Sugarcane Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Disease : ऊस पिकातील खोडकीड, चाबूक काणी रोग नियंत्रण

Team Agrowon

रवींद्र पालकर, डॉ. गणेश कोटगिरे, डॉ. अभयकुमार बागडे

Sugarcane Management : खोड कीड (अर्ली शूट बोरर)

ओळख

किडीच्या प्रौढ पतंगाचे पुढील पंख २५ ते ३० मि.मी. लांबीचे व फिक्कट राखाडी तपकिरी रंगाचे असतात. किनारीला काळे ठिपके असतात. मागील पंख पांढरे असतात.
पूर्ण वाढ झालेली अळी दंडगोलाकार, २० ते २५ मि.मी. लांब व हलक्या राखाडी पांढऱ्या रंगाची असते. तिचे डोके गडद तपकिरी काळसर असते.

कोष हा हलका ते गडद तपकिरी रंगाचा असतो. मादी कोष हा आकाराने नर कोषापेक्षा किंचित मोठा असतो.

नुकसानीचे स्वरूप :

किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण झाल्यानंतर ३ आठवड्यांपर्यंत ते ३ महिन्यांपर्यंत दिसून येतो.

अंड्यातून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पाने खाते. त्यानंतर खोडामध्ये शिरून खालच्या दिशेने खोड पोखरते. तर काही वेळेस जमिनीच्या पृष्ठभागाच्या बाजूने छिद्र पाडून खोड पोखरते. त्यामुळे उगवणारा पोंगा १२ ते १८ दिवसांत सुकून जातो. त्यास डेडहार्ट, पोंगा मर किंवा गाभे मर असेही म्हणतात. हा पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो. त्याचा उग्र वास येतो.

खोडकीड मातृकोंब देखील खाऊन नष्ट करते. त्यामुळे उसाला फुटवे कमी फुटतात.

या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात सुमारे ३३ टक्के आणि साखर उताऱ्यात १ ते १.५ टक्का घट येते.

सद्यःस्थितीत प्रादुर्भावाची कारणे :

उशिरा झालेली ऊस लागवड.
वाढलेले तापमान किडीच्या वाढीस अनुकूल.
पिकाला पाण्याची कमतरता भासल्यास अधिक प्रादुर्भाव.
खोडवा पीक पद्धतीमध्ये आणि उसाची लागवड अरुंद ओळीत (९० सें.मी. किंवा त्यापेक्षा कमी) केल्यामुळे जास्त प्रादुर्भाव आढळतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

हलक्या जमिनीत ऊस लागवड टाळावी.

जमिनीची दुपारच्या वेळी खोल नांगरणी करावी. जेणेकरून सुप्तावास्थेतील किडीच्या अवस्था उघड्या पडतील आणि पक्ष्यांमुळे नष्ट होतील.

सुरु उसाची लागवड शिफारशीत वेळेतच पूर्ण करावी. उशिरा लागवड केल्यास प्रादुर्भाव वाढतो.

अति प्रादुर्भावग्रस्त खोडवा पीक घेणे टाळावे.

लागवडीसाठी कीडविरहित बेण्याची तसेच प्रतिरोधक किंवा सहनशील वाणांची निवड करावी.

सुरू उसाची लागवड २० सेंमी खोल सरीत केल्याने खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.

उन्हाळ्यामध्ये जमिनीचे तापमान कमी करण्यासाठी, आर्द्रता वाढवण्यासाठी व पुरेसा ओलावा टिकून ठेवण्यासाठी दोन सिंचनामधील अंतर कमी ठेवावे.

लागवडीनंतर ३ दिवसांनी १० ते १५ सेंमी जाडीचे पाचटाचे आच्छादन करावे.

लागवडीनंतर ४५ दिवसांनी मातीची भर दिल्यास खोडकिडीचा
प्रादुर्भाव कमी होतो.

प्रादुर्भावग्रस्त पोंगे वेचून अळीसहित नष्ट करावेत. जमिनीलगत खालची २ ते ३ पाने काढून अंड्यासह नष्ट करावीत.

प्रौढ खोडकीड सर्वेक्षणासाठी हेक्टरी १० कामगंध सापळे उभारावेत. त्यातील (ई.एस.बी. ल्युर) ३० दिवसांनी बदलावा.

अंडी परोपजीवी ट्रायकोग्रामा चिलोनिस कीटक फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी ४ प्रमाणे १० दिवसांच्या अंतराने ५ वेळा लावावेत.

स्टर्मिओप्सिस या परजीवी कीटकांच्या प्रति एकरी १२५ गर्भवती मादी किडी सोडाव्यात.

रासायनिक नियंत्रण :

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक फवारणीचे नियोजन करावे.
आर्थिक नुकसान पातळी : १५ टक्के पोंगा मर

कीटकनाशक---प्रमाण (प्रतिलिटर पाणी)
क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५० टक्के एससी)---०.३७५ मिलि
फिप्रोनील (५ टक्के एससी)---३ ते ४ मिलि
मेथोक्सिफेनोझाइड (२१.८ टक्के ईसी)---१ ते १.२५ मिलि
फ्लुबेन्डायअमाइड (२० टक्के डब्ल्यूडीजी)---०.५ ते ०.७५ ग्रॅम
बायफेन्थ्रिन (८ टक्के) अधिक क्लोथियानिडिन (१० टक्के एससी) संयुक्त कीटकनाशक---१ ग्रॅम
थायामेथोक्झाम (७५ टक्के एसजी)---०.१६ ते ०.३२ ग्रॅम
क्लोरपायरिफॉस (२० टक्के ईसी)---१.५ ते २.५ मिलि
(सर्व कीटकनाशके लेबलक्लेम युक्त आहेत)

चाबूक काणी किंवा काजळी

पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होतो. लागण ऊसापेक्षा खोडवा उसात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

या रोगामुळे लागवडीच्या पिकामध्ये २९ टक्के; तर खोडवा पिकात ७० टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनामध्ये नुकसान होते.

रोगाची लक्षणे :
रोगग्रस्त उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता होत गेलेला १ ते १.५ मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो. तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू.

साधारणतः १० ते १२ सें.मी. लांब पट्ट्यात ५० ते ५५ कोटी बीजाणू असतात. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. हे बीजाणू निरोगी उसावर पडल्यामुळे रोगाचा प्रसार होतो.

रोगट बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात. पाने अरुंद व आखूड राहतात. कधी कधी बेटात जास्त फुटवेदेखील आढळतात.

उभ्या उसास रोगाची लागण झाल्यास काणीयुक्त पांगशा फुटतात. कालांतराने रोगट बेटे व ऊस वाळून जातात. त्यामुळे ऊस उत्पादनावर व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो.

प्रसार :

मुख्यत्वे प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तर दुय्यम प्रसार, हवा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत पसरतो.

रोग नियंत्रण :

रोगग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये. निरोगी बेणे वापरावे. रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.

पिकाची फेरपालट करावी.

लागवडीच्या उसात प्रादुर्भाव ५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये. खोडवा पिकाची मशागतीची कामे वेळेत करावीत.

ऊस बेण्यास लागवडीपूर्वी बाष्प उष्ण हवा प्रक्रिया सयंत्राद्वारे ५४ अंश सेल्सिअस तापमानात १५० मिनिटे प्रक्रिया करावी. त्यानंतर लागणीपूर्वी बेण्यास कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात प्रक्रिया करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

शेतात काणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा. नंतर संपूर्ण बेट मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे.

डॉ. गणेश कोटगिरे, ८७८८१५३३३२
रवींद्र पालकर, ८८८८४०६५२२
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT