Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Sugarcane Farming : सध्या बहुतांश कारखान्यांचा हंगाम संपलेला असून, ऊस तोडणी पूर्ण झालेली आहे. अनेक शेतकरी खोडवा ठेवत असतात. मात्र खोडवा उसाचे उत्पादन फारच कमी मिळत असल्याने अनेकांची तक्रार असते.
Sugarcane
SugarcaneAgrowon

डॉ. विशाल गमे, स्मिता प्रचंड, डॉ. धीरज निकम

Sugarcane Farming Management : सध्या बहुतांश कारखान्यांचा हंगाम संपलेला असून, ऊस तोडणी पूर्ण झालेली आहे. अनेक शेतकरी खोडवा ठेवत असतात. मात्र खोडवा उसाचे उत्पादन फारच कमी मिळत असल्याने अनेकांची तक्रार असते. अर्थात, त्यामागे लागवडीच्या उसाप्रमाणे खोडव्याचे व्यवस्थापन न करणे हेच मुख्य कारण दिसून येते. उलट खोडवा उसासाठी पूर्वमशागतीची आवश्यकता नसते. तसेच बेणे खर्चाची बचत होते. पहिल्या पिकाची मुळे तयार असल्यामुळे वाढ झपाट्याने होते. पक्वता लवकर मिळते, असे काही फायदे दिसून येतात.

खोडवा राखण्याची योग्य वेळ :

साधारण लागवडीच्या उसाची तोडणी सप्टेंबर-ऑक्टोबरपासून तर मार्च-एप्रिलपर्यंत केली जाते. त्यानंतर त्याचा खोडवा ठेवला जातो. परंतु लवकर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक फायदा मिळतो. उशिरा तुटलेल्या उसाला जास्त तापमानामुळे योग्य फुटवे फुटत नाही तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.

Sugarcane
Sugarcane Management : उसाची बाळबांधणी का करावी? बाळबांधणीचे फायदे

जातींची निवड :

पाण्याचा ताण सहन करणाऱ्या ऊस वाणांचा खोडवा ठेवावा. जास्त फुटवे येण्याची व लवकर पक्व होण्याची क्षमता असलेले वाण निवडावे. त्यामध्ये लवकर पक्व होणाऱ्या कोसी-६७१, को-९४०१२, को-८०१४, व्ही.एस.आय.-४३४ आणि मध्यम पक्वता कालावधी असणाऱ्या कोएम -८८१२१, को-८६०३२, फुले-२६५, व्ही.एस.आय. -९८०५ या जातींचा खोडवा चांगला येतो.

खोडव्यातील मशागत व पाचट व्यवस्थापन :

जिथे खोडवा ठेवणार आहोत, ती जमीन सुपीक व पाण्याचा निचरा होणारी असावी.
आधीच्या उसाची जमिनीलगत तोडणी करावी. त्यासाठी बुडखे मोकळे करून पाचट सरीत लोटावे. वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत. छाटलेल्या बुडख्यावर कार्बन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

वरंब्याच्या दोनही बगला हलक्या नांगराने फोडून घ्याव्यात. त्यामुळे जुनी मुळे तुटून नवीन कार्यक्षम मुळे वाढून खोलवर वाढतात.

एकरी ३०-३२ किलो युरिया व ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. त्यानंतर ४-५ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन ओलसर माती किंवा शेणखतामध्ये मिसळून पाचटावर समप्रमाणात विस्कटून टाकावे. पाचट चांगल्या प्रकारे कुजण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाश आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची गरज असते. त्यानंतर खोडव्याला पाणी द्यावे.

पाचट असल्यामुळे सुरुवातीचे पाणी देण्यास थोडे कठीण जाते. पण संपूर्ण जागेवर पाणी कसे पोहोचेल याकडे लक्ष द्यावे. पाचटाचे प्रमाण जास्त असल्यास जमीन ओली असतानाच ते पाचट पायाने दाबून द्यावे. पाचटाशी मातीचा संपर्क आल्यानंतर पाचट कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.

एका एकरातील पाचटापासून साधारण २० किलो नत्र, १० किलो स्फुरद, ४० किलो पालाश व दीड ते दोन टन सेंद्रिय कर्ब जमिनीस उपलब्ध होतो. त्यामुळे शेतातील सर्व पाचट जाळण्याऐवजी जमिनीवर सम प्रमाणात पसरून द्यावे. पाचटाचे आच्छादन तयार झाल्यानंतर जमिनीतून बाष्पीभवन कमी होते. तणांचीही फारशी वाढ होत नाही. जमीन वाफसा अवस्थेत राहण्यास मदत होते.

खोडव्यातील खत व्यवस्थापन :

खोडवा उसाची अन्नद्रव्याची गरज