Climate Change : हवामान बदलाने वाढतेय भुकेची चिंता

Article by Dr. Venkatrao Mayande : जगाची अन्नसुरक्षा ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे जसजशी हवामान बदलाची तीव्रता वाढत जाईल तसतशी भूक, आर्थिक व सामाजिक स्थैर्याची चिंता जगभर वाढत जाणार आहे. हवामान बदलाच्या सर्वाधिक झळा भारत देशाला बसणार असल्याचेही एक अहवाल सांगतो.
Climate Change
Climate ChangeAgrowon

डॉ. व्यंकटराव मायंदे

७७२००४५४९०

Indian Agriculture Weather : जागतिक हवामान बदलाचे संकेत मागील दोन दशकांपासून मिळण्यास सुरुवात झाली व हे संकट पुढे तीव्र होत जाईल, असे अनुमान शास्त्रज्ञांनी जगापुढे ठेवले. याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जग, देश व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू झाले. हवामान बदलावर संशोधन व चर्चा सुरू झाल्या. हळूहळू हवामान बदलाची तीव्रता वाढून आज आपण शेती क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम अनुभवत आहोत.

हवामान बदल हा जागतिक प्रश्‍न असून, त्याचे परिणाम पूर्ण जगभरामध्ये दिसून येतील, असा निष्कर्ष १९७२ मध्येच जागतिक हवामान संस्था (World Meteorological Organization) आणि युनायटेड नेशन्स एन्व्हार्न्मेंटल प्रोग्रॅम (UNEP) यांनी काढला होता. याचे प्रमुख कारण हवेतील कार्बन डायऑक्साइडचे वाढते प्रमाण आहे असे घोषित केले. हवेतील हरितगृह वायू प्रदूषण जसे की कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, हायड्रोप्लोरोकार्बन इत्यादी वायूचे प्रमाण पृथ्वीच्या वातावरणात वाढल्यामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे,

हे संशोधनातून पुढे आले. यांपैकी कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सर्वांत जास्त ४१० पीपीएम असून, हा सर्वांत महत्त्वाचा घटक तापमान वाढीसाठी करणीभूत आहे. सर्वसाधारणपणे सूर्यापासून येणारे उष्णतेचे किरण पृथ्वीवर आदळून वापस वर जातात. परंतु हरितगृह वायू प्रदूषणामुळे हे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वातावरणाच्या थरात अडवले जातात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे तापमान वाढते म्हणजेच जागतिक तापमान वाढ होय.

Climate Change
Climate Change : वर्षभरात सहा चक्रीवादळांनी घातला धुमाकूळ

हवामान बदल (Climate Change) ही सततची नैसर्गिक प्रक्रिया असून, हळूहळू तापमान व हवामान घटक बदलत असतात. परंतु इसवी सन १८०० पासून निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढत आहे. त्यात कोळसा, इंधन तेल व गॅस याचे ज्वलन वाढत आहे. पृथ्वीभोवतालच्या आवरणात हे वायू सोडल्यामुळे तापमान वाढून नैसर्गिक चक्र बदलत गेले. यामुळे पृथ्वीवरील मानवी व इतर जिवांना धोका निर्माण झाला.

जगातील २०२० हे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली. तापमान बदलामुळे पृथ्वी, समुद्र, व बर्फाच्छादित प्रदेश यावर परिणाम होत आहे. त्यामुळे वादळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, अनिश्‍चित पाऊसमान, वादळी वारे, उष्णलहर, गारपीट, शीतलहर, पावसाचे खंड, मातीची धूप व वाळवंट पसरत जात असून सुपीक जमीन घटत आहे. दुष्काळाची वारंवारीताही वाढत आहे.

सध्या हे नियमित घडत असून, त्याचे अनिष्ट परिणाम केवळ शेती उत्पादनावरच नाही तर मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहेत. जागतिक पातळीवर हरित वायू उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण ही प्रक्रियाही संथ गतीने चालणारी आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ हवामान बदल प्रक्रिया समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी संशोधन करीत आहेत. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील तापमान दुपटीने वाढत असून त्यामुळे बर्फ वितळून शास्त्रज्ञांच्या अनुमानांनुसार २१०० पर्यंत समुद्र पातळी १.६ ते ६.६ फूट वाढणार आहे. समुद्र तटावरील काही देश व शहरे उदा. : न्यू यॉर्क, लॉस एंजेल्स, सिडनी, मुंबई ही शहरे व मालदिवसारखे देश बुडण्याची शक्यता वर्तवली आहे.

