Pune News : शेती क्षेत्र आणि ग्रामविकासाला वाहिलेला ‘सकाळ ॲग्रोवन’ आज (ता.२०) विसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्ताने पुण्यात हवामान बदल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी राज्यभर चर्चासत्रे होत आहेत.
हवामान बदलविषयक समस्या आणि उपायांकडे लक्ष वेधणाऱ्या दोन भरगच्च पुरवण्यांचा नजराणा वाचकांना दिला जात आहे. त्यातील पहिली पुरवणी शुक्रवारी प्रसिद्ध होताच वाचकांनी जोरदार स्वागत केले. वर्धापन दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘हवामान बदल परिषद’ होत आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रंजन केळकर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. कृषी व्यवस्थेला समृध्द करणाऱ्या राज्यातील प्रमुख नद्यांचे पाणी या परिषदेसाठी आणले जात असून जलपूजन केले जाणार आहे.
या परिषदेत विविध तज्ज्ञ, अभ्यासक व शास्त्रज्ञांकडून ‘हवामान बदलाशी निगडीत समस्या व उपाय’ याबाबत विचारमंथन होईल. ‘हवामान बदलाचे वर्तमान व भवितव्य’ या विषयावरील गटचर्चेत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे, ‘यशदा’तील जलसाक्षरता केंद्राचे समन्वयक डॉ. सुमंत पांडे सहभागी होत आहेत.
‘हवामान बदलामुळे शेती आणि पशूंवरील परिणाम’ या गटचर्चेत ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, ‘माफसू’चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांचा सहभाग असेल.
‘हवामान अनुकूल शेतीचे प्रारुप’ या विषयावरील गटचर्चेत महाधन ॲग्रिटेक लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश देशमुख, बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे प्रमुख तुषार जाधव तसेच महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार सहभागी होणार आहेत.
राज्याच्या अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे दुष्काळातील शेती, जलसाक्षरतेचे लाभ, हवामान बदलावरील उपाय याची माहिती देणारी चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी राज्यभर घेतली जात आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.