Goat-Sheep Farming Village : गावखेड्याच्या भाषेत मेंढपाळाला ‘मेंडक्या’ म्हणतात. ढवळपुरीच्या काही मेंडक्यांना बोलते केले. ‘‘जित्राबं (मेंढ्या) म्हणजी आमचं सर्वस्व. पिढ्यान््पिढ्या चालत आलेला व्यवसाय आमी जपतोय.
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचा बराच भाग डोंगराळ आहे. शेतीसाठी पाणीच नसल्याने पशुपालन हाच मुख्य व्यवसाय. ढवळपुरी, धौत्रे खुर्द, धोत्रे बुद्रुक, ढोकी, वनकुटे, गाड्याचा झाप, वडगाव सावताळ, गाजदीपुर, वावरथ, जांभळी यांसारख्या तालुक्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील आठ ते दहा गावांत लोक मेंढी व शेळीपालनाला अधिक प्राधान्य देतात.
त्यात अग्रभागी आहे ते ‘ढवळपुरी’ गाव. नगरहून कल्याण रस्त्याने जाताना भाळवणी गाव सोडले की ढवळपुरीचा परिसर लागतो. मुख्य रस्त्यावरून आत प्रवेश केला, की मेंढपाळाच्या गावाच्या विशिष्ट खुणा दिसू लागतात. मुख्य रस्त्यापासून सुमारे पाचेक कि.मी. आत गेल्यावर लागते ढवळपुरी गाव.
डोक्यावर लालभडक पटका, खांद्यावर घोंगडी, धोतराची लुंगी आणि हातात काठी अशा पेहरावातील रुबाबदार माणसं दिसू लागतात. प्रामुख्याने येथील धनगर समाज मेंढ्याचे पालन करतो. ढवळपुरी आणि परिसरातील दहा ते बारा गावांत मिळून पाच लाखांच्या वर मेंढ्या व पन्नास हजाराच्या घरात शेळ्या आहेत.
नाकासमोर पाहत चरत जाणाऱ्या मेंढ्याच्या कळपात एक, दोन तरी शहाण्या शेळ्या असतातच. पण अलीकडे कळपातील शेळ्यांची संख्या वाढत आहे. दोघांची एकत्रित चराई ढवळपुरीसह परिसरातील डोंगराळ, चराई क्षेत्रात होते. इथे गवत, खुरट्या वनस्पती वाढलेल्या असतात. या भागात प्रामुख्याने गावरान, विजापुरी आणि बेरड या जातीच्या मेंढ्याचे तर संगमनेरला व उस्मानाबादी शेळ्याचे पालन करण्याला मेंढपाळ भर देतात.
मेंढीपालनातूनच उदरनिर्वाह...
सुमारे तेरा हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेले ढवळपुरी हे मेंढपाळाचे गाव म्हणूनच ओळखले जाते. बहुतांश कुटुंबे मेंढी-शेळीपालनात गुंतलेले आहेत. या परिसरातील धोत्रे खुर्द, धोत्रे बुद्रुक, ढोकी, वनकुटे, गाड्याचा झाप, वडगाव सावताळ, गाजदीपूर, वावरथ, जांभळी अशा
नऊ-दहा आणि लागूनच असलेल्या साकुर (ता. संगमनेर) भागातील चारेक गावातील सहा हजारांपेक्षा अधिक कुटुंबे मेंढीपालन करतात. ढवळपुरी आणि परिसरातील सुमारे चाळीस टक्के कुटुंबे भूमिहीन असून, मेंढीपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच उदरनिर्वाह चालतो. एक मेंढी साधारण दीड वर्षात दोनदा पिलाला जन्म देते.
एका मेंढीचे आठ ते नऊ वर्षांचे आयुष्य. साधारण चार ते साडेचार महिन्यांच्या पिलांची विक्री होती. केवळ मेंढ्याच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधीची उलाढाल होते. बाजारात काही ठिकाणी नगावर, तर काही ठिकाणी किलोवर विक्री होते. मेंढपाळाच्या मेंढ्याच्या कळपात साधारण पाच ते सात टक्के शेळ्याही आहेत. मेंढीपालनाला चालना देणारा, पारंपरिक व्यवसाय जपणारे गाव म्हणून ढवळपुरीची राज्यात ओळख आहे.
(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)
अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.