Village Story Agrowon
ॲग्रो विशेष

Village Story : रस्त्याचे ऋण...

Team Agrowon

समीर गायकवाड

Debt of the Road : पाऊलवाटेसारखंच गावाकडं जाणाऱ्या रस्त्याचंही गारुड असतं. माझ्या गावाकडं जाणाऱ्या रस्त्याचा गोडवा मात्र आता लुप्त झालाय, उरल्यात त्या केवळ आठवणी. कधी काळी स्वर्गीय शीतल असणारा आमचा सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग खूप हिरवागार सुंदर होता. दोन्ही बाजूंनी दाट झाडी आणि त्या झाडांच्या अर्धवर्तुळाकार आदबशीर कमानी स्वागताला उभ्या असत. झाडांच्या हिरव्यागार पानांच्या गुंफातून प्रवास केल्यासारखं वाटायचं. लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी ही झाडं जास्त करून असत. त्यातही कडुलिंबाची संख्या मोठी होती. एकमेकांच्या गळ्यात हात घालून रेलून बसल्यागत या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये अडकून गेलेल्या असत. दाट सावलीच्या संगतीने प्रवास होई. मात्र मध्येच एखादे झाडी नसलेले वळण आले की बाहेर उन्हं किती कडक आहेत, याची जाणीव व्हायची.

प्रवास बैलगाडी, लाल डबा, टेम्पो, जीप, ट्रक वा लक्झरी कार अशा कोणत्याही गाडीतला असो; सर्व प्रवाशांना या हिरवाईमुळे समान दृष्टीसुख मिळायचे. आपल्या विरुद्ध दिशेने पळणारी झाडं कधी संपतच नसत. आपला वेग वाढला की त्यांचाही वेग वाढायचा. मग वाऱ्याच्या झुळकेवर उडून येणारी त्यांची पानं वाहनाच्या खिडकीतून अलगद आत येऊन पडत. त्यांना मातीचा आणि झाडाचा मिळून एक संमिश्र गंध असे. हा वास स्मृतीच्या कुपीत मी अजूनही जतन करून ठेवला आहे.

या सर्व झाडांचे बुंधे विटकरी चॉकलेटी रंगात रंगवलेले असत. त्यावर दोन पांढरे पट्टे काही अंतर राखून मारलेले असत. त्यामुळे ही सर्व झाडं एका कुळातील वाटायची आणि यांचा हा परिवार एका रांगेत आपल्या स्वागतासाठी कमरेत वाकून उभा राहावा तसा खोडात वाकलेला असायचा. रोरावणारे वादळवारे, अंगांगातून घामाच्या धारा काढणारे कडक ऊन, वेडावाकडा कोसळत जाणारा पाऊस, विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट निसर्गाच्या कोणत्याही रूपात आपली मातीत रोवलेली मुळे आणखी घट्ट धरून ही झाडे पांथस्थांची सोबत करत. वाटेत एखादे जळून गेलेलं वा वाळून गेलेलं झाड दिसलं की फार वाईट वाटायचं. त्यातल्या एखाद्या झाडानं कुठली तर चकाकणारी वीज आपल्या अंगावर खेळवलेली असायची नाहीतर एखाद्या झाडाचं आयुष्य संपून गेलेलं असायचं. तरीदेखील त्याच्या त्या वाळून गेलेल्या फांद्यांवर चुकार पक्ष्यांचा संसार नव्याने घरट्यात मांडलेला असायचा. त्यातल्या काटक्या लांबूनही स्पष्ट दिसायच्या. हिरव्या झाडांवर तर अनेकविध पक्ष्यांच्या शाळा भरलेल्या असत.

