Goat Rearing Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Farming : परदेशातील नोकरी सोडून गावी अभ्यासपूर्ण शेळीपालन

Team Agrowon

राजकुमार चौगुले

Goat Management : परदेशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी सोडून दीपक पाटील शिवारे (जि. कोल्हापूर) या आपल्या गावी परतले. व्यावसायिक शेती करायची हेच पक्के केले होते. त्यातील अनुभव शून्य असला तरी प्रशिक्षण, अभ्यास, धाडस व पद्धतशीर नियोजनातून दुर्गम, डोंगराळ भागात ७० शेळ्यांचा फार्म त्यांनी उभारला आहे. व्यवसायात प्रगती आहेच. पण एक हजार शेळ्यांचा फार्म हे उद्दिष्ट घेऊन या युवकाची वाटचाल अभ्यासपूर्ण पद्धतीने सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हा दुर्गम, डोंगराळ तालुका आहे. तुकड्यांची शेती व उन्हाळ्यात पाण्याची सोय नसल्याने बहुतांशी शेतकरी भात, नाचणीवरच अवलंबून असतात. काही प्रमाणात ऊस आहे. दुग्ध वगळता शेतीपूरक अन्य व्यवसायांना मर्यादा आहेत. मात्र याच तालुक्यातील शिवारे येथील दीपक पाटील (वय ४१) यांची शेती व पूरक व्यवसाय जिल्ह्यासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरू पाहतो आहे.

परदेशातील नोकरी सोडून शेती

‘डिप्लोमा इन इन्स्ट्रूमेंशन’ हे शिक्षण घेतलेले दीपक १३ वर्षे ब्रुनेई दारुसलाम येथे नोकरीत होते. मलेशिया व इंडोनेशियाच्या सीमेवर हे गाव आहे. नोकरीत स्थैर्य व आर्थिक प्राप्ती चांगली होती. पण गावी जाऊन शेतीतच करिअर करायचे व शेती व्यावसायिकच करायची हे पक्के केले होते. सुमारे चार वर्षांपूर्वी दीपक गावी परतले. शेती दीड एकरच होती. तेवढी पुरेशी नसल्याने गावापासून जवळ मलकापूर- विशाळगड मार्गावर म्हाळसवडे येथे डोंगराळ, उताराची १३ एकर जमीन घेतली.


पहिले एक वर्ष ती विकसित व लागवडयोग्य करण्यात गेली. केवळ पिके घ्यायची नाहीत तर जोखीम कमी करण्यासाठी व पर्यायी उत्पन्नस्रोतांसाठी एकात्मिक शेती व त्यात पोल्ट्री व शेळीपालन करायचे ठरविले. शेतीतला अनुभव शून्य. पण अभ्यास व प्रशिक्षणातून पुढे जाऊ शकतो हा विश्‍वास होता. मग तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील कृषी विज्ञान केंद्रातून शेळीपालन प्रशिक्षण घेतले.

तब्बल १३९ फार्म्सना भेटी

दीपक यांनी राज्यातील तब्बल १३९ शेळी फार्म्सना भेटी देत त्यातील बारकावे, संगोपन, मार्केटिंग, अर्थशास्त्र, कोणते फार्म बंद पडले, कोणते कसे व का सुरू राहिले याचा अभ्यास केला. त्यानंतरच आपल्या फार्म उभारणीची दिशा मिळाली. मित्र रामचंद्र पाटील, विक्रम पाटील व नारायण घोडे व हितचिंतक अशोक थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले.

