Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : कापूस उत्पादकतेत घसरण

Cotton Market : जगात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताची कापूस उत्पादकता गेल्या दशकभरात सतत कमी झाली आहे. ही उत्पादकता चीन, पाकिस्तानच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जगात कापूस उत्पादनात आघाडीवर असलेल्या भारताची कापूस उत्पादकता गेल्या दशकभरात सतत कमी झाली आहे. ही उत्पादकता चीन, पाकिस्तानच्या उत्पादकतेपेक्षा कमी आहे. याच वेळी कापूस उत्पादनातही घट येत असून, दर्जेदार कापूस पुरवठ्याचे संकट देशात तयार होऊ लागले आहे.

जनुकीय सुधारित कापूस वाण (जीएम) किंवा थ्री जीएम कापूस वाणाची मागणी गेल्या दशकभरापासून कापूस उद्योग करीत आहे. पण त्यात कोणतीही कामगिरी देशात झालेली नाही. दुसरीकडे देशाची कापूस उत्पादकता व उत्पादन कमी होत असल्याने भारत कापूस आयातदार देश बनेल, असेही संकेत आहेत.

भारताची कापूस उत्पादकता गुलाबी बोंड अळी व अन्य समस्यांमुळे कमी होत आहे. देशात रोगराई, गुलाबी बोंड अळी व अन्य समस्यांना प्रतिकारक्षम, तग धरणारा कापूस वाण नाही. २००५ नंतर देशात कापूस उत्पादन सतत वाढले. कापसाची उत्पादकता देशात ३५० किलो रुई प्रतिहेक्टरीवरून ५३५ ते ५४० किलो रुई प्रतिहेक्टरीपर्यंत पोहोचली. २०१३ पर्यंत देशात कापूस उत्पादन ४०० लाख गाठींपर्यंत होते. परंतु २०१४ नंतर पिकात रोगराई, गुलाबी बोंड अळी व अन्य नैसर्गिक समस्यांनी थैमान घातले. यात शेतकऱ्यांचेही मोठे वित्तीय नुकसान झाले आहे. देशाची कापूस उत्पादकता जेमतेम ४९० ते ५०० किलो रुई प्रतिहेक्टरी, अशी मागील तीन हंगामांत राहिली आहे.

महाराष्ट्राची पिछेहाट

देशात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या महाराष्ट्राची कापूस उत्पादकता फक्त ३५० किलो रुई प्रतिहेक्टरी एवढीच राहिली आहे. कारण महाराष्ट्रात कापसाखाली ९२ ते ९४ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कमी-अधिक पाऊस आणि गुलाबी बोंड अळीने महाराष्ट्रातील कापूस पिकाची अतोनात हानी २०१४-१५ पासून केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस लागवड करणाऱ्या जळगाव जिल्ह्याची कापूस उत्पादकता ३३० किलो रुई प्रतिहेक्टरी एवढीच साध्य होत आहे.

अन्य देश पुढे

जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश भारत आहे. परंतु कापूस उत्पादनात भारत मागे पडला आहे. अमेरिका, चीन, ब्राझील व पाकिस्तान मिळून जेवढी कापूस लागवड होते, त्यापेक्षा अधिकची कापूस लागवड एकट्या भारतात दर वर्षी केली जाते. परंतु कापूस उत्पादकतेत भारत चीन, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझील आदी देशांच्या मागे आहे. भारतात जेवढे कापूस उत्पादन घेतले जाते, त्यापेक्षा अधिकचे कापूस उत्पादन एकटा चीन घेतो. चीनने मागील दोन हंगामांत कापूस उत्पादन ३५२ लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन साध्य केले. तर भारताचे कापूस उत्पादन मागील दोन हंगाम ३५० लाख गाठींपर्यंत पोहोचू शकलेले नाही.

देशात यंदाही गुलाबी बोंड अळी, नैसर्गिक समस्यांनी कापूस पिकाची वाताहत झाली आहे. देशात यंदा मागील हंगाच्या तुलनेत कापूस लागवड सुमारे ११ लाख हेक्टरने घटली आहे. देशातील कापूस लागवड सुमारे ११६ लाख हेक्टरवर झाली आहे. यामुळे देशात यंदाचे (२०२४-२५) कापूस उत्पादन ३०० ते ३१० लाख गाठी एवढेच राहू शकते, असा अंदाज आहे.

भारतातील कापूस उत्पादनाची स्थिती

(लाख गाठींमध्ये)

वर्ष उत्पादन

२०२१-२२ ३५२

२०२२-२३ ३१२

२०२३-२४ ३२२

२०२४-२५ ३०० ते ३१० (अपेक्षित)

विविध देशांची मागील तीन वर्षांतील सरासरी कापूस उत्पादकता

(उत्पादकता किलो, रुई प्रति हेक्टरी)

ऑस्ट्रेलिया १८००

चीन १२००

ब्राझील ९२५

अमेरिका ९१२

पाकिस्तान ७००

भारत ५००

महाराष्ट्र किंवा देशात अनेक शेतकऱ्यांसह मोठा उद्योग, मनुष्यबळ कापसावर अवलंबून आहे. पण पुरेसा कापूस देशात प्रक्रियेसाठी कारखान्यांना मिळेल की नाही, अशी स्थिती तयार होऊ लागली आहे. कापूस आयातदारांच्या रांगेत भारत पुढे बसू शकतो. कारण कापूस उत्पादन सतत कमी होत आहे. रोग प्रतिकारक्षम, दर्जेदार कापूस वाण, ठोस धोरण कापूस पिकाबाबत देशात आणायला हवे.
संदीप पाटील, संचालक, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

Cooperative Development Project : सहवीजनिर्मिती प्रकल्प फायदेशीर

SCROLL FOR NEXT