रस्त्याच्या कडेला कैक खोपटेवजा ढाबे असत. तिथे मस्त वाफाळता चहा मिळायचा. लालबुंद तिखट शेंगा चटणी, ज्वारीची पांढरीशुभ्र चवदार खमंग भाकरी, जोडीला लाल कांदा आणि लसणाच्या पाकळ्या असा जिभेला पाणी सोडणारा साधासुधा पण रसरशीत मेनू तिथे असायचा. जोडीला वांग्याचे मसालेदार भरीत, झणझणीत सोलापुरी काळ्या तिखटाची आमटी. खिशाला परवडेल आणि पोटातली भुकेची आग तृप्त शांत होऊन जाईल असा हा सगळा बेत असायचा. मांसाहारी ढाब्यावरचा बेत तर याहून फक्कड असायचा. काही ठिकाणी तर वाटसरूच्या समोरच सामिषभोजन साग्रसंगीत बनवले जाई. त्याचा वास अवघ्या इलाख्यात धुरळा माजवून जायचा. त्या दरवळणाऱ्या वासानेच वाहने तिथे थांबत. एकदा एखाद्या ठिकाणी जेवलेला माणूस पुन्हा या रस्त्याने प्रवास करताना त्याच ढाब्याचा ‘वास काढत’ तिथेच यायचा ही खासियत इथल्या स्वयंपाकात आणि आदरातिथ्यात आहे. बसायला मस्त आरामदायी बाज आणि लाकडी बाकडी असत. बहुत करून बदामाची लफ्फेदार घेर असणारी दाट सावल्यांची झाडं या ठिकाणी असत. या सर्व वातावरणामुळे इथे येणाऱ्या माणसाला चार घास आपोआप जास्त जात. हाशहुश्श करत, नाकपुड्या व कपाळावर जमा झालेला घाम पुसत पुसत लोक म्हणत, ‘थोडे तिखट होते हो, पण असे जेवण कुठे नाही मिळाले आजवर ...’ असा संवाद झाला की शेंगा चटणी वा चिक्कीची खरेदी होई आणि प्रवासी मार्गस्थ होई.

पूर्वी या रस्त्यावर दुतर्फा दिसायचे ते वेगवेगळे फळविक्रेते. एखाद्या झाडाच्या आडोशात हिरव्या कापडाचा तात्पुरता मांडव करून वेगवगेळ्या हंगामानुसार रसाळ ताज्या फळांच्या टोपल्या घेऊन हे लोक बसलेले असत. बोरे, डाळिंब, पेरू, चिकू, द्राक्ष, आंबे अशी अनेकविध फळे विकणारी ही गावाकडची माणसं कधी वजनात काटा मारत नसत वा फळांच्या भावावरून हमरीतुमरीवर येत नसत. त्यांच्यात साधेपणा, समाधान आणि तृप्तता असे. या रस्त्यावर उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणारे लिंबू सरबत हे जणू स्वर्गीय पेयच असे. पिवळे जर्द रसदार लिंबू चिरून त्याच्या दोन अर्धवर्तुळाकर फोडी लिंबाच्या साच्यात टाकून ग्लासात पिळल्या जात. साखर, वेलची पूड, थोडेसे मीठ आणि थोडासा पाक या ग्लासात घातला जाई. मग पाणी आणि बर्फ. इथे मस्त टपोरी मक्याची चविष्ट कणसं भाजून देऊन त्यावर तिखट, मीठ चोळून, लिंबू पिळून द्यायचे. ती भाजकी कणसं खाल्ली की साऱ्या प्रवासाचा शीण एका क्षणात नाहीसा व्हायचा. ताज्या, गोड, स्वच्छ उसाच्या रसात थंडगार बर्फाचे चुरचुरीत तुकडे घालून काचेचे ग्लास समोर येताच ‘मला रस नको’ म्हणणारे देखील दोनेक ग्लास रस गटागटा आवाज करत पिऊन टाकत. प्रवासाने आखडून गेलेले पाय मोकळे करायला म्हणून सहज उतरलेले वाटसरू या झाडाखालच्य खोपटात रमून जात. खोपटातल्या गावाकडच्या माणसाशी गप्पांची देवाणघेवाण होई. ही माणसं प्रेमाची भुकेली असत. एवढ्या मोठ्या गाडीतून उतरलेला माणूस आपल्याला नावगाव पुसतो, जोडीला आपल्या खुशालीचे चार शब्द विचारतो या विचारानेच ती हरखून जात.