आजचे शेळीपालन- ठळक बाबी

-अर्धबंदिस्त, मचाण (उंचावरील) पद्धतीचे २२५० चौरस फूट आकाराचे शेड. या पद्धतीमुळे
शेळ्यांच्या लेंड्या, मूत्र लाकडी फ्लोअरवर न पडता जमिनीवर पडते. शेड स्वच्छ राहते. पुढे हे खत वेचणे सोपे होते. शेळ्यांना मोकळे फिरणे सोपे होते.
-तीन ते चार वर्षांपूर्वी १० शेळ्यांपासून सुरुवात. सध्या एकूण संख्या ७०. उस्मानाबादी, आफ्रिकन बोअर, बीटल्‍स हे ब्रीड्‌स.
-चारा, पाण्यासाठी स्वतंत्र सोय. चाटण विटांची सुविधा.
-शेडमध्ये सीसीटीव्ही. शेजारी २५ गुंठे मोकळी जागा. जाळी मारुन हा परिसर सुरक्षित. तेथे शेळ्यांना फिरायला सोडले जाते.
-प्रत्येक शेळीचे टॅगिंग. त्यानुसार औषधे, गाभणकाळ व अन्य माहितीची संगणकीय नोंद व ‘अपडेशन’.
-प्रशिक्षण अभ्यासक्रमातून शेळ्यांची पैदास व आरोग्याविषयक बाबी समजावून घेतल्या. त्यादृष्टीने ठरावीक औषधांचा साठा. गरजेनुसार
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत. पैदाशीसाठी बीटल्स व उस्मानाबादी असे दोन नर. दोन मागविले आहेत.

चारा व्यवस्थापन

-सुरुवातीला चारा विकत आणला. पण खर्च खूप होऊ लागला. मग विविध ठिकाणी
भेट दिलेल्यांपैकी शेळीपालकांकडून मार्गदर्शन घेतले.
-त्यातून चार एकरांत सुपर नेपिअर, साडेतीन एकरांत तुती, ३५ गुंठे मेथीघास, ३० गुंठे दशरथ घास व शेवरी अशी लागवड. सुमारे ६० टक्के नेपियर, २० टक्के तुती, १० टक्के दशरथ आणि मेथी घास आणि इतर टक्क्‍यांमध्ये शेवरी, सुबाभूळ आदींचे मिश्रण.
-सकाळी नऊच्या दरम्यान शेळीला वजनानुसार प्रत्येकी दीड किलो सुका चारा (तुरीचे भुस्‍कट, भुईमूग पाला आदी) दिला जातो. मका, सोयाबीन, सरकी पेंड, मीठ, मिनरल मिक्शर आदींचाही खुराक. संध्याकाळी चारच्‍या सुमारास सकाळचे खाद्य पुन्हा दिले जाते.
-खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी फीडमिल उभारण्याचे प्रयत्न सुरू.

विक्री व्यवस्था

शेळीपालनाआधी गावरान कोंबडीपालन सुरू केले होते. यात दोनहजार ते पाच हजार पक्ष्यांची बॅच घेतली.
त्या वेळी अंडीविक्रीची जाहिरात केली होती. बाजारपेठेपेक्षा कमी किमतीने कोंबड्यांची विक्री केल्याने ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. काही कारणांमुळे कोंबडीपालन पुढे म्हणावे तसे यशस्वी झाले नाही. पण त्या वेळचे विक्रीसाठीचे प्रयत्न व जोडलेले ग्राहक शेळ्यांच्या विक्रीकामी आले. आज पालव्याची विक्री प्रति किलो ३७० रुपये, तर पाटीची ३५० किलो दराने विक्री होते. इथेही बाजारपेठेपेक्षा कमी दर ठेवल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी असते. पण तेवढा पुरवठा करण्याएवढ्या शेळ्याच उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.

आश्‍वासक उलाढाल

आज वर्षाला सुमारे सात लाख रुपयांची उलाढाल करण्यापर्यंत मजल मारली आहे. वर्षाला १३ ट्रॉली
लेंडीखतही मिळते. सध्याच्या १५ एकरांवरून २२ एकर व एकहजार शेळ्यांचे संगोपन तसेच पर्यावरणपूरक कृषी पर्यटन हे उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल सुरू आहे. थोडे थोडे भांडवल गुंतवत हळूहळू प्रगती करण्यावर त्यांचा विश्‍वास आहे. तीन पुरुष व एक जोडपे यांना रोजगार दिला असून, त्यांना आवश्‍यक प्रशिक्षणही दिले आहे. आई लक्ष्मी, वडील भगवान, पत्नी रचना, सासरे बाळासाहेब आजगेकर, मामा विश्‍वास कदम आदींचे मोठे पाठबळ दीपक यांना आहे. सुमारे अडीच एकरांत लिंबू बाग व एका टॅंकमध्ये खेकडापालन सुरू आहे. कोल्हापूर येथे १५० रुपये प्रति किलो दराने खेकड्यांची विक्री झाली तरी किफायतशीर ठरेल असे दीपक यांना वाटते.

दीपक पाटील, ७०३००४२४१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT