Land Dispute : कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक

Agriculture Land : एका धरणामध्ये अनेक लोकांच्या जमिनी बुडाल्या. बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर टप्प्याटप्प्याने धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे लाभक्षेत्रामध्ये वाटप करण्यात आले. बुडित क्षेत्रामध्ये एकूण आठ गावे बुडाली.
Land Dispute
Land DisputeAgrowon
Published on
Updated on

Land Fraud : एका धरणामध्ये अनेक लोकांच्या जमिनी बुडाल्या. बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर टप्प्याटप्प्याने धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे लाभक्षेत्रामध्ये वाटप करण्यात आले. बुडित क्षेत्रामध्ये एकूण आठ गावे बुडाली. त्यांचे १०० टक्के पुनर्वसन लाभ क्षेत्रामध्ये करण्यात आले. त्याचबरोबर दोन गावे धरणाच्या पाण्यामध्ये अर्धवट बुडाली. त्या गावातील शेतकऱ्यांची काही जमीन धरणाच्या पाण्याच्या वर राहिली व काही जमीन पाण्यामध्ये बुडाली. नियमानुसार त्यांचे देखील पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यांनी लाभ क्षेत्रामध्ये वसाहतीमध्ये राहायला जायचे टाळले. ते आपल्या मूळ गावीच काही कुटुंबाबरोबर डोंगरावर वस्ती करून राहिले. 

त्या भागामध्ये जमिनी खरेदी विक्री करणाऱ्या दलालाला ही सर्व माहिती कळाली. तो धरणग्रस्तांची जमीन स्वस्तामध्ये घेऊन नियमित जमिनीचे व्यवहार करीत असे. जे धरणग्रस्त लाभ क्षेत्रामध्ये राहायला गेले नाही त्यांना सरकारकडून मिळालेली पर्यायी जमीन कसणेसुद्धा अवघड होते, हे त्याला माहिती होते. सखाराम शेठ नावाच्या या जमिनीच्या दलालाने अनेक धरणग्रस्तांना टोकन म्हणून चार-पाच लाख रुपये घेऊन पन्नास लाख रुपये किमतीच्या अनेक जमिनींचे साठे खत करून ठेवले होते. अशा जमिनींना योग्य गिऱ्हाईक आल्यावर विकायच्या अशी त्याची पद्धत होती. तान्या नावाच्या एका धरणग्रस्ताने सखाराम शेठकडून आठ लाख रुपये घेतले आणि त्याला रजिस्टर साठे खत व त्याच्या कुटुंबातील एकूण १४ लोकांचे कुलमुखत्यारपत्र दिले.

Land Dispute
Agriculture Land Dispute : पेच कुळाच्या मालकीची जमीन विकण्याचा

पुढच्या दोन-तीन वर्षांत मंदी आल्यामुळे सखाराम शेठचा दलालीचा व्यवसाय थोडा अडचणीत आला होता. अनेक जमिनी अडकून पडल्या होत्या. बराच प्रयत्न करून सुद्धा जमीन खरेदी करायला कोणी पुढे येत नव्हते. एकीकडे जमिनीचे भाव वाढण्याची आणि दुसरीकडे भरभर व्यवहार व्हावेत अशी पण त्याची अपेक्षा होती. तब्बल दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर सखाराम शेठला जमीन खरेदी करणारा एक माणूस मिळाला. त्याने सखाराम शेठकडून त्या जमिनीची सर्व कागदपत्रे घेतली. शहरातल्या आपल्या वकिलाला दाखवली. जमिनीचा पन्नास वर्षांचा इतिहास तपासून शेवटी नवा माणूस सखाराम शेठकडून जमीन घ्यायला तयार झाला. जमीन खरेदी करणाऱ्या त्या माणसाला सखारामने आपल्याकडे कुलमुखत्यारपत्र असल्याचे सांगितले. शिवाय साठे खतासाठी माझे पैसे खर्च झाले असून ते व बाजारभावाची किंमत देण्याच्या अटीवर त्या दोघांनी व्यवहार ठरवला.

दोघांनी मिळून खरेदीखत करण्याची सर्व तयारी पूर्ण केली. सखाराम शेठने तान्याला तुझ्या जमिनीचे २५ लाख रुपये झाले, त्यांपैकी तुला यापूर्वीच आठ लाख रुपये दिले आहेत असे सांगून कुलमुखत्यारपत्राच्या आधारे ती त्रयस्थ व्यक्तीला जमीन विकून टाकली. या विक्री व्यवहारापोटी सखाराम शेठने ६० लाख रुपये त्या व्यक्तीकडून घेतले. खरेदीखत झाल्यानंतर सखाराम शेठने तान्याला त्याचे राहिलेले १७ लाख रुपये देऊन टाकले. सखाराम शेठला वाटत होते आता सर्व व्यवहार सुरळीत झाला आणि या संपूर्ण व्यवहारात आपल्याला फायदासुद्धा भरपूर झाला. तान्याला मात्र आपल्या जमिनीवर सगळा फायदा सखाराम शेठने घेतला याची खात्री होती. अजून त्याने पंधरा-वीस लाख रुपये द्यायला पाहिजे होते असे तान्याला वाटत होते.

Land Dispute
Land Dispute : मतपरिवर्तन ठरले गैरसोईचे

झालेल्या व्यवहाराची फेरफार नोंद जेव्हा दफ्तरी घेण्यात आली, त्या वेळी तान्याने या झालेल्या व्यवहाराला हरकत घेतली. ही जमीन आमची १४ लोकांची असून, त्यांपैकी दोन चुलत बहिणी, एक सख्खी बहीण व चुलते गेल्या दोन वर्षांत वारले आहेत. मेलेल्या माणसांच्या मुखत्यारपत्राचा वापर करून सखाराम शेठने ही जमीन विकली असल्यामुळे झालेला सर्व व्यवहार बेकायदेशीर आहे व मेलेल्या लोकांची जमीन विकायचा त्याला कोणताही अधिकार नाही, असा युक्तिवाद त्याने केला. एवढेच नाही तर फौजदारी केस दाखल करण्याचा इशारा देखील या पत्रामध्ये दिला.

आता मात्र सखाराम शेठ मनातून हादरून गेला. शिवाय फौजदारी केस दाखल होण्याची पण वेळ आली. शेवटी या जमिनीतून जेवढा नफा काढला होता तो सर्व तान्याला देण्याची तयारी सखाराम शेठने दाखवली. त्या बदल्यात तान्याने फौजदारी केस दाखल करू नये असा त्यांनी समझोता केला. शेवटी मेलेल्या खातेदारांची नावे तशीच ठेवून आणि त्यांच्या वारसांची नोंद झाल्यावर पुन्हा दुसरे राहिलेल्या क्षेत्राचे खरेदी खत करण्याच्या तान्याच्या संमतीनंतर हा प्रश्‍न सुटला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com