हा रस्ता जसा माणसांचा होता तसा जित्राबांचाही होता. सकाळच्या वेळेस रस्त्याच्या एका कडेने चरायला जाणारे गायी-म्हशींचे कळप आणि त्यामागून चालत निघालेला गुराखी हे चित्र कायम असे. ही जनावरं रस्त्याच्या मध्ये आली तर हॉर्न वाजवूनही कधी कधी उपयोग होत नसे; तर कधी कधी हॉर्नच्या एका आवाजाने एखादे अल्लड वासरू उधळून पाळायला लागे, मग त्याला आवरता आवरता त्या गुराख्याची पार आब्दा होऊन जाई. या गायी-म्हशींचे शेण साऱ्या रस्त्याने पडलेले असे. वाहनांच्या चाकांनी ते आणखी दूरपर्यंत पसरले जाई. आपल्याच नादात जाणाऱ्या बैलगाड्या आणि त्यांना जुंपलेले केविलवाणे बैल पहिले की मात्र मन दुःखी कष्टी होऊन जाई. साखर कारखाने सुरु असताना रस्त्याच्या एका कडेने बैलगाड्यांची ही लांबलचक रांग लागलेली असे. उसाच्या ढिगावर बसलेले ऊसतोड मजूर नि ते जीवघेणे ओझे घेऊन निमूटपणे शून्यात नजर लावून पुढेच चालत राहणारे बैल हळूहळू दृष्टीतून ओझर होऊन जात. संध्याकाळच्या वेळेस चरून झाल्यावर वस्तीकडे, गोठ्याकडे परतणारे जनावरांचे जत्थे पाहिले की श्रीकृष्णाचं गोकुळ आठवायचं. सूर्याची तांबूस किरणं, वासरांच्या गळ्यातल्या घंटांचा मंजुळ नाद, त्यांच्या पावलांचा आवाज आणि त्यांच्या मागून त्यांना लडिवाळपणे पुकारत जाणारा, अंगावर काळं घोंगडं पांघरलेला गुराखी असा लवाजमा हळूहळू पुढे जाई, मग वाहनं वेग घेऊन पुढं सरकत.

तेव्हा कुणाला फारशी घाई नव्हती. बहुतांश लोकांपाशी वेळ होता. एकमेकांसाठी आस्था होती. निसर्ग आणि माणूस यांच्यात एक आर्त प्रेमाचं नातं होतं. आता चारपदरी डांबरी सडक झाली आहे. सुंसुं वेगाने वाहने धावत असतात. अंगात वारे भरलेली ही वाहनं एखादा अपघात झाला तरी तशीच पुढं निघून जातात. गाडीखाली येऊन मेलेलं माणूस की जनावर आहे हे पाहण्याची तसदी देखील कुणी आता घेत नाही. रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवी वनराई याच रस्त्यापायी नष्ट झाल्यापासून हा रस्ता दीनवाण्या चेहऱ्याने उभ्या असलेल्या अनाथ मुलासारखा वाटतो आहे. आता रस्त्याच्या कडेने ती खोपटं नाहीत. आता आहेत चकचकित हॉटेल्स ज्यांना ‘हायवे’वर फक्त बक्कळ पैसा कमवायचा आहे. आता गावाकडची माणसंही तशी उरली नाहीत कारण या रस्त्यात ज्यांची जमीन गेली त्यांच्याकडे अफाट पैसा आलाय. त्यांनाही आता वेळ नाही फळं विकत बसायला.

आता आपुलकीच्या गप्पा नाहीत की ती शांत शीतल घनदाट सावली नाही की घेरदार झाडांच्या कमानी नाहीत. आता साडेतीन तासात सोलापूर- पुणे प्रवास संपन्न होतो. सगळं कसं फास्ट झालं आहे. कामं वेगाने होतात, भेटीगाठी होतात. पण या प्रवासातला प्राण हरपलाय. पूर्वी रस्ता लहान असल्याने अपघात फार होत असत; मात्र आता रुंद रस्त्यावर हे प्रमाण तितकं नाही, इतकीच काय ती समाधानाची बाब. गावाकडच्या गरीब साध्याभोळ्या माणसांची ‘फास्ट’ प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून या एक्स्प्रेस रस्त्याच्या कडेने एक ‘सर्व्हिस रोड’ आहे. याच्या एका काठाला आधीच्या जुन्या रस्त्यावरच्या झाडांची भलीमोठी कापलेली खोडं नि जखमांनी भरलेले फांद्यांचे तुकडे विव्हळत पडलेले असतात. आता हा रस्ता सर्वांचा उरला नसून तो सुसाट वेगाने केवळ आणि केवळ धावत सुटलेल्या अलिशान गाड्यांचा हायवे झाला आहे!

जुन्या रस्त्याच्या आठवणीत रममाण झालो की झाडं, पानं, फुलं, गुरांचे कळप आणि ती काळजात रुतलेली गावाकडची माणसं यांच्या आठवणीनी व्याकुळ होतो. नकळत रुमाल डोळ्याला लावतो. या रस्त्याचं माझ्यावर हे एक ऋणच आहे. या रस्त्याने गावाकडे जाताना नकळत जीव कासावीस होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Pesticide residues found in farmer's urine : धक्कादायक! तेलंगणाच्या काही शेतकऱ्यांच्या लघवीत कीटकनाशकांचे अंश?

Agriculture Department : कृषी कार्यालयाचा कारभार कुबड्यांवर

Hilsa Fish Export : बांगलादेशने हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली; भारतला ३ हजार टन मासा करणार निर्यात

Irrigation Subsidy : सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच

SCROLL FOR NEXT