
Water Conservation : जिओपॅथिक स्ट्रेस झोन या संदर्भातील पहिल्या भागात पाणी शोधण्याच्या पारंपरिक नारळ व अन्य माहितीचा उल्लेख आला होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मला आलेले प्रश्न हे त्यासंदर्भातच होते.
तसेच काही तज्ज्ञांनी हे छद्म विज्ञान आपण का पसरवत आहात, अशी नाराजीही व्यक्त केली. मात्र माझा लेखामागील उद्देश पाणी प्रवाह शोधण्याच्या पद्धतीपर्यंतच मर्यादित नसून, या जमिनीतील पाण्याच्या प्रवाहांचे माणसांच्या आणि पाळीव पशुंच्या आरोग्याशी असलेल्या संबंधाकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा होता.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक विज्ञान ही काही गृहीतके मांडून त्याची तपासणी करत, त्यावर प्रयोग करून मिळणाऱ्या स्थल, काल, व्यक्ती निरपेक्ष निष्कर्षातूनच प्रगत होत गेलेले आहे.
पुणे येथील प्राध्यापक अविनाश खरात यांनीही सुरुवातीला त्याकडे चेष्टेच्या दृष्टीनेच पाहिले होते. मात्र त्यांच्या डोळ्यादेखत पाणी लागल्याने तो योगायोग तर नाही ना, या शंकेने आणि त्यांच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी काही गृहीतके मांडत अभ्यासाला आणि प्रयोगांना सुरुवात केली. त्यासाठी जमिनीतील पाण्याचा शोध घेण्याच्या विविध प्रक्रियांची खरात सरांनी माहिती घेतली. त्यातही डाउझिंगचा बराच सराव केला.
वास्तुशास्त्राशी काही संबंध आहे का?
अ) भारतीय वास्तुशास्त्र ः
भारतीय वास्तुशास्त्र संबंधित ग्रंथांमध्ये आढळत असलेल्या माहितीनुसार, मोठी मंदिरे, राजमहाल, राजवाडे, मोठे वाडे, हवेल्या अशा मोठ्या बांधकामांच्या जागा निवडण्याचे काही निकष व नियम ठरलेले आहेत. त्या काळातील स्थपती (आजच्या भाषेत आर्किटेक्ट वा सिव्हिल इंजिनिअर) बांधकामाच्या नियोजित जागांची पाहणी करायचे.
तेथील जमिनीचा उंच - सखलपणा, छोटे मोठे खड्डे, तेथील झाडे या व अशा आसपासच्या अनेक बाबींच्या नोंदी केल्या जायच्या. त्या ठिकाणी वर्षभर रोज दिवसभरात बदलणाऱ्या सावल्यांचे निरिक्षण केले जायचे, त्यानुसार सर्व दालनांच्या जागा ठरवल्या जायच्या.
तसेच वेगवेगळ्या ऋतूतील वाऱ्यांची दिशा अभ्यासली जायची. या सगळ्यांचा अभ्यास करून त्या वास्तूरचनेचा आराखडा बनवला जायचा. याचबरोबर त्या जागेसाठी भूमी परीक्षा सुद्धा केली जायची. या भूमी परीक्षेमध्ये त्या जागेवर जाऊन तेथील जमीन, झाड व आसपास असणाऱ्या विविध भूरचनांचे दगडांचे निरीक्षण केले जायचे.
दगड व खडक, वाळू, मोठे खड्डे असलेली जागा, आणि काटेरी झाडे जास्त असणारी जमीन बांधकामासाठी अयोग्य असल्याचा त्या काळातील निष्कर्ष होता. अशा जागांवर पाळीव प्राणी उदा. गाय, म्हैस, बैल, कुत्रा, बकरी यांना तीन आठवड्यांसाठी मुद्दाम बसवले जायचे. ते प्राणी तिथे स्वस्थ किंवा आनंदी असतील तर बांधकाम करण्यासाठी ती जागा योग्य असल्याचा निष्कर्ष काढला जाई.
त्याउलट ते प्राणी अस्वस्थ राहिले तर ती जागा अयोग्य असल्याचे मानले जाई. तसेच जमिनीखाली खोदकाम करताना तिथे प्राण्यांची किंवा माणसांची हाडे जास्त प्रमाणात मिळाली तर तिथे बांधकाम केले जात नव्हते. त्याचप्रमाणे गारगोटी सारखे वेगळे अगदी खडे क्रिस्टल स्पटिकासारखे खडे मिळाले तरीही तिथे बांधकाम केले जात नव्हते.
अशा अनेक गोष्टींची पडताळणी केल्यावर जागेची निवड, देवालयाच्या गाभाऱ्यांची, घराच्या दालनांची रचना केली जायची. याचे कारण म्हणून त्या ठिकाणी काहीतरी नकारात्मक ऊर्जा येते आणि ती खूप त्रासदायक असते, असे सांगितले जाई. ती जमिनीखाली पाणी असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते, हेही कदाचित सुरुवातीला माहिती असावे. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले असावे.
ब) चिनी वास्तुशास्त्र
आपल्या इतका प्राचीन असलेल्या चीनमध्ये वास्तुशास्त्र असून, त्याला ‘फेंगशुई’ या नावाने ओळखले जाते. त्यातही अशाच प्रकारची निरीक्षणे व अनुमान सांगितले आहेत. वर उल्लेखलेल्या नकारात्मक ऊर्जेचाही त्यात उल्लेख आहे. ४०० वर्षांपूर्वीच्या तेथील नोंदी सांगतात, की जिथे जमिनीत खाली पाणी आहे, तिथे पृष्ठभागावर त्या भागात माणसांना, प्राण्यांना त्रास जाणवतो. या नकारात्मक ऊर्जेला आणि ती जिथे जाणवते त्या भागाला त्यांनी ‘ड्रॅगन लाइन्स’ असे संबोधले होते.
क) युरोप- अमेरिकेतील विचार
१९३२ मध्ये वोन पोल (Von Pohl) या जर्मन शास्त्रज्ञाने जमिनीतील काही ठिकाणाहून विद्युतप्रवाह बाहेर पडत असल्याचा प्रथम उल्लेख केलेला आढळतो. त्याने असा विद्युतप्रवाह वाहत असलेल्या जागेवर घर बांधलेले असेल तर त्या घरातील रहिवाशांना कर्करोग, अस्थमा, संधिवात इ. आजार होत असल्याचे लिहिले आहे. या शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवरील जमिनीच्या अडीच टक्के भाग असा विद्युत प्रभारीत असावा. त्यांनी या ऊर्जेला ‘कॅन्सर रेज’ असे संबोधले. २०० ते ३०० फूट खोलीवरच्या पाणी प्रवाहामुळे हा ‘स्ट्रेस झोन’ किंवा कॅन्सर रेज तयार होतो.
अलीकडेच १९८२ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच आजार देणाऱ्या इमारती असतात हे मान्य केले. काही विशिष्ट इमारतीत राहिल्यावर किंवा काही काळांसाठी गेल्यावर अस्वस्थ वाटते. तसेच काही महिन्यांच्या वर्षाच्या इथल्या वास्तव्यानंतर संधिवात आणि कॅन्सर सारखे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. या त्रासाचा व आजाराचा संबंध ‘ब्लॅक स्ट्रीम’शी आहे. हे ‘ब्लॅक स्ट्रीम’चा संबंध त्या इमारतीच्या खाली जमिनीत वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहांशी आहे, हेही मान्य करण्यात आले.
या जमिनीतून वर येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेने आपल्या झोपेची गुणवत्ता अगदीच खालवते. तिथे शांत झोप येत नाही, अस्वस्थ वाटते, स्वप्ने पडत राहतात, भीती व तणाव जाणवत राहतो म्हणजेच व्यक्ती एखाद्या ताणाखालीच (स्ट्रेस झोन) वावरते. अशा ठिकाणी दिवसाही ताजेतवाने वाटत नाही. काही वेळा वेगवेगळ्या अवयवात सौम्य व तीव्र वेदनाही जाणवतात. या प्रभाव क्षेत्रातील घरात राहणारे व्यक्तींची रोग प्रतिकारकक्षमता खूपच कमकुवत असते. येथील रहिवाशी व्यक्ती बऱ्याचदा शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रस्त असतात.
२००३ मध्ये हेरॉल्ड सेक्स्टोन (Haraold Sexton) याने जमिनीखालच्या पाण्याचा प्रवाह धारेतून काही विशिष्ट किरण बाहेर पडतात व या किरणांचा परिणाम माणसाच्या शरीरातील संप्रेरकांवर (हार्मोन्स) होत असल्याची बाब नोंदवली. या संप्रेरकामधील परिणामामुळे शरीरातील पेशी विभाजनांवर नकारात्मक परिणाम होतात.
तसेच त्याने वनस्पतीवर होणारे परिणामही नोंदवले. अर्थातच ते नकारात्मकच आहेत. त्याने हेही नोंदवले, की या परिणामांची तीव्रता पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक असते. या विशिष्ट किरणांना त्याने ‘अर्थ रे’ (Earth Ray) देऊन ते ‘सायलेंट किलर’ असल्याचे त्याने म्हटले आहे. या किरणांचा संधिवात, उच्च रक्तदाब, कॅन्सर आणि तत्सम आजार होण्याशी जवळचा संबंध असल्याचे त्यांने नोंदवले.
कॅथे बॅचलर या युरोपियन लेखिकेचे या विषयावरच एक पुस्तक प्रसिद्ध आहे. हे पुस्तक त्यांनी सहा वर्षे प्रत्यक्षात फिल्डवर सर्व्हेक्षण करून २००० पेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या घराला भेटी दिल्या. तेथील ‘जिओपॅथिक स्ट्रेस’ आहे की नाही हे तपासून, त्याचा अभ्यास करून त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. जवळ जवळ या सर्व घरांमध्ये जिओपॅतिक स्ट्रेस सापडल्याचे त्यांनी नोंदवले आहे.
