Gadhinglaj Sugar Factory Kolhapur : द्वितीय विशेष लेखापरीक्षण कार्यालयाकडून कायदेशीर कारवाईच्या शिफारशीचा प्रस्ताव आला तर तातडीने आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे (गोडसाखर) दप्तर चाचणी लेखापरीक्षणासाठी पोलिस बंदोबस्तात सक्तीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविली जाईल, अशी ग्वाही विभागीय साखर सहसंचालक कार्यालयाचे (आरजेडी) अधीक्षक एस. आर. काळे यांनी काल झालेल्या बैठकीत दिली.
गोडसाखरच्या निवृत्त कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक झाली. यावेळी काळे यांच्यासह तृतीय विशेष लेखापरीक्षक कार्यालयाचे प्रतिनीधी बी. डी. खाडे, निवृत्त कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी खोत आणि कामगार उपस्थिती होते. खोत यांनी चाचणी लेखापरीक्षण तातडीने व्हावे, दप्तर मिळत नसेल तर ते पोलिस बंदोबस्तात ताब्यात घ्यावे, सभासदांना सवलतीची साखर मिळावी, या प्रमुख मागण्यांबाबत ऊहापोह केला.
प्रांताधिकारी माने यांनी लेखापरीक्षणाची कार्यवाही कुठंपर्यंत आली, असा प्रश्न काळे यांना केला. लेखापरीक्षणसाठी दप्तर उपलब्ध होत नसल्याचे द्वितीय लेखापरीक्षकांनी कळविले असून त्यांच्याकडून कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव आल्यानंतरच सक्तीने दप्तर ताब्यात घेण्याची कार्यवाही करता येईल, असे काळे यांनी सांगितले. तसा प्रस्ताव सात दिवसांच्या आत साखर सहसंचालक कार्यालयाला पाठविण्याची सूचना प्रांताधिकारी माने यांनी खाडे यांना केली. त्यानंतर सात दिवसांत साखर सहसंचालकांनी दप्तर ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबविण्याची ग्वाही काळे यांनी दिली.
सभासदांच्या सवलतीच्या साखरेसाठी कामगारांचे पत्र मिळाले असून तसे पत्र कारखान्याला पाठविले आहे. परंतु कारखान्याकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. यामुळे त्या प्रश्नावरही कायदेशीर मार्ग अवलंबण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे काळे यांनी सांगितले.
निवृत्त कामगारांच्या देणीबाबत साडेतीन वर्षे लढा सुरू आहे. त्यांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न खोत यांनी केला. आम्ही कारखान्याकडे पैसे मागत नाही. ब्रिक्स कंपनी पैसे द्यायचे आहेत. हा प्रश्न न्यायालयात असून कारखान्याने यातून माघार घेणे आवश्यक असून तसे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाने मान्यही केले आहे. परंतु, अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे खोत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रांताधिकारी माने यांनी मी स्वतः याबाबत साखर सहसंचालकांशी चर्चा करून त्याबाबतही बैठक घेण्याची ग्वाही दिली. यावेळी कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचेही उत्तर लेखापरीक्षणातच...
कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष व काही संचालकांनी कारखान्याच्या गैरकारभाराबाबत आयुक्त व सहसंचालकांकडे चौकशीची मागणी केली आहे. त्याचे काय झाले, असा प्रश्न खोत यांनी काळे यांना केला. त्यावर काळे यांनी ही बैठक कामगारांच्या मागण्यांसाठी आहे की, सहसंचालक कार्यालयाच्या तपासणीची आहे हेच समजेना असे सांगितले. या पत्राचेही उत्तर चाचणी लेखापरीक्षणातच आहे. दप्तर ताब्यात मिळाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील, असे काळे यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.