नोकरी सोडून साकारली घरच्या गूळ व्यवसायाची वृद्धी

अकोला जिल्ह्यात कुरूम गावातील रशीद कुटुंबाने आपली शेती सांभाळण्यासह ऊसशेती (Sugarcane Farming) व गुऱ्हाळ (Jaggery Business) व्यवसायाला चांगली चालना दिली आहे. कुटुंबातील युवा पिढीचे तन्वीर यांनी मुंबई येथील नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती व्यवसायालाच वाहून घेतले आहे. गुळाचे ‘मार्केट’ वाढवत वार्षिक उलाढाल ४० लाखांवर पोहोचवली आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon
Published on
Updated on

कुटुंबाने सुरू केलेला एखादा शेतीपूरक (Agriculture Baced ) व्यवसाय परिघाबाहेर काढून त्याचा विस्तार करण्यासाठी एक तरुण मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावी परततो. घरच्या शेतीमालाला आपल्या ‘मार्केटिंग’च्या कौशल्याचा व अनुभवाचा आधार देतो आणि पाहता पाहता हा व्यवसाय नावारूपाला येतो. दुसऱ्यांकडे चाकरी पत्करण्यापेक्षा हा व्यवसाय नोकरी देणारा बनतो. ही गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातील कुरुम गावातील रशीद यांच्या कुटुंबातील.

शेतीतून प्रगती

मूर्तिजापूर तालुक्यातील या कुरुम गावात अब्दुल शकील अब्दुल रशीद यांचे एकत्रित कुटुंब राहते. शेतीत ते झोकून देऊन काम करतात. पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांवर जोर देणारी पीकपद्धती त्यांनी अंगीकारली आहे. त्यांची ३० ते ३५ एकर शेती आहे. तालुक्यातील हा भाग शेतीसाठी अनुकूल समजला जातो. हे कुटुंब इतरांचीही ३० एकर शेती भाडेतत्त्वावर करते. सन १९९६ पासून या कुटुंबाने उसाचे पीक (Sugarcane Crop) जोपासले आहे. सुरुवातीला उसाची हातविक्री केली जायची. यातून पैसा मिळत असला तरी श्रम अधिक पडतात. उत्पन्नस्रोत वाढवण्याच्या दृष्टीने कुटुंबाने २०१५ पासून गुऱ्हाळ सुरू केले. घरगुती पद्धतीने गूळ तयार करून विक्री सुरू केली. टप्प्याटप्प्‍याने त्यात वृद्धी करण्यास सुरुवात केली.

तरुण पिढीच्या हाती सूत्रे

अब्दुल शकील यांचा मुलगा तन्वीर एमबीए पदवीप्राप्त आहे. मुंबईत सुमारे १० वर्षे एका कंपनीत क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून त्यांनी अनुभव घेतला. मात्र मुंबईपेक्षा आपल्या कुटुंबाने सुरू केलेल्या गुळाच्या व्यवसायात अधिक वाव दिसू लागला. कुटुंबीयांसमवेत चर्चा करून तन्वीर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. आपल्या अनुभवाचा व कौशल्याचा वापर घरच्या व्यवसायासाठी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न सुरू केला. केवळ गूळनिर्मितीपर्यंत मर्यादित न राहता त्यापासून विविध पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. आता व्यवसाय चांगल्या प्रकारे आकारास येत आहे. मुख्य म्हणजे तन्वीर यांनी विपणनाची (मार्केटिंग) जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे सांभाळली आहे.

आश्‍वासक उलाढाल

गेल्या सात ते आठ वर्षांच्या काळात व्यवसायात चिकाटी ठेवत वर्षाला जवळपास १२०० क्विंटलपर्यंत गूळ उत्पादनाचा पल्ला गाठला आहे. रिटेल विक्रीसाठी एक किलो, १० किलोची भेली (ढेप) तयार केली जाते. कुरूम गावापासून अमरावती बाजारपेठ जवळ आहे. साहजिकच येथे तसेच नागपूर, अकोला बाजारपेठेत अधिकाधिक बाजारपेठ मिळवली आहे. शिवाय ऑनलाइन ऑर्डर्स ही मिळू लागल्या आहेत. गुळासाठी ऊस घेताना भले तो शंभर टक्के सेंद्रिय शेतीतील नसेल, पण गूळनिर्मिती मात्र रसायन विरहित करण्यावर भर असतो. नैसर्गिक चव व रंग त्यास लाभला आहे. त्यामुळे दरसुद्धा एक-दोन रुपयांनी अधिक मिळतो.

‘एएसजे जॅगरी’ ब्रँड

गूळनिर्मितीत ‘सिंगल पॅन टेक्नॉलॉजी’चा वापर केला आहे. त्याची उत्पादनक्षमताही वाढली आहे. या गुळाला बाहेरच्या राज्यातून मागणी आहे. परंतु तेवढा पुरवता करणे सध्या शक्य नसल्याचे तन्वीर सांगतात. बाजारपेठेतील मागणी पाहून गूळ पावडर, छोटे क्यूब (५ ते १० ग्रॅमचे), काकवी अशी श्रेणी वाढवली आहे. सर्व उत्पादनांच्या किमती बाजारपेठेच्या बरोबर आहेत. एक किलो गुळाचा होलसेल दर सुमारे ४५ रुपये आहे. हाच गूळ १० किलो स्वरूपात घेतला तर तो अजून कमी दरांत उपलब्ध केला जातो. गूळ पावडरीच ग्राहक दर १०० रुपयांपर्यंत आहे. वर्षाला सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांपर्यंत उलाढाल होण्यापर्यंत मजल मारल्याचे तन्वीर सांगतात. तन्वीर यांना तीन काका आहेत. तिघांच्या आद्याक्षरापासून म्हणजे ए- अकील, एस- शकील आणि जे- जमील याप्रकारे एएसजे असा गुळाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. याच नावाने शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. मूर्तिजापूर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामकाज होणार आहे.

उसाची उपलब्धता

गुऱ्हाळ अखंडपणे सुरू राहावे यासाठी उसाची लागवड टप्प्याटप्प्याने केली जाते. स्वतःच्या सुमारे ३० ते ३५ एकरांत ऊस आहेच. शिवाय अन्य शेतकऱ्यांकडूनही तो घेण्यात येतो. जानेवारी-फेब्रुवारीपासून गुऱ्हाळ सुरु होते. या ठिकाणी काम करण्यासाठी २५ जणांना रोजगार मिळाला आहे. सुमारे सहा महिने हा रोजगार मिळतो. को ८६०३२ या जातीचा ऊस उपलब्ध केला जातो. त्याचा उतारा व गोडवाही चांगला मिळतो. अन्य ऊस उत्पादकांनाही गरजेनुसार गूळ बनवून देण्यात येतो.

व्यावसायिक शेती

गुळाचा हंगाम वर्षभर नसल्याने वर्षभर उत्पन्न मिळवण्याचा दुसरा मुख्य स्रोत शेतीतच तयार केला आहे. कराराने घेतलेल्या शेतीत सुमारे २० एकरांत हरभरा असतो. एकरी सरासरी आठ क्विंटल उत्पादकता आहे. मागील वर्षापासून कलिंगड व खरबुजाची शेती सुरू केली आहे. यंदा सहा एकरात लागवड आहे. सन २०२० मध्ये दोन एकरांतून पाच लाखांचे उत्पन्न मिळाल्यानंतर या पिकांबाबतचा आत्मविश्‍वास वाढला आहे. गावात आजमितीला ३० एकरांपेक्षा अधिक कलिंगड लागवड झाली आहे. काकडी तसेच उसात कलिंगड घेतले आहे.

संपर्क ः तन्वीर अहमद, ८०८७७३३९८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com