Turmeric Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Crop Management : सद्यःस्थितीतील हळद पिकाचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. मनोज माळी, प्रतापसिंह पाटील

Turmeric Farming : हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरू झालेली असते. या अवस्थेत हळकुंडाची जाडी आणि वजन वाढण्यास मदत होत असते. जे काही नव्याने फुटवे आले असतात, त्या फुटव्यांपासून आलेले हळकुंड भरण्याचा हा कालावधी असतो.

या वेळी वातावरणातील तापमानात घट होत असते. या वेळी वातावरणात साधारणत: १८ ते २० अंश सेल्सिअस असते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेतून पानात तयार झालेले अन्न खोडाद्वारे हळकुंडापर्यंत पोहोचत असते. अशावेळी पाने निरोगी राहणे गरजेचे असते. योग्य वाढीसाठी आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत.

आंतरमशागतीच्या कामांमध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. तापमान फारच कमी झाले तर विविध कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी, गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर परिणाम होत असतो.

पिकाची भरणी

हळद पिकाला मातीची भर लावलेली नसेल तर फुटव्यांपासून नव्याने आलेले हळकुंड उघडे राहतात. हळकुंड सूर्यप्रकाशात सन्निध्यात आल्यास ते हिरवे पडतात आणि वाढ खुंटते. तसेच कंदमाशी उघड्या राहिलले हळकुंडावर किंवा गड्यावर अंडी घालते. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रसार होतो. हे लक्षात घेऊन मजूर किंवा भरणी यंत्राच्या साह्याने तत्काळ मातीची भर लावून हळकुंड संपूर्णपणे झाकून घ्यावे. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होते.

हळदीच्या दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या

जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या

कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना

लावावी. भरणी केल्यामुळे नवीन येणारे

हळकुंड झाकले जाते, त्यांची चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये जवळजवळ १० ते १५ टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून आली आहे.

गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोनगादीवाफ्यांमधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी, यामुळे मजुरांच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास भरणी करताना ड्रीपर मातीखाली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

खतांचे व्यवस्थापन

शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळद पिकास कोणतेही नत्रयुक्त रासायनिक खत जसे की युरिया इत्यादी देवू नये. युरिया सारखी खते दिली तर त्यामुळे हळदीची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी, पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते.

ज्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल त्या ठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.

पाणी व्यवस्थापन

जमिनीत पाणी साठून राहिल्यास मुळांना हवा घेण्यास अडथळा उद्‍भवतो. परिणामी, हळदीची पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होताना दिसतात. जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी देण्याचे नियोजन करावे. पिकास पाटपाणी दिल्यास पर्ण उत्सर्जन क्रियेद्वारे पाण्याचा ऱ्हास होतो.

रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. मुळांपाशी वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो, सूक्ष्मजीवांच्या क्रिया सुधारतात, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारणक्षमता वाढते आणि त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढते, परिणामी अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होते. मुळाद्वारे शोषण अधिक होते. पाने लवकर मोठी होतात. उत्पादन आणि कुरकुमीनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

दोन लॅटरलमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. त्यामुळे सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजण्याची शक्यता असते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्याने १० ते १५ टक्के उत्पादन जास्त मिळते.

मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखावे. केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होईल, त्यामुळे मुळांच्या वाढीला वाव मिळणार नाही. जमिनीत पाणी जास्त झाले, तर जरुरीहून जास्त ओलेपणा होईल. परिणामी, कंद कुजण्याचे प्रमाण वाढेल. ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असते अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.

हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात. शिफारशीत मात्रेपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी पडले तर कंदांची योग्य वाढ होत नाही, प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते परिणामी विक्री करताना दर कमी मिळतो. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी देत राहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.

तण नियंत्रण

पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्याने तणांचे बी शेतात येते. अवकाळी पाऊस पडला असल्यास मोठ्या प्रमाणात तणांचे बी उगवून येत असते. या तणांचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे असते. तणांच्या तीव्रतेनुसार मजुरांच्या साह्याने निंदणी करून घ्यावी. जर तणनाशकाची फवारणी केली तर पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.

फुलांचे दांडे न काढणे

शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे शाकीय वाढीचा कालावधी संपून कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे.

फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक आहे. हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट येत नाही. फुलांचे दांडे न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी ते येत राहतात. फुले काढताना जर खोडाला इजा झाली, तर त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होऊन कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे आलेली फुले तशीच राहू द्यावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT