Air India Plane Crash Agrowon
ॲग्रो विशेष

Air Transport Issue: सैरभैर झालेली हवाई वाहतूक

Aviation Safety India: केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती, अपघाताच्या कारणांची शहानिशा करण्यासाठी ब्रिटन सरकारने पाठवलेले तज्ज्ञांचे पथक आणि खुद्द बोइंग कंपनीकडून सांगितली जातील ती कारणे.

Team Agrowon

सुनील चावके

DGCA India Safety Concerns: भारतात ढोबळमानाने दररोज दोन कोटी लोक रेल्वे आणि रस्त्याने लांब पल्ल्यांचे प्रवास करतात. त्यांच्या तुलनेत विमानाने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य म्हणजे अडीच टक्के किंवा पाच लाखांच्या घरात आहे. हे आकडे देशातील वाढत्या आर्थिक विषमतेकडेही अंगुलीनिर्देश करतात. भारतात रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात दररोज चारशेहून अधिक म्हणजे वर्षाला दीड लाख जणांचा बळी जातो. रेल्वेने प्रवास करताना रोज सरासरी ५५ जण मृत्युमुखी पडतात. मात्र या तुलनेत विमान प्रवासात अपघाती मृत्यूची शक्यता अगदीच नगण्य असते.

म्हणजे एखादा प्रवासी एक लाखाहून अधिक वर्षे प्रवास करेल तेव्हा विमान अपघातात तो एकदा मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. दुर्दैवाने ‘एअर इंडिया’च्या अहमदाबाद-लंडन बोइंग ७८७ विमानात बसलेल्या प्रवाशांच्या वाट्याला नेमकी तीच दुर्दैवी शक्यता आली. एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन बोइंग ७८७ विमान उडल्यानंतर काही सेकंदांतच कोसळून एका सुदैवी प्रवाशाचा अपवाद वगळता इतर सर्व २४१ प्रवासी मृत्यमुखी पडले.

सर्वांत सुरक्षित ठरलेल्या हवाई प्रवासी वाहतुकीविषयी भारतातील मध्यम व उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांच्या मनात या भीषण अपघाताने धास्ती निर्माण केली आहे. ही भीती तातडीने दूर करण्याचे आव्हान सरकारपुढे असेल.

एअर इंडियाच्या ताफ्यात बोइंग-७८७ मालिकेतील एकूण ३४ विमाने असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले. या विमानांच्या देखभाल-दुरुस्ती आणि नूतनीकरणाची जबाबदारी बोइंगकडेच आहे की एअर इंडियाने आणखी कोणाला सोपवली आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. भारतात गेल्या दहा वर्षांमध्ये जेवढ्या संख्येने विमानतळे आणि प्रवासी वाढले, त्या प्रमाणात विमानतळांवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही.

उलट किमानपक्षी भरावयाची पदेही मोठ्या प्रमाणावर रिक्त ठेवण्यात आली असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने २५ मार्च रोजी सादर केलेल्या अहवालात निदर्शनास आणून दिले आहे. या अहवालानुसार नागरी उड्डाण महासंचालनालयात ५३ टक्क्यांहून अधिक पदे, भारतीय विमान प्राधिकरणात ३२०० पदे तर नागरी उड्डाण सुरक्षा विभागात ३५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे विमानांच्या देखभाल दुरुस्तीतील निष्काळजीपणा या अपघातास कारणीभूत ठरला आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सन २०११ पासून व्यावसायिक सेवेत दाखल झालेल्या बोइंगचे पावणेबाराशे ड्रीमलायनर ८५ देशांतील पाचशेहून अधिक विमानतळांवरून दररोज २१०० उड्डाणे भरतात. बोइंगने मे २०१७ मध्ये अत्याधुनिक सुविधा, अधिक इंधनक्षमतेने उडणाऱ्या ७३७ मॅक्स विमानाला दोन वर्षांच्या आतच दोन भीषण अपघातांनी गालबोट लावले. इंडोनेशियाच्या लॉयन एअर फ्लाइट ६१० ला झालेल्या अपघातात सर्व १८९ प्रवासी मृत्युमुखी पडले होते, तर इथिओपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ३०२ ला अपघात होऊन १५७ प्रवासी मृत्युमुखी पडले.

