Desertification Agrowon
ॲग्रो विशेष

Desertification : वाळवंटीकरणाच्या दिशेने वसुंधरेचा प्रवास

Environmental Crisis : रियाध या सौदी अरेबियातील शहरात संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे नुकतीच वाळवंटीकरण विरोधी एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेच्या अहवालात म्हटले आहे की यापुढे आपल्या वसुंधरेचा झाकलेला भूभाग वगळता तब्बल तीन चर्तुथांशापेक्षाही अधिक भागास वाळवंटीकरणाच्या दिशेने दुःखद प्रवास करावा लागणार आहे.

डॉ. नागेश टेकाळे

Global Warming : निसर्ग विषयक समस्या गडद होऊ लागली, प्रजेवर त्याचा परिणाम होऊ लागला, अन्न आणि जल सुरक्षा संकटात सापडली की शासन तज्ज्ञ लोकांची समिती नेमून त्या समस्येवर अहवाल सादर करण्यास सांगते. अशा तज्ज्ञ समितीचे अनेक अहवाल फेटाळलेही जातात आणि त्यावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया जातात. पश्चिम घाटावरचा अहवाल फेटाळला गेला. तो स्वीकारला असता तर माळीन, वायनाड सारख्या घटना घडल्याही नसत्या, जीवितहानी टळली असती.

रियाध या सौदी अरेबियातील शहरात संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे नुकतीच वाळवंटीकरण विरोधी एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेचा समारोप १३ डिसेंबरला झाला. या परिषदेचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की यापुढे आपल्या वसुंधरेचा सावली अथवा झाकलेला भूभाग वगळता तब्बल तीन चर्तुथांशापेक्षाही अधिक भागास शुष्क अवस्थेबरोबरच वाळवंटीकरणाच्या दिशेने दुःखद प्रवास करावा लागणार आहे.

अर्थात या परिस्थितीस वातावरण बदल, वाढते उष्णतामान जेवढे जबाबदार आहे त्यापेक्षाही आपण सर्वच जास्त कारणीभूत आहोत. या परिषदेत भाग घेतलेले शास्त्रज्ञ १९७० ते २०२० असे मागील ५० वर्षांच्या कालखंडावर प्रभावीपणे आपले विचार मांडत होते. या तज्ज्ञांच्या मते जमिनीच्या वाळवंटीकरणास १९७० पासून सुरुवात झाली आणि पुढील प्रत्येक दशकात ते दुपटीने वाढू लागले. याच पद्धतीने जमिनीचे वाळवंटीकरण या शतकाच्या अखेरपर्यंत असेच वाढू लागले तर पृथ्वीच्या ८०० कोटी लोकसंख्येपैकी तब्बल ५०० कोटी जनता भविष्यात सर्वांत जास्त प्रभावित होणार आहे. ज्यामध्ये गरीब राष्ट्रामधील जनतेस अन्नपाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे.

विशेषतः युरोप, पश्चिम अमेरिका, ब्राझील, पूर्व आशिया आणि मध्यवर्ती आफ्रिकेमध्ये याचा प्रभाव निश्चितच जास्त असणार आहे. आज आपल्या देशाचेच उदाहरण समोर ठेवता आपणास आढळते की १९७० च्या दशकात हरितक्रांतीद्वारे देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर सुरु झाला. ही खते वापरली की उत्पादन अनेक पटीने वाढते, हे शेतकऱ्‍यांच्या लक्षात आल्यामुळे प्रा. नॉर्मन बोरलॉग आणि भारतरत्न डॉ. स्वामिनाथन यांनी नंतर विरोध करुनही शेतकऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही.

आज आपण पंजाबमधील शेतजमिनीचे वाळवंट आणि तेथील ८०० फूट खोल गेलेली भूजल पातळी पहातच आहोत. वाळवंट हे आपल्या पृथ्वीवरील सर्वांत मोठे कोरडे क्षेत्र आहे, ज्यामध्ये पाणी फारच कमी असते. तेथील जीवांना जगण्यासाठी ते तेवढेच स्पर्धात्मक अवघड ठिकाण आहे. वाळवंट म्हणजे वाळूने व्यापलेला एक मोठा भूप्रदेश जेथे पर्जन्यमान अतिशय कमी म्हणूनच वृक्ष संख्याही कमी असते आणि म्हणूनच पाऊस कमी पडतो.

पृथ्वीच्या भूभागाचा सुमारे ३३ टक्के भाग वाळवंटाचा आहे, जो प्रत्येक खंडात विभागला गेला आहे. वाळवंट हे निसर्गसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. जो निसर्ग नियमांचे हजारो, लाखो वर्षांपासून पालन करत आहे. मात्र, वातावरणीय बदल, वाढते उष्णतामान आणि मानवी हव्यासामधून हा ३३ टक्के वाळवंटी भूभाग आज ५० टक्के होण्याकडे प्रवास करत आहे. याच एका ‍मुद्यावर या वाळवंटीकरण विरोधी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जेवढे वाळवंटीय क्षेत्र वाढणार तेवढे शेतीचे क्षेत्र कमी होणार, धान्य पिकांची कमतरता सुरु होणार. अन्न नाही, पाणी नाही म्हटले की स्थलांतर अनिवार्य होते.

