Agriculture
Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture: अन्न आणि पोषण सुरक्षेची दिशा

Team Agrowon

विभा धवन,

किरण कुमार शर्मा

गेल्या काही दशकांमध्ये अन्न, आहार आणि चारा यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांच्या वाढीमध्ये‌ विज्ञानाने जगभरात प्रचंड प्रगती केली आहे. पिके (Crop) आणि आरोग्य (Health)यंत्रणा या दोन्हींमध्ये सातत्याने विकासपूर्ण लक्षणीय बदल होत असल्याने प्रत्येक सरत्या दशकात नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. तथापि सतत वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच अधिक पोषक आणि सुरक्षितरीत्या उत्पादित अन्नाच्या मागणीमुळे जगभरात अन्नाची गरज वाढली आहे.

तशातच नुकत्याच झालेल्या भू- राजकीय घटनांमुळे मुख्यत्वे नजीकच्या भविष्यकाळातील अन्न आणि पोषणविषयक सुरक्षेबाबतची चिंता गडद झाली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेची सुनिश्‍चितता, निव्वळ उष्मांकांच्याच बाबतीत नव्हे, तर नैसर्गिक स्रोतांचे घटते पोषणमूल्य पाहता, हे एक आव्हान उभे ठाकले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांनी अधिक रोगप्रतिकारक क्षमता असलेली तसेच कमी वेळात जास्त उत्पादन देणारी पिके तयार करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

जनुकीय वृद्धीनुसार वाढत्या मागणीचा वेध घेण्यासाठी पालटून टाकणाऱ्या चित्रात सुधारणात्मक बदल उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने आधुनिक वनस्पती प्रजनन व्यासपीठावर अचूक वनस्पती प्रजनन हाती घेण्यात आले आहे. पारंपरिक प्रजनन पद्धतींच्या आवाक्याबाहेर असणारे उपाय जनुकीय अभियांत्रिकी आणि आता CRISPR यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिले आहे.

पारंपरिक पद्धतींच्या आवाक्यात नसणारी लक्षणीय वैशिष्ट्ये अंतर्भूत करण्यासाठी मार्कर आधारित अचूक प्रजननासारखे कृषी जैव तंत्रज्ञान आणि जीएम तंत्रज्ञान ही वनस्पती प्रजनन कार्यक्रमातील महत्त्वाची आणि यशस्वी साधने ठरली आहेत, हे आवर्जून सांगावेसे वाटते. या तंत्रज्ञान पद्धतींमुळे नंतर शाश्‍वत शेतीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल तसेच नित्यनेमाने होणाऱ्या हवामान बदलांना सक्षमपणे तोंड देता येईल.

भारताच्या संदर्भात, ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून भारत सरकारने कृषी जैवतंत्रज्ञानाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आणि भक्कम साह्य दिले आहे. १९८५ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत वेगळा जैवतंत्रज्ञान विभाग स्थापन करण्यात आला.

भारताला कृषी जैवतंत्रज्ञानात जगातील प्रमुख देशांच्या यादीत नेणे, भारतीय प्रमाणाच्या आवश्यकतेनुसार स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करणे, भारतीय पिकांची हरितक्रांती काळात गाठलेली उत्पादनक्षमता पुन्हा एकदा त्या पातळीवर नेणे आणि भविष्यकालीन अन्नाच्या मागणीसंदर्भात स्वयंपूर्ण होणे तसेच भारताला जगातील प्रमुख अन्न निर्यातदार बनवणे, इत्यादी अनेक उद्दिष्टे यामागे आहेत.

जनुकीय अभियांत्रिकी पिकांची जागतिक बाजारपेठ २०२१ मध्ये १९.७२ अब्ज डॉलर होती, ती ६.९ टक्के वार्षिक वृद्धिदराने २०२२ मध्ये २१.०८ अब्ज झाली आणि २०२६ मध्ये ५.८ टक्के दराने २६.३८ अब्ज डॉलरपर्यंत इतकी वाढेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जागतिक वनस्पती जैवतंत्र क्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल.

जनुकीय अभियांत्रिकी पद्धतीने बनवलेल्या मोहरीच्या व्यापारासाठी मंजुरी अशा काही उपायांमुळे तेलबिया क्षेत्रात शाश्‍वतता येऊ घातली आहे. या आधुनिक आणि व्यापारीकरण करता येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे जैवतंत्र पिकांच्या मोठ्या उभरत्या बाजारपेठेतील प्रमुख जागतिक भूमिका भारताच्या वाटेला येईल, असा अंदाज आहे.

भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील या प्रकारचे नवीन संशोधन म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी पद्धतीचे मोहरीचे वाण - नुकतीच मान्यता मिळालेली धारा मोहरी संकरित - ११ (DMH-11). भारतात प्रामुख्याने राजस्थान, हरीयाणा, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सुमारे ६ ते ७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर मोहरीची लागवड होते.

भारत आपल्या गरजेपैकी अंदाजे ५५ ते ६० टक्के खाद्यतेलाची आयात करतो. २०२०-२१ मध्ये १.१७ लाख कोटी रुपये मूल्याचे सुमारे १३.३ दशलक्ष टन खाद्यतेल आयात करण्यात आले. यामागील मुख्य कारण म्हणजे १ ते १.३ टन प्रति हेक्टर अशी मोहरीच्या तेलबियांची कमी उत्पादन क्षमता. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात ही उत्पादनक्षमता स्थिर राहिली आहे. एकाच प्रजातीच्या जनुकीयदृष्ट्या दोन वेगळ्या वनस्पतींचा संकर घडवून कोणत्याही एका वनस्पती पालकापेक्षा अधिक उत्पन्न देणारी वनस्पती मिळवण्यासाठी वनस्पती संकर पद्धतीचा अवलंब केला जातो.

मोहरी हे स्वपरागीभवन होणारे पीक असल्याने शाश्‍वतता आणि अधिक उत्पादन यात अधिक गुणवत्ता देणारा संकर घडवून आणणे वनस्पती गुणकांसाठी अवघड ठरते. डीएमएच - ११ ही वरुणा आणि अर्ली हिरा - २ या जातींच्या संकराची फलश्रुती असून, ती केवळ अधिक उत्पादन देणारीच नव्हे तर अधिक गुणकारीदेखील आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरात आठ ठिकाणी समन्वयाने घेतलेल्या चाचण्यांमधून हे उघड झाले आहे, की डीएमएच - ११ चे उत्पन्न पालक वरुणापेक्षा २८ टक्के अधिक, तर क्षेत्रीय चाचण्यांपेक्षा ३७ टक्के अधिक आहे.

लक्षणीय बाब म्हणजे जनुकीय अभियांत्रिकी पद्धतीने संकरित जात डीएमएच - ११ हिचा विकास स्वतःचा अंत न दाखवता जनुकीय अभियांत्रिकीशी निगडित असलेल्या संकरित पद्धतीचे यश दृग्गोचर करते. या तंत्रज्ञानात बार, बार्नेज आणि बारस्टार जनुक पद्धत अंतर्भूत आहे. बार्नेज जनुक पुल्लिंगी वंध्यत्वाचे कारण ठरतो तर बारस्टार जनुक प्रजननक्षमता बहाल करून प्रजननक्षम बियाण्यांची निर्मिती सुनिश्‍चित करतो.

तिसरा जनुक बार हा ग्लुफोसिनेटला प्रतिकार करतो. यामुळे विकसित तंत्रज्ञानाचे फायदे केवळ डीएमएच - ११ पुरते मर्यादित राहत नाहीत तर भारताच्या वाढत्या खाद्यतेल आयातीचे बिल कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नवीन संकरित जातींच्या विकासासाठी आश्‍वासक तंत्रज्ञान ठरते.

याचमुळे अशा नवनवीन तंत्रज्ञान पद्धती भारताला प्रमुख अन्न पुरवठादार बनवून भारतीय कृषिक्षेत्राचे चित्र पालटून टाकण्यास कारणीभूत ठरू शकतात. यासाठी नवोन्मेषाचे आकर्षक वातावरण तयार झाले पाहिजे आणि भारताला त्या दिशेने मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

भारतीय विज्ञानाने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवला आहे, तसेच स्टार्टअप वातावरणाचा चांगला फायदा उठवून नवीन आव्हानांवर सहज मात करता येते. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी तत्सम साधनांची निर्मिती करता येते, हे कोविड-१९ महामारीत लसनिर्मितीतून भारताने जगाला दाखवून दिले आहे.

(विभा धवन या टेरी - द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीच्या महासंचालक आणि किरण कुमार शर्मा हे शाश्‍वत शेती - टेरीचे कार्यक्रम संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT