अभिजित घोरपडे
Western Ghats Trails: नाणेघाट हे माझे आवडीचे ठिकाण. माझ्याप्रमाणेच ते अनेकांना वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत असेल. मला आवडायचे कारण म्हणजे, तिथे मला जवळ जवळ २२०० वर्षांचा, सातवाहन काळखंडापासूनचा, इतिहास माहीत झाला; त्याहून महत्त्वाचे म्हणजे- त्याला घडवणारा भूगोलसुद्धा तिथेच सापडला!
नाणेघाट पहिल्यांदा पाहिला तो फोटोमध्ये. तेव्हा त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. प्राचीन व्यापारी मार्गावरील हा अतिशय महत्त्वाचा घाट. कोकणातून वर देशावर यायचे म्हणजे तब्बल ६०० ते ८०० मीटर उंचीचा टप्पा चढून यावे लागते. इतका उंच टप्पा ओलांडणे घाटांमुळेच शक्य बनले. खरे तर कोकणात उतरण्यासाठी आणि तिथून चढून येण्यासाठी आजही अनेक घाट आहेत. ते ऐतिहासिक काळातही होते.
त्यात नाणेघाटाचे महत्त्वाचे स्थान आहे. कारण अगदी २२०० वर्षांपासून ते आजतागायत त्याचा वापर होतो. अगदी स्वातंत्र्यापर्यंत या घाटात भरपूर राबता होता. आज त्यातून व्यापार होत नसला तरी पायी येणारे स्थानिक लोक त्याचा वापर करतात. शिवाय तिथे असलेली लेणी, गुहा, पाण्याची वैशिष्ट्यपूर्ण टाकी, अनेक कपोलकल्पित कथांना जन्म देणारा तिथला भलामोठा दगडी रांजण यामुळे नाणेघाट चर्चेतही असतो. मला कुतूहल होते, तो त्याच ठिकाणी का निर्माण झाला याचे.
मी पहिल्यांदा नाणेघाटात गेलो ते पावसाळ्यात. मुसळधार पाऊस, जबरदस्त ताकदीचा वारा आणि दाट धुके... यामुळे घाटाला फक्त शिवून आलो; निरीक्षण करता आलेच नाही. पण त्यानंतर इतर ऋतूंमध्ये गेलो, तेव्हा घाट व्यवस्थित पाहता आला. नीट निरीक्षण केले, तेव्हा तिथल्या खडकाची रचना पाहून थक्क झालो. इतका महत्त्वाचा घाट तिथेच का, याबद्दल माझ्या मनात काही गृहीतके होती. ती जुळल्याचे पाहून आनंदही झाला. मग हळूहळू नाणेघाटाच्या भूगोलाची रहस्यं उलगडत गेली.
एखाद्या ठिकाणी घाट तयार करण्यासाठी तिथे कोणते महत्त्वाचे घटक पाहिले जातात किंवा असावे लागतात? स्वाभाविकपणे, त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारासाठीची महत्त्वाची ठिकाणे-बाजारपेठा आणि त्यांच्यापर्यंत जाणारे सोयीचे रस्ते हवेत, तिथून जा-ये करणे / मालाची वाहतूक करणे सोपे-सोयीचे असावे, तो घाट विकसित करणे आणि त्यानंतरही त्यातून वाहतूक करणे कमी खर्चाचे असावे, याशिवाय तिथे पाणी, सुरक्षितता वगैरे इतरही सुविधा असाव्यात. असे असेल तर तिथे घाट बनू शकतो आणि त्यातून वर्दळही वाढू शकते.
विशिष्ट भौगोलिक रचना
नाणेघाटाचा विचार केला तर तिथे हे सर्वच निकष पूर्ण होतात. म्हणूनच तिथे घाट बनू शकला आणि पुढच्या काळात त्यातून कित्येक शतके व्यापार होऊ शकला. यात अर्थकारण हा घटक सर्वांत महत्त्वाचा आहे. कोणताही घाट बांधण्यासाठी सोपा आणि कमी खर्चाचा असावा. नाणेघाटातील एका भौगोलिक रचनेमुळे हा निकष पूर्ण होऊ शकला. त्या रचनेला मराठीमध्ये ‘कारी’ किंवा ‘कार’ असे म्हणतात आणि भूविज्ञानाच्या भाषेत ‘डाईक’!
