Akola News : हळदीला या हंगामात मिळत असलेला चांगला दर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी तसेच नवीन हळद यायला लागणारा वर्षभराचा कालावधी पाहता या हंगामात हळद लागवड किमान २५ टक्के वाढेल, असे शेतकरी तसेच या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. पश्चिम विदर्भात वाशीम जिल्हा हळद उत्पादनात अग्रेसर मानला जातो. अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही हळदीची लागवड केली जाते.
मागील काही वर्षे दर न मिळाल्याने अनेकांनी हळदीची लागवड थांबवली होती. मात्र सध्या सुरू असलेली तेजी व इतर पिकांचे कमी होत असलेले उत्पादन लक्षात घेता पुन्हा हळद लागवडीकडे कल दिसू लागला आहे. सध्या हळद बेण्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या भागात सेलम, पीडीकेव्ही वायगाव या वाणांची लागवड केली जाते.
सर्वाधिक सेलम हा वाण पेरणी होत असतो. वाशीम जिल्ह्यात रिसोड, मालेगाव, वाशीम, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा या तालुक्यांमध्ये हळदीची लागवड होत असते. त्यातही रिसोड, मालेगाव हे तालुके लागवडीत अग्रस्थानी आहेत.
शिरपूरजैन सारख्या गावात सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी हळदीची लागवड करीत असतो. या एकाच परिसरात दोन ते अडीच हजार हेक्टरपर्यंत लागवडीचे क्षेत्र असते. या हंगामातील लागवड साधारणपणे २५ मे पासून सुरू होत आहे. यासाठी जमिनीची मशागत, बेण्याची प्रतवारी, बीजप्रक्रिया अशी कामे टप्प्याटप्प्याने सुरू झालेली आहेत. लवकरच बेड पाडण्याचे काम सुरू होणार आहे.
पाण्याचा प्रश्न भेडसावतो
मे महिन्यात हळद लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता हा प्रमुख प्रश्न आहे. मागील काही वर्षांत पाणी उपलब्धता कमी झाल्याने आता बरेच शेतकरी दमदार पाऊस झाल्यानंतरच हळद लागवड करीत असतात. यावर्षातही पाणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी जूनमध्येच लागवडीचे नियोजन चालवले आहे. सिंचनाची सोय असलेल्यांनी मे अखेर पेरणीचा मुहूर्त साधण्याची दुसरीकडे तयारी सुरू केली आहे. यादृष्टीने शेतीतील कामे वाढली आहेत.
हळद लागवड वाढीची कारणे
बाजारपेठेत १५ हजारांवर मिळत असलेला दर.
नवीन हळद यायला जवळपास वर्षभराचा विलंब.
दरातील तेजी टिकून राहण्याची अपेक्षा.
पारंपरिक पिकांच्या तुलनेत परवडणारे पीक.
बाजारपेठेत दर मिळत असल्याने हळद लागवडीत किमान २५ टक्के क्षेत्रवाढ आमच्या भागात या वर्षी दिसते आहे. सध्या बेणे ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दराने विकते आहे. हळद कांडी एकरी ९ क्विंटलपर्यंत तर गट्टू यापेक्षा दीड पट बेणे म्हणून वापरले जाते. पाण्याची सोय असलेले शेतकरी २५ मेनंतर पेरणीला सुरुवात करणार आहेत.डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम
दरांमधील तेजी, पारंपरिक पिकांच्या तुलनेत परवडत असलेले पीक, अशा कारणांमुळे हळदीची या वर्षी निश्चितच लागवड वाढेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरही दरात तेजी दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आहे तेथे ते शेतकरी जूनमध्ये पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करतील. लागवडीला हा थोडा उशीर दिसत असला तरी फारसा फरक पडणार नाही.प्रा. डॉ. विजय काळे, उद्यानविद्या विभाग, पंदेकृवि, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.