Pune News : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये भात पिकावर करपा, तांबेरा व खोड कीड या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात शेती धोक्यात आली आहे. कृषी विभागामार्फत भात पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.
पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोऱ्यांचा परिसर भातशेतीचे आगार समजला जातो. पुणे जिल्ह्यातील भाताच्या एकूण ६३ हजार ८०० हेक्टरपैकी ५१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते. प्रत्येक वर्षी आदिवासी शेतकरी रोहिणी व मृग नक्षत्रांच्या माध्यमातून शुभमुहूर्त समजून धुळवाफेत पेरण्या करतो. दरवर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रामध्ये धूळ वाफेत पेरण्या केल्या.
गतवर्षांपेक्षा चालू वर्षी या नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रांतही सुरुवातीपासून पावसाने चांगलीच साथ दिल्याने भात पेरणी केलेला वरचा दाणा व माती आड गेलेला दाणा उतरून येऊन भात रोपे चांगल्या प्रकारे तरारू लागल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी लागवडी उरकून घेतल्या. त्या नंतर दहा ते पंधरा दिवसांपासून या भागामध्ये पावसाचा लपंडाव सुरू आहे. दाट धुके व रोगट वातावरणामुळे या भात पिकावर करपा, तांबेरा व खोड कीड या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भात पिके जळू लागली आहेत. रोग पडल्यानंतर विविध लक्षणे जाणवत आहेत.
या भागात राहणारा आदिवासी शेतकरी हा बारा महिन्यांतून भात एकमेव पीक काढतो. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे भात शेती संकटात सापडल्याचे चित्र आहे.
बारा महिने मोठ्या आशेने काबाडकष्ट करून ऐन वेळी होणाऱ्या निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. भात पिकांना करपा, तांबेरा व खोड किडीने ग्रासल्याने सगळीकडे भात रोपे तांबडी, पिवळी पडल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन कृषी विभागामार्फत या भागातील भात पिकाची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.
रोगाच्या प्रादुर्भावाचा परिणाम
- करपा : भात रोपांची पाती पिवळी पडून जळू लागतात.
- तांबेरा : या रोगामध्ये भात रोपांची पाती ही तांबडी पडून सुकू लागतात.
- खोड कीड : हा किडा रोपाच्या मुळामध्ये शिरून पूर्ण भात रोप पोखरतो.
आमच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी भात पिकावर भर दिला आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळे फारसे उत्पादन मिळाले नाही. चालू वर्षी चांगला पाऊस होण्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात भात पीके घेतली आहेत. सध्या भात पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहेत. पिकांवर करपा, तांबेरा, खोडकीड अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला असून पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.- बाळू बेंढारी, प्रगतशील शेतकरी, पोखरी, ता. आंबेगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.