नाणेघाटात जे कोणी गेले असतील, त्यांना हा घाट उतरत असताना पहिल्या टप्प्यात छोट्या छोट्या दगडी पायऱ्या लागल्या असतील. तीच या रचनेची ओळख. कारण त्या पायऱ्या वाटत असल्या तरी मुद्दाम कोणी बांधलेल्या पायऱ्या नाहीत, तर ते खडकाचे निसर्गत: निघालेले आडवे कपचे आहेत. ते पायऱ्यांसारखे वाटतात.
याचे कारण ‘डाईक’ किंवा ‘कारी' या रचनेला आडव्या आणि अगदी जवळ जवळ असणाऱ्या भेगा असतात. त्यामुळे त्याचे आडवे कपचे निघतात. त्याचा परिणाम म्हणून या रचनेची झीज लवकर होते. परिणामी, तिथे निसर्गत: घळ किंवा दरीचे तोंड निर्माण होते. त्यातून खाली उतरणे (आजूबाजूला असणाऱ्या कड्यांच्या तुलनेत) सोपे असते. या भूरचनेची निर्मिती ज्वालामुखीचे उद्रेक आणि लाव्हारसाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८५ टक्के भागावर बेसॉल्ट, अर्थात आपल्याकडे काळा कातळ म्हणून ओळखला जाणारा खडक आढळतो. तो, ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हारस थंड होऊन तयार झालेला आहे. स्वाभाविकपणे, आपल्या प्रदेशात अनेक ठिकाणी ‘डाईक’ अर्थात ‘कारी’ आढळतात.
या कारी उभ्या भिंतीसारख्या असतात. त्या जमिनीच्या खाली जिथे लाव्हारसाचे केंद्र असते, त्या मध्यावरणापर्यंत असतात. म्हणजे त्यांची खोली कित्येक किलोमीटर असते. त्या कितीतरी किलोमीटर लांब असतात. त्यांची रुंदी सर्वसाधारणपणे अर्ध्या-एक फुटापासून ते दहा-वीस फुटांपर्यंत असते. बहुतांश कारींमधला खडक आजूबाजूच्या खडकाच्या तुलनेत लवकर झिजून जाणारा असतो. मात्र काही कारींमधील खडक कठीणही असतो. परिणामी, तो लांबलचक बांधासारखा टिकून राहतो.
आपल्या आधीच्या पिढ्यांनी याच रचनांचा पूर्वापार उपयोग करून वाटा निर्माण केल्याचे आढळते. नाणेघाट हे त्याचे उदाहरण आहे. तसेच भंडारदरा परिसरातील घाटघर येथून खाली कोकणात उतरण्यासाठी उंबरदरा नावाची जुनी वाट होती. १९९० च्या दशकात तिथे जलसंपदा विभागाचा पाण्यापासून वीजनिर्मिती करणारा ‘घाटघर उदंचन प्रकल्प’ झाला. त्यामुळे ती वाट बंद पडली. पण तोपर्यंत खाली उतरण्यासाठी तिचा उपयोग होत असे.
भंडारदरा परिसरातील प्रसिद्ध सांधन दरी हीसुद्धा ‘डाईक’ किंवा ‘कारी’मुळेच निर्माण झाली आहे. तिथे वाट म्हणून फारशी वहिवाट नव्हती, पण त्या वाटेनेसुद्धा कोकणात उतरता येते. काही किल्ल्यांवरून उतरणाऱ्या, नळीची वाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही वाटा याच रचनेशी संबंधित आहेत. पुणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटामार्गे गेले तर मध्ये उजव्या हाताला खोल अशी ताम्हिणीची घळ लागते. त्या ठिकाणी दोन घळी एकमेकांना छेदतात आणि वरून पाहिले तर गणितातील ‘अधिक (प्लस)’च्या चिन्हासारख्या वाटतात. त्यामुळे त्या घळीला ‘प्लस व्हॅली’ असेही म्हटले जाते. ती घळ निर्माण होण्यातही तिथे असलेल्या कारीचा थेट संबंध आहे.
इतिहासावर पडणारा प्रभाव
आणखी शोध घेतला तर या रचनेचा आपल्या जुन्या वाटांशी किंवा कोकणात उतरणाऱ्या व्यापारी मार्गांशी नक्कीच संबंध जोडता येईल. एका अर्थाने हा इतिहासावर पडणारा प्रभावच. त्यासाठी पुन्हा नाणेघाटाचे उदाहरण घेता येईल. नाणेघाट चढून वर आल्यावर जुन्नर हे प्राचीन शहर लागते. याशिवाय जवळच शिवनेरी, जीवधन, हडसर हे किल्लेसुद्धा आहेत. लेण्याद्रीसारखी लेणी आहेत. खालच्या बाजूला प्राचीन काळापासून मुरबाड, तसेच, काळू - उल्हास नद्यांवरील अनेक गावे-शहरे विकसित झाली आहेत.
याच मार्गावर अनेक ठिकाणी लेणी (उदा. भिवंडीजवळील लोणाड) कोरली गेली. या ठिकाणांचा विचार केला तर ती सर्वच विकसित होण्यामागे, त्या काळी नाणेघाटातून होणाऱ्या व्यापाराची महत्त्वाची भूमिका होती. आणि नाणेघाटाला आकार देण्यामध्ये महत्त्वाची ठरते ती ‘डाईक’ अर्थात ‘कारी’ ही रचना.
यावरून या भूरचनेचा त्या परिसरावर, तिथे घडलेल्या इतिहासावर आणि त्यातून उभ्या राहिलेल्या अर्थकारणावर किती व्यापक प्रभाव आहे याची कल्पना येते. अर्थात, माणूस आणि त्याचा इतिहास घडण्यात त्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा केलेला वापर कारणीभूत ठरला आहे. इतकेच नव्हे तर वातावरण-हवामान यांच्याशी संबंधित घटक वा आपत्ती (पाऊस, पूर-दुष्काळ, वादळे, हिमयुगे-उबदार कालखंड, मॉन्सून सारखे वारे वगैरे) त्याचप्रमाणे, भूकंप, त्यामुळे नद्यांचे प्रवाह बदलणे, ज्वालामुखी उद्रेक - त्यातून उडालेल्या राखेमुळे सूर्यप्रकाश जमिनीवर न पोहोचणे, यासारख्या भौगोलिक घटना-आपत्ती यांनी माणसाचे जगणे,
त्याची प्रगती आणि उत्क्रांतीसुद्धा प्रभावित केली आहे. यापैकी हिमयुगे-दुष्काळ यासारख्या काही घटनांनी त्याला स्थलांतर करायला भाग पाडले. काही घटनांमुळे समुद्राची पातळी कमी झाल्याने स्थलांतर करण्यासाठी मार्गही उपलब्ध झाले. मॉन्सून, अर्थात मोसमी वारे आणि त्यांच्यामुळे पडणाऱ्या पावसाचा आपल्या प्रदेशावरील प्रभाव भारतीयांना वेगळा सांगायची गरज नाही. माणसाच्या जगण्यावरचा खनिज संपत्तीचा परिणाम सर्वांना ठाऊक आहेच.
इंडोनेशियामध्ये टोबा नावाचा निद्रिस्त ज्वालामुखी आहे. त्याचे उद्रेक काही लाख वर्षांच्या अंतराने होतात. त्यातून छोट्या आकाराचे कण बाहेर पडतात. त्यांना भूविज्ञानाच्या भाषेत ‘टेफ्रा’ म्हणतात, तर सर्वसाधारणपणे त्यांना ज्वालामुखीची राख म्हणून ओळखले जाते. ते इतक्या प्रचंड प्रमाणात असतात की पृथ्वीच्या वातावरणाचा बराचसा भाग व्यापतात. त्यांच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही. परिणामी, पुढे कित्येक वर्षे हिवाळा अनुभवायला मिळतो. अलीकडे आठ लाख वर्षांपूर्वी, पाच लाख वर्षांपूर्वी आणि ७० हजार वर्षांपूर्वी त्याचे उद्रेक झाल्याची नोंद आहे. या उद्रेकांपाठोपाठ बदललेली परिस्थिती आणि वातावरणात झालेले बदल यामुळे माणूस कसाबसा बचावला.
या सर्वच भौगोलिक घटना. त्यांनी माणसाला प्रभावित केले. त्याच्या प्रगतीत त्या कधी पूरक ठरल्या, तर कधी अडथळा म्हणून उभ्या राहिल्या. त्यांचा संपूर्ण पट पाहिला तर लक्षात येते, की खऱ्या अर्थाने आपल्याला आणि आपल्या इतिहासाला घडविण्यात भूगोलाचाच महत्त्वाचा वाटा आहे. तो आजही आहे आणि उद्याही राहील!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.