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दरम्यान बोइंग ७८७-९ विमान अचानक खाली आल्यामुळे ५० जण जखमी झाले होते. तो अपवाद वगळता बोइंग ड्रीमलायनरला आजवर प्राणहानी करणारा अपघात घडला नव्हता. विमान अपघातग्रस्त होत असतानाचा व्हिडिओ बघून बाहेरून काही समस्या उद्‌भविल्याचे वाटत नाही, असे प्राथमिक निवेदन बोइंग कंपनीने केले आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान अपघात विभाग (एआयबी), केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली उच्चस्तरीय चौकशी समिती, अपघाताच्या कारणांची शहानिशा करण्यासाठी ब्रिटन सरकारने पाठवलेले तज्ज्ञांचे पथक आणि खुद्द बोइंग कंपनीकडून व्हावयाची अपघाताची कारणमीमांसा यातून नेमके काय घडले ते यशावकाश समोर येईल. या अपघाताशी संबंधित चौकशीचे अंतिम निष्कर्ष येण्यास सप्टेंबर महिना उजाडेल. पण तोपर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात हरतऱ्हेच्या बाजारगप्पांना उधाण आले आहे.

अपघाताच्या काही तास आधी दिल्लीहून अहमदाबादला पोहोचताना या विमानात सारे काही आलबेल नसल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने ट्विट केला. शेवटच्या काही सेकंदांमध्ये मे-डेचा संदेश पाठवताना वैमानिकाने इंजिनाला इंधन पुरवठा ठप्प झाल्याचा दावा केला जात आहे. हा भारताच्या शत्रूदेशाने केलेला सायबरहल्ला आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

भारतात आजवरचा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये कट रचला जात असल्याचा दावा कथित माजी सीआयए अधिकारी सारा अॅडम्स यांनी नऊ जून रोजी ट्विटरवर केल्यानंतर तीनच दिवसांनी बोइंग-७८७ चा अपघात घडल्याचीही चर्चा सुरू आहे. काहींना या अपघातामागे राजकीय कटकारस्थानाचा संशय येत आहे. वैमानिकाने उड्डाणानंतर लँडिंग गिअर बंद न केल्यामुळे उंची गाठण्याऐवजी विमान खाली येऊन कोसळले, असाही तर्क तज्ज्ञ देत आहेत.

तर्क आणि दावे

डबल इंजिनचे बोइंग-७८७ अशा प्रकारे कोसळेल, यावर विश्वासच बसत नसल्याचे भाजप खासदार आणि व्यावसायिक वैमानिक राजीव प्रताप रूडींचे म्हणणे आहे. बोइंग ड्रीमलायनरच्या खरेदीला झालेल्या राजकीय विरोधाचीही आठवण करून दिली जात आहे. हा अपघातच असल्याचे घटनास्थळी भेट दिल्यानंतर केलेल्या विधानावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही राजकीय विरोधकांकडून आणि समाजमाध्यमांवर टीका होत आहे.

उच्चस्तरीय चौकशी समितीकडून अशा सर्व प्रकारच्या चर्चांची दखल घेतली जाईल, असे नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी म्हटल्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत नवनव्या दाव्यांची भर पडत राहणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील हवाई वाहतूक सैरभैर झाली आहे. मे महिन्यात वादळाच्या तडाख्यातून २२० प्रवासी असलेले दिल्ली-श्रीनगर विमान कसेबसे बचावले. यंदा ‘चार धाम यात्रा’ सुरू झाल्यापासून मे आणि जून महिन्यात हेलिकॉप्टरच्या पाच अपघातांची नोंद झाली.

प्रत्येक हवाई उड्डाणाची आणि उतरण्याची शेवटची काही मिनिटे कशी निर्णायक ठरतात हे या अपघाताने दाखवून दिले आहे. तुमच्या देशाची जेवढी लोकसंख्या नाही, त्यापेक्षा जास्त लोक आमच्या देशात दिवसभर प्रवास करीत असतात, अशी फुशारकी भारताचे मंत्री परदेशात जाऊन मारत असतात. अशी विधाने करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर या अपघातानंतर रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे.

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bird Flu Vaccine: लस आली पुढे काय?

Gaushala Land Transaction: गोशाळांच्या जमिनीचे व्यवहार आता कृषी दरानेच; महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

Maharashtra Cooperative Sector: सहकार गिळंकृत करण्याचा प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

Maize Market: अचलपूर बाजार समितीत मक्याची मोठी आवक; बाजारात शेतकऱ्यांची गर्दी

Sugarcane Price: स्वाभिमानीच्या आंदोलनापुढे कारखानदार नमले! सोलापुरात ऊसदराचा तिढा सुटला; शेतकऱ्यांना मिळणार ३ हजार ४५० रुपये

SCROLL FOR NEXT