Agriculture Land  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : निर्णय व्यवहारी वडिलांचा

शेखर गायकवाड

Agriculture Land Issue : काळूराम नावाच्या शेतकऱ्याची तीन एकर जमीन होती. पूर्वी मुंबईमध्ये गोदी कामगार म्हणून काही काळ काम केल्यामुळे काळूरामला शिक्षणाचे महत्त्व जाणवले होते. २० वर्षे गोदीमध्ये काम केल्यावर आता शारीरिक व फार कष्टाचे काम होणार नाही, हे लक्षात आल्यावर काळूराम ते काम सोडून गावी आला. स्वतःची तीन एकर जमीन तो कसू लागला. तिन्ही मुलांना त्याने लहानपणापासून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. थोरला जगन हा पदवीधर होऊन बंगळूरला एका कंपनीत नोकरीला लागला. मधला सुभाष इंजिनिअर झाला आणि त्याला पण एका केमिकल फॅक्टरीमध्ये चांगली नोकरी लागली. धाकटा राजन हा एका महाविद्यालयात प्राध्यापक झाला.

तिन्ही मुलांचे चांगले चालले होते. कधीतरी सणावाराला मुले आणि सुना गावी येत असत. नोकरीच्या ठिकाणीच मुलांच्या वाढलेल्या व्यापामुळे हळूहळू मुले गावी येण्याचे कमी झाले. सहा-सात महिन्यांनी कधीतरी काळूराम आणि त्यांची बायको मुलांकडे जात असत. काळूरामचे वय आता सत्तरच्या आसपास झाले आणि शेतातले काम आता काळूरामला होत नव्हते आणि ही कामे करायला त्याला मजूरही मिळेनात. शहरीकरण वाढल्यामुळे जमिनीचे बाजार पण वाढू लागले होते. त्याच वर्षी दिवाळीमध्ये तिन्ही मुलांनी काळूरामकडे जमिनी वाटप करून देण्याचा आग्रह धरला. त्यावर काळूराम म्हणाला, ‘‘अतिशय कष्टाने मी ही जमीन घेतली आहे. गोदीत काम करताना सुद्धा आठवड्याला ५०-६० रुपये बँकेत ठेवून तब्बल १० वर्षांनंतर मी ही शेतजमीन खरेदी केली आहे. माझ्यानंतर ही जमीन आपोआपच तुमच्या नावची होणार आहे. तोपर्यंत जमीन पडून राहिली तरी चालेल.’’ हा काळूरामचा विचार त्याच्या मुलांना मात्र अजिबात आवडला नाही.

थोरल्याने लगेचच आम्हाला जमिनीचे वाटप करून द्या, असा आग्रह धरला. धाकटा राजन काही बोलला नाही. तर मधला सुभाष म्हणाला, ‘‘पुढच्या पिढीमध्ये कशाला भांडणे नेता. आत्ताच वाटप करून दिले तर आम्हाला शेतीमध्ये काहीतरी करता येईल.’’

रात्री उशिरा एक दिवस तिन्ही मुलांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. एकाने एक बोलायचे व दुसऱ्याने एक बोलायचे असे न करता तुम्ही प्रत्येकाने जमीन वाटायचा आग्रह का धरला नाही, या मुद्यावरून त्यांची भांडणे सुरू होती. पांघरूण डोक्यावर घेतलेला काळूराम शांतपणे या तिघांचा विचार काय आहे हे समजून चुकला होता. त्यानंतर तो काहीही न बोलता शांत राहिला. मुले गेल्यानंतर काळूरामने या प्रश्‍नावर बराच विचार केला. तिन्ही मुलांमध्ये आपापसांतील संबंध चांगले राहिलेले नाहीत, याची त्याला आता खात्री पटली. जो तो स्वार्थी वृत्तीने बोलत असल्याचे त्याला आठवत होते.

त्याचा मित्र असलेल्या एका शहरातील वकिलाकडे तो दुसऱ्या दिवशी गेला. वकिलांनी त्याला कोणकोणते पर्याय असू शकतात याची जाणीव करून दिली. परंतु निर्णय मात्र काळूरामला स्वतःला करावा लागेल, हे त्याने स्पष्टपणे सांगितले. आता मुलांचे फोन आले तरी प्रत्येक मुलगा जमीन वाटायचे तुम्ही काय ठरवले आहे याच्यावरच भर देऊ लागला. नातवंडं पण गावी यायची बंद झाली. ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर कष्ट केले होते ती गोष्ट कडेला जात नाही, असा विचार काळूराम आणि त्याच्या बायकोने केला.

आपल्या वकील मित्राच्या सल्ल्याने काळूरामने संपूर्ण जमीन खरेदी खताने गावातल्याच एका मोठ्या माणसाला विकून टाकली. आलेले सर्व पैसे मित्राच्या सल्ल्याने वेगवेगळ्या योजनांमध्ये त्याने गुंतवले. प्रत्येक मुलाला त्याने फोनवरून स्पष्टपणे सांगितले, की मी कष्टाने घेतलेली जमीन होती. ती सर्व मी आता विकून टाकली आहे. आता तुमच्यात भांडणं व्हायला कारणच उरलेले नाही. मी आणि माझ्या बायकोला म्हातारपणी उपयोगाला यावेत म्हणून हे सर्व पैसे मी गुंतवणूक करून टाकले आहेत. फार किरकोळ रक्कम मी माझ्या दैनंदिन खर्चाला ठेवली आहे. व्याजावर आता मी जगायचे ठरविले आहे. वडील काळूरामच्या अशा प्रकारच्या विचाराने तिन्ही मुलांना आश्‍चर्याचा धक्काच बसला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Soybean Cotton Subsidy : अमरावतीतील ५८ हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता

Crop Damage : चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT