तर मुलाखत दिली. माझ्या सोबत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांनाही ते उत्तर देत होते.

मुलाखत संपल्यावर मी म्हणालो, की डॉक्टर, मला तुमच्या संशोधन संस्थेचे कार्य पाहायचे आहे, कोणत्या भागात जाऊ, की जेथून मला नवीन काही तरी आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगायला भेटेल.

लगेचच त्यांनी पुद्दुचेरी येथील केंद्राचे प्रमुख डॉ. त्यागराजन यांना बोलावले, माझी विनंती सांगितली आणि ते म्हणाले, की यांना एक गाडी आणि विस्तार कार्यकर्ता द्या, दोन दिवस आपले विविध उपक्रम आणि केंद्र दाखवा, परत आपल्या चेन्नई येथील हॉस्टेलवर यांना घेऊन या.

मला हा धक्काच होता... आयुष्यात पहिल्यांदाच मी डॉ. स्वामिनाथन यांना भेटलेलो, ते जागतिक कीर्तीचे कृषितज्ज्ञ आणि मी युवा कृषी पत्रकार.. पण कृषी संशोधन आणि विस्तार कार्याबाबत त्यांच्यात असलेली आत्मीयता प्रत्यक्षात अनुभवास येत होती. म्हणूनच जगण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा सामान्य शेतकऱ्यांचा घोळका डॉक्टरांच्या सोबत कायम का होता, याचे उत्तर मला त्यांच्या कामाच्या पद्धतीतून मिळाले होते.

त्यांची भेट मला शेतीमध्ये नवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी दररोज आठवण करून देत राहील. शेवटी काही भेटी अशा असतात, की त्या आपण विसरू शकत नाही, आपल्या आयुष्याचा कायम ठेवा बनतात. आज देहाने डॉ. स्वामिनाथन जरी आपल्यात नसले, तरी

त्यांच्या विचाराचे बीज प्रत्येकाच्या मनात रुजले आहे. त्यांचा आवाज माझ्याकडील कॅसेटमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. तसेच माझ्या वहीमध्ये घेतलेली त्यांची सही, हा अनमोल ठेवा मला सतत नवी संकल्पना देत राहील, यात शंका नाही. जग आणि देशाच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना शतशः नमन...

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT