Village Story : पारायण

Parayan of Bhavartha Ramayana : गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरू असले की अजूनही काही दृश्ये हमखास जशीच्या तशी नजरेस पडतातच. काही दशकांपूर्वीच्या आठवणी आजही जाग्या होतात रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गसुखच असे.
Parayan
ParayanAgrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

Devotion to the Village God : काही दशकांपूर्वी गावकुसात पारायण व्हायचं तेव्हाची स्थिती काही वेगळीच होती. गावातलं वातावरण त्या काळात संपूर्णतः भारलेलं असायचं. पारायणात प्रभू रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम, लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे यांना स्फुरण चढायचे. दशरथाकडून श्रावण बाळाला बाण लागून तो घायाळ झाल्यावर यांच्याच डोळ्याला अश्रूच्या धारा लागायच्या, तो अध्याय सुरू व्हायच्या वेळेस एखादी भाबडी म्हातारी पारायण वाचणाऱ्या प्रवचकाला सांगायची, “महाराज, तेव्हढं दशरथ राजाला बाण नीट चालवायला सांगा. आपल्या श्रावण बाळाला बाण लागून तो जखमी होईल!’’

कैकेयीला वर देताना गावातल्या आयाबाया ओठाला पदर लावून बारीक आवाजात पुटपुटायच्या, ‘‘बाईने शब्द मागितला तर त्येचा वापर नीट करावा अन् गड्याने बी अशा शिंदळकीला कशाला शब्द द्यावा गं बाई?’’

सीतेच्या जन्माची कहाणी ऐकताना बळीराजा भान हरपून जात असे, त्याला वाटायचे न जाणो आपल्या जमिनीत नांगरताना आपल्या नांगराच्या फाळाला अशीच एखादी सोनेरी पेटी थडकेल! तो त्या काळात नांगर जपूनच चालवायचा.

“जनक राजा लई भाग्यवान त्याला मातीने पोरगी दिली...” अशी चर्चा म्हातारेकोतारे तोंडात तंबाखूचा बार भरत पारावर बसून करत.

‘‘कौशल्या आणिक सुमित्रा बघा कशा भणीवाणी राहत्येत, सवती-सवती असून एक्काच घरात एका ताटात सोन्याचा घास खाऊन गुण्या गोविदाने राहत्येत, आणि तुमी जावा-जावा असून देकील कसं जल्माचं दुश्मन असल्यागत राहताव, अगं बायानू जरा सुदरा की! रामायण काय म्हणतय ध्येन दिऊन ऐका!’’

Parayan
Village Story : माउलीची कृपा

असा उपदेश गावातल्या घराघरोघरच्या सासवा आपल्या सुनांना करायच्या. त्यांना वाटायचं की कौशल्या, सुमित्रा या सवती असूनही एकाच ताटात जेवतात मग आपल्या सुना का भांडतात? त्या काळी एका एका घरात तीन ते सात-आठ सुना असायच्या त्यावरून या उपदेशकर्त्या सासूची मानसिकता लक्षात कशी होती ते कळायचे. ‘सीता स्वयंवर’ काळात गावातल्या तरण्या पोरांना उधाण आलेलं असायचं, गावातली जाणती माणसं या पोरांना म्हणायची, ‘अरे, तुमच्या काय बरगड्या मोजून घ्यायच्या का रे? जरा दूध-दुभतं खात जावा, खच्चून कुस्करून जेवत जावा. जरा पोटाला बघत जावा, थोडी तालिम लावा. नाय तर असल्या मरतुकड्याला कोण जावई करून घेणार?’’ विशेष म्हणजे हा ‘वजनदार’ सल्ला धडधाकट पोरांनाही दिला जायचा. बऱ्याच वेळा सल्ला देणारे मात्र काबाडकष्ट करून पार थकूनमाकून गेलेले अस्थिपंजर देहाचे असत.

मंथरेने कैकेयीचे कान भरायला सुरुवात केल्यावर बायांच्या तोंडाचा पट्टा चालू व्हायचा. मग कळायचं, की आपल्या गावातल्या बाया दिकून भारी श्या देत्यात. कैकेयीला दिलेला वर पूर्ण करताना सगळा गाव असा विचारमग्न वाटायचा. त्यानंतर यायचा तो रामाला वनवासाला जाण्याचा दिवस. या दिवसांत सगळीकडे अस्वस्थता दिसून येई. जाणत्यांचे कामात आणि बायकांचे स्वयंपाकात ध्यान नसे. सगळ्यांची एकमेकावर चिडचिड चाले. चिल्लर पोरांवर राग निघे.

राम वनवास जेव्हा चालू व्हायचा तेव्हा गावातली काही जाणती मंडळी आणि तरणी पोरं अंगावर पोत्याच्या तरटापासून बनवलेली कापडं घालून पायताण न घालता किंवा पायाला बारदाण्याचे तुकडे गुंडाळून गावाबाहेर जायची. ही गावकरी मंडळीही वनवासाला जायची. अगदी रामासारखीच जायची, वृत्तीही तीच आणि हेतूही तोच असायचा. यात बडेजाव आणि मिरवून घेण्याला वावच नसे. रामाला वनवासाला जावे लागले त्याचे प्रतिकात्मक प्रायश्‍चित्त म्हणून गावातील भाविक वृत्तीची साधी भोळी निरलस माणसं चौदा दिवसांच्या वनवासाला जायची. खरे तर रामाला चौदा वर्षे वनवासाला जावं लागलं म्हणून आपणही चौदा दिवस वनवासाला जायचं ही कल्पनाच अभूतपूर्व अशा सौहार्दतेची आणि सृजनशीलतेची आहे.

गावातल्या ज्या ज्या घरातली माणसं वनवासाला जायची केवळ त्याच घरातली नव्हे, तर अख्ख्या गावभरातली माणसं वेशीजवळ येऊन त्यांना निरोप द्यायची. या लवाजम्यात एक विणेकरी आणि बाकीचे सर्व टाळकरी असत. बारदान्यात निघालेला हा रामभक्तांचा जथ्था साऱ्या रस्त्याने मुखाने ‘जय जय राम कृष्ण हरी’चा घोष करत निघायचा. चौदा दिवसांच्या वनवासात वाटेनं लागणारी वाड्या वस्त्यावरली, गावातली मंडळी त्यांचे पाय धुवायची, त्यांना हारफुले अर्पण करायची. दरम्यान, इकडे गावात दशरथ राजाचा मृत्यू ऐकताना म्हातारेकोतारे कासावीस झालेले असत. नंतर मात्र ज्याच्या त्याच्या मुखात भरताचे नाव झालेले. कुणाच्या घरी जमिनीवरून, बांधावरून, झाडाझुडपांवरून, वाटणीवरून वाद सुरू असला की आजूबाजूचे पिकल्या पानाच्या गतीतले म्हातारे तिथल्या जाणत्या माणसांना सुनवायचे, ‘‘अरे, एका एकरापायी भावाच्या जिवावर उठू नगासा, बांधाला बांध लागला म्हणून जीव घ्येयाला मरू नका. भरतराजाने कसं आपलं समदं राज्य रामाच्या पादुका ठेवून केलं. जरा शिका त्येच्याकडनं.’’ त्यांचं ते सबुरीचं बोलणं ऐकून आपसांत भांडत बसणाऱ्यांची बोलती बंद होई. त्या काळी वडीलधाऱ्यांचा तितका धाक होता ही देखील एक बाजू आहे.

Parayan
Village Story : जिवलग

पारायणाचे पुढचे दिवस अगदी वेगाने जायचे. खरे तर रोज किती पानं वाचायची हे ठरलेलं असे. त्याबरहुकूमच हे वाचन होई. पण घटना वेगाने घडल्या की वाचन वेगाने झाल्यासारखे वाटे म्हणूनच या काळातलं पारायण गतिमान भासे. बघता बघता ‘लक्ष्मण-शक्ती’चा दिवस यायचा. त्या दिवसापर्यंत गाव सोडून बाहेर वनवासाला गेलेले गावकरी गावात परतायचे. वनवाशांच्या वापसीमुळे गावाला उधाण आलेलं असायचं. गावात महाप्रसादाची तयारी शिगेला गेलेली असे. कोणी गहू देई, तर कुणी गूळ तर कुणी जळण तर कुणी रोकड देई. बघता बघता स्वयंपाकाचा घमघमाट वाऱ्यावरून गावातल्या प्रत्येक गल्लीत पोहोचता होई. एक मोठी काहिली भरून खीर केलेली असायची. सगळ्या गावाला जेवण असायचं. हे खरं गावजेवण असे, कारण त्या दिवशी कुणाच्याच घरी चूल पेटलेली नसे. त्या रात्री गाव अखंड जागा असायचा. घायाळ झालेल्या लक्ष्मणाला बरं करण्यासाठी मारुतीराया संजीवनी वनस्पती आणण्यासाठी समुद्रापार निघायचा पण नेमकी वनस्पती न कळल्याने तो द्रोणागिरीचा अख्खा पर्वतच उचलून आणायचा हे ऐकताना अंगावर रोमांच यायचे. बारकाली पोरं तर आनंदाने उड्या मारायची. ‘बजरंगबली की जय’चा घोष अधून मधून होत राहायचा. रामायणाच्या ओघात दिवस असेच जात राहायचे. लंकाधिपती दशानन रावणाचा वध करून राम अयोध्येत परत आले, की गावाला पुन्हा नवा हुरूप यायचा. सीतामाई अयोध्या सोडून जाताना बायका हुंदके देऊन रडायच्या आणि डोळे पुसत पुसत एकमेकींना म्हणायच्या, “बाईच्या जल्माचा वनवास कधीच संपत नाही गं बायानो! जल्माचे भोग आहेत हे समदे, ते आपल्यालाबी भोगलेच पाहिजेत!"

पुढे लव-कुशाची कहाणी ऐकताना लेकुरवाळ्या बायका हरखून जायच्या. “आपल्या गावात बी कंदीतरी वाल्मीकीरुषि यिल. पर पोरांनू तुमी अब्यास नीट मन लावून करा” हे बोल ऐकताना खरंच वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात शिकत असल्यागत वाटायचं. लव, कुश अयोध्येत परतले की लोक खुश व्हायचे. आता सगळं सुखात होणार असं नेहमी वाटायचं पण सीतामाई जमिनीत परत जाताना ऐकताना अख्ख्या गावाच्या जिवाला हुरहूर लागायची. बायका तर हुंदके हमसून हमसून रडायच्या. काहींना तर सांगावं लागायचं, की “आता बस्स, पुरं करा बायांनो. न्हाईतर वाचायचंच थांबतंय बघा. पारायण अर्ध झालं तर गावाचं नाव वंगाळ हुईल. तवा गुमान बसा.” मग त्या भोळ्याभाबड्या बायका मुकाट बसायच्या.

पारायण संपूर्ण झाल्यावर गावातलं वातावरण खूप उदास वाटायचं. देवळाजवळून जाताना तर आपले काही तरी हरवलं आहे असा भास व्हायचा. गावात रोज सकाळी निघणारी रामटाळी बंद झाल्यावर तर सकाळी सकाळी अवसान गेल्यासारखं वाटायचं. दिवस असेच वेगाने निघून जायचे पण देवळाच्या पांढऱ्या भिंतीवरची काळ्या रंगातली ओबडधोबड अक्षरे डोक्यात घर करून असत. मूळच्या ठळक रंगातली ती सूचना पुढे जाऊन ऊनपावसाने वाऱ्यावावदानाने फिकट होऊन गेलेली असे. मात्र स्मृतीच्या मोहोळातले रामायणाचे मधुबिंदू त्यांना पाहताच तरतरीत होत असत. देवळाच्या भिंतीवर लिहिलेलं असे, की ‘गावात भावार्थ रामायण चालू आहे, वेशीजवळ आणि देवळाजवळ पायात वाहणा घालू नयेत. जय श्रीराम!’

आज जरी अशी सूचना कुठल्याही गावातल्या देवळातल्या भिंतीवर वाचायला मिळाली, की हवाहवासा वाटणारा स्मृतींचा कल्लोळ मनात होतो, ज्यात आपण नखशिखांत चिंब भिजून जातो. रामायण हा गावाकडच्या माणसांचा जगण्याचा आधार होता आणि आहे, म्हणूनच ग्रामीण भागातली कौटुंबिक आणि सामाजिक जडणघडण अजूनपर्यंत टिकून आहे असे आजही वाटते. खेड्यांनी होणारी रामायणाची पारायणं हा धार्मिक वा श्रद्धेचा घटक नसून गावजीवनाच्या सामाजिक विणेचा अविभाज्य घटक आहे; ज्याने अनेक गावं नि तिथली माणसं समृद्ध झालीत. हे जपलं पाहिजे नि याचं अस्सल स्वरूपच जतन केलं पाहिजे.

समीर गायकवाड, ८३८०९७३९७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com