अमेरिकेतील हवाई उड्डाण तज्ज्ञांनी अंतराळ यानावरही (स्पेस क्राफ्ट) या किरणांचा व ऊर्जेचा परिणाम जाणवतो. जमिनीतील प्रवाहापासून निघालेले हे किरण जमिनीला ९० अंशांनी छेदून जमिनीपासून वर २५० किलोमीटर उंचीपर्यंत परिणाम करत असल्याच्या नोंदी आहेत.
जिओपॅथिक स्ट्रेसच्या प्रभावक्षेत्रात उगवणाऱ्या झाडांची उंची खुरटलेली राहते. येथील झाडांना फुले येत नाहीत. फुले आली तर फळधारणा होत नाही. रोडच्या बाजूला लावलेली झाडे या प्रभावक्षेत्रात असतील तर ती वाकलेली किंवा झुकलेली दिसतात.
या स्ट्रेस झोनमध्ये प्राणी बसल्यास त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागते. ते त्वरित ती जागा सोडण्याचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी बांधून ठेवले असता त्यातून निसटण्याचा त्यांचा प्रयत्न करतात. पण जेव्हा निसटणे जमत नाही, त्या वेळी अस्वस्थता दर्शविणाऱ्या विचित्र पद्धतीने ओरडतात.
ख्रिस्तोफर बर्ड (Christopher Bird) या शास्त्रज्ञाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, अशा झोनमध्ये चीज हा दुग्धजन्य पदार्थ खूप लवकर खराब होतो. बटाटेही लवकर सडतात. वाइन खूप आंबट होते. फळापासून बनविल्या जाणाऱ्या जॅमवरही परिणाम होतो. या सर्व पदार्थांच्या निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजेच या ताणांचा सूक्ष्मजीवांच्या वर्तनावर आणि गुणधर्मावरही परिणाम होतो, असा निष्कर्ष ते काढतात.
डाउझिंग म्हणजे काय?
दोन्ही मुठीत इंग्रजी ‘एल’ आकाराच्या तांबे किंवा लोखंड किंवा एखाद्या विद्युतवाहक धातूच्या सळ्या (rod) धरून जमिनीवर चालत जाण्याच्या प्रक्रियेतून जमिनीखालील पाणी शोधण्याच्या पद्धतीला डाउझिंग असे म्हणतात. या सळ्या मुठीत धरताना हलकेच धरलेल्या असतात. जमिनीत ज्या ठिकाणी पाणी असते, तिथे त्या आडवे फिरतात आणि दिशा बदलतात. हे फिरण्याचे प्रमाण जमिनीतील पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असते असे मानले जाते.
खरात सरांनी अनेक ठिकाणी फिरून सळ्यांच्या डाउझिंगचा आणि नारळ डाउझिंगचा सारखाच अनुभव येतो का, याची पडताळणी केली. तेव्हा त्यांना सळयाद्वारे केलेल्या डाउझिंगमध्ये नारळाप्रमाणेच क्रिया घडत असल्याचे दिसून आली. या दोन्ही पद्धतीद्वारे पाण्याच्या जागा शोधणे शक्य असल्याची त्यांची स्वतःची खात्री पटली. मग जास्तीत जास्त जागांना भेट देत तेथील पाणी प्रवाहांचे डाउझिंग सळयांवर होणारे परिणाम जाणून घेण्याचे प्रयोग
सुरू ठेवले. स्वतःच्या वैज्ञानिक विचाराप्रमाणे अनेक बाबतीत त्यांचे कुतूहल जागे होत चालले होते. उदा. हे राॅड का दिशा बदलतात? किंवा नारळ का उभे राहतो? अशी ठिकाणे मोकळ्या मैदानात असतील तर खाली पाणी नक्की का लागते? असे पाणी घरांच्या खालील जमिनीतून वाहत असेल तर घरात डाउझिंग काम करते का? या डाउझिंगने परिणाम दाखवलेल्या घरातील लोकांच्या आरोग्यावर याचे काही परिणाम होतात का?
लोकांना सध्या अलेल्या आजारांचा आणि जमिनीतील पाण्याचा काही संबंध आहे का? जमिनीखालील पाणी प्रवाह असलेल्या रस्त्यावरून चाललेल्या वाहनांतील चालकांवर काही परिणाम होतो का?
त्याचा वाहनाच्या अपघाताशी काही संबंध असेल का किंवा एखाद्याच भागात जास्त अपघात असल्यास त्या खाली पाणी प्रवाह असतील का? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात उभे राहत होते. त्यांची वैज्ञानिक मीमांसा करण्याचेच काम त्यांनी अंगावर घेतले होते.
सतीश खाडे ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.