जगाची अन्नसुरक्षा शेतीवर अवलंबून असल्याने जसजशी हवामान बदलाची तीव्रता वाढत जाईल तसतशी भुकेची, आर्थिक व सामाजिक स्थैर्याची चिंता वाढत जाणार आहे. जमिनीची सुपीकता कमी होत असून, अतिवृष्टीने २० टक्के क्षेत्र प्रभावित होत आहे. पृष्ठभागावरील व पृष्ठभागाखालील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नवनवीन कीड आणि रोगाची तीव्रता वाढली आहे. याचे परिणाम कृषी उत्पादनांवर होऊन सामाजिक आणि आर्थिक घडी बिघडत चालली आहे.

जागतिक अहवालानुसार हवामान बदलाची झळ सर्वांत जास्त भारताला सोसावी लागणार आहे. या अहवालानुसार २०१० ते २०३९ दरम्यान हवामान बदलामुळे ४.५ ते ९ टक्के पिकांच्या उत्पादनात घट होऊ शकते, तसेच २०१७ ते २०९९ या कालावधीत जर हवामान बदलावर मात करण्याचे प्रयोग यशस्वी झाले नाहीत,

तर २५ टक्के पीक उत्पादनामध्ये घट होण्याचे भाकीत केलेले आहे. २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हवामान बदलामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) ०.२ ते ०.५ टक्का घट होऊ शकते. सरासरी तापमानात वाढ झालेली असून, उन्हाळा व हिवाळा अशा दोन्ही हंगामांत तापमान वाढलेले आहे.

Climate Change
Climate Change : ‘एल निनो’ काळामध्ये हवामानातील बदल

२००५ मध्ये मुंबईचा पूर, २००८ मध्ये बिहारचा पूर, यमुना नदीची पातळी वाढून हरियानामध्ये नुकसान, २०१८ मध्ये केरळातला पूर, २०१९ मध्ये चेन्नई शहरास पुराचा तडाखा व त्याच वर्षी नंतर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष हे अलीकडच्या काळात आपण अनुभवले आहे. एका संशोधनानुसार २०५० पर्यंत पश्‍चिम भारताच्या भागात जास्त पाऊस पडेल, मध्य भारतामध्ये दहा ते वीस टक्के पाऊस कमी राहील आणि इतर भागात १० ते २० टक्के पाऊस कमी होईल.

भारतामध्ये पश्‍चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण बिहार, मध्य प्रदेश, दक्षिण गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागांत नियमितपणे दुष्काळ आढळून येत आहे. मे व जून २०१९ दरम्यान याच भागाला उष्णतेचा मारा सहन करावा लागला. त्यामुळे अतोनात नुकसान झाले. २००३ ते २०१८ यादरम्यान आठ दशलक्ष हेक्‍टरवर पीक क्षेत्र हवामान बदलामुळे प्रभावित झाले. एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढ झाल्यास भारतामध्ये चार ते पाच दशलक्ष मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन घटेल, असा अंदाज आहे.

भारतात झालेल्या संशोधनाच्या आधारे १.५ अंश सेल्सिअस तापमान वाढ व थोडासा पाऊस कमी झाला तर भाताचे उत्पादन १५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. सर्वांत जास्त नुकसान हंगामी पिके, फळबागा, पशुधन, कोंबडीपालन व मच्छ उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या अन्नसुरक्षेची चिंता वाढू शकते.

हवामान बदलाच्या परिणामाची दाहकता कमी करण्यासाठी मानवाला नैसर्गिक बदलाला समायोजित (Adjustment) करण्याची गरज आहे. जलसंधारण व मातीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यांपैकी जमिनीच्या पृष्ठभागाखालील मातीचे व्यवस्थापन, संवर्धन सरी, सरी वरंबा, शून्य मशागत, आच्छादन करून पिकांची तीव्रता वाढवावी लागणार आहे.

हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी मातीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन पिकांची फेरपालट, मच्छ उत्पादनवाढ, पशुधन उत्पादकता, कुक्कुटपालन, आधुनिक यांत्रिकीकरण याचे संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे पैलू आहेत. एकंदरीत हवामान बदल हा प्रश्‍न जटिल असून, त्याची व्याप्ती वरचेवर वाढत जात आहे. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक जैव व माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवून मार्ग काढण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे.

(लेखक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com