Parbhani News : परभणी जिल्ह्यातील सिंचन स्रोतांना पुरेसे पाणी नाही त्यामुळे यंदा (२०२३-२४) कांदा, टोमॅटो, बटाटा या पिकांच्या लागवड क्षेत्रात गतवर्षी (२०२२-२३) च्या तुलनेत २५४ हेक्टरने घट झाली आहे. शुक्रवार (ता. १२) पर्यंत या तीन पिकांची मिळून एकूण ५१० हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यात कांदा २७७ हेक्टर, टोमॅटो २१० हेक्टर, बटाटा २३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात अलीकडील काही वर्षात सिंचन विहिरी, विंधन विहिरींची संख्या वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाच्या शेततळ्याद्वारे संरक्षित पाणीसाठा निर्माण केला आहे. सिंचनासाठी विविध पर्याय उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा बागायती पिकांकडे वाढला आहे. दररोजचे उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांच्या लागवड क्षेत्रात गेल्या अलीकडील वर्षात वाढ झाली आहे.
कांदा, टोमॅटो या पारंपारिक पिकांसोबत गेल्या दोन चार वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी बटाट्याचे उत्पादन घेत आहेत. परंतु गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे विहिरी, विंधन विहिरी, लघू तलाव, मध्यम प्रकल्प, तसेच मोठ्या प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत अंत्यत कमी पाणी उपलब्ध आहे.
उपसा, बाष्पीभवन आदी कारणांमुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट होत आहे. अनेक भागातील विहिरींनी तळ गाठला आहे.तलाव कोरडे पडले आहेत. जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव या मोठ्या प्रकल्पांसह मासोळी, करपरा हे मध्यम प्रकल्प तसेच लघू तलावातून यंदा सिंचन आवर्तने नाहीत. त्यामुळे यंदा कांदा, टोमॅटो, बटाटा या पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे.
जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये कांद्याची ५५०.८० हेक्टर, टोमॅटोची १६१.३० हेक्टर, बटाट्याची २६ हेक्टर अशी एकूण ७३८ हेक्टरवर लागवड झाली होती.२०२२-२३ मध्ये कांद्याची ५७१ हेक्टर, टोमॅटोची १६३ हेक्टर, बटाट्यांची ३० हेक्टर अशी या तीन पिकांची मिळून एकूण ७६४ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा या तीनही पिकांच्या क्षेत्रात २५४ हेक्टरने घट झाली आहे. तसेच विविध पालेभाज्या, वेलवर्गीय, शेंगवर्गीय भाजीपाला, मिरची, लसूण, आदी पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत विहिरींना पाण्याची उपलब्धता कमी आहे.त्यामुळे कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. पाण्याअभावी उन्हाळी भाजीपाल्याचे उत्पादन घेणे शक्य होणार नाही.-माणिकराव सुर्यवंशी, सिंगणापूर, ता. जि. परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.