आफ्रिकेमधील अनेक गरीब राष्ट्रे पुढील ५० वर्षांत रिकामे होण्याची दाट शक्यता आहे, पण दुर्दैवाने या प्रश्नाचे गांभीर्य अजूनही आपल्या लक्षात येत नाही. संतांनी म्हटले आहे, ‘‘जेथे भोग सुरु होतो तेथे निसर्ग मागे हटू लागतो.’’ निसर्ग एकटा कधीच मागे हटत नाही, त्याच्याबरोबर त्याने सांभाळलेली जैवविविधताही मागे हटू लागते. जेव्हा एक पूर्ण वाढीचा वृक्ष निर्दयतेने कापला जातो, तेव्हा त्याच्याबरोबर लाखो जीवजंतू नष्ट होतात. वृक्षाने सांभाळलेली सावली, त्याखालची सुपीक माती नष्ट होते. तेथे वाळवंटीकरणाची पहिली ठिणगी पडते, जिचे रूपांतर शेवटी ज्वालेतच होते.

जमिनीच्या वाळवंटीकरणास आपण जबाबदार आहोत का? याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते वापरल्यामुळे माती हलकी होते, वादळवारे आल्यावर तिच्या वरचा थर हवेत उडतो. कारण सूक्ष्म मृदा कणांना धरून ठेवणारे जिवाणूंचा तिच्यात नसतात. उडून गेलेल्या मातीच्या खाली वालुकाकण दिसतात, हीच वाळवंटीकरणाची सुरुवात असते. अशा वाळू मिश्रित जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असतो. अशी जमीन रासायनिक खतांना तेवढा प्रतिसाद सुद्धा देत नाही.

शेत जमिनीवर कमी होत असलेली वृक्ष संख्या वाळवंटीकरणाची सुरुवात असते. खोल गेलेले भूजल हे वाळवंटीकरणाचे दर्शक आहे. जेव्हा शेतजमिनीत सूक्ष्म वालुकाकणांचे प्रमाण जेमतेम पाच टक्के असते तेव्हा पिके वेगाने वाढतात. मुळांना प्राणवायू भरपूर मिळतो. मात्र, जेव्हा हे प्रमाण वाढू लागते तेव्हा पिकांना दिलेले पाणी जिरून जाते, कडक उन्हामध्ये जमीन भाजून निघते. पिके करपून जातात. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्‍याने आपली जमीन वाळवंटीकरणाकडे जात तर नाही ना, याची खात्री करणे आवश्यक आहे.

या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आयोजकांनी कृषी क्षेत्रासाठी धोक्याची घंटाच वाजवली आहे. कारण वाळवंटीकरणाचा सर्वांत मोठा फटका कृषिक्षेत्र आणि त्यास जोडलेल्या अन्नसुरक्षेला बसणार आहे. वाळवंटीकरण फक्त कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित नसल्यामुळे भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक सुधारणांना खीळ बसून आपल्या विकास पर्वास धक्का बसू शकतो. शेतीवर अवलंबून असलेल्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची गणिते चुकून तेथे गरिबीचा महापूर येऊ शकतो, ज्यामध्ये हातावर पोट असलेले सहज वाहून जाऊ शकतात.

म्हणूनच वाळवंटीकरणाचे अभ्यासक म्हणतात, शेतीचा सर्वांत वरचा थर प्राणपणाने जपा, बांधावर मुबलक वृक्ष लावा. कारण जेथे वृक्ष सावली तेथे जैव विविधतेची श्रीमंती वाढून वाळवंटीकरण थांबवले जाते. शेत जमिनीस जास्त उघडे ठेवू नका, कायम ती हिरवाईने आच्छादित राहू द्या. रासायनिक खते कमीत कमी वापरा, सेंद्रिय कर्ब आणि मातीमधील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करा.

पिकांची फेरपालट करा. एकदल आणि द्विदल पीक पेरणीचे महत्त्व समजून घ्या. पिकांचे अवशेष ज्या जमिनीवर ते पीक घेतले आहे, त्या जमिनीच्याच मालकीचे असतात, ते तिला परत द्या. परिसरामधील डोंगर फोडू नका, नद्यांना कोरडे करू नका, जमिनीत पाणी मुरवा, आत प्लॅस्टिक जाणार नाही याची काळजी घ्या. ही आंतरराष्ट्रीय परिषद आपणास एकच महत्त्वाचा संदेश देते तो म्हणजे - ‘आयुष्याचे वाळवंट होण्यापासून वाचविण्यासाठी सर्वप्रथम शेत जमिनीचे वाळवंटीकरण थांबवणे जास्त गरजेचे आहे.’

(लेखक शेती-पाणी-पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Animal : गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट

Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा

Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे

Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

SCROLL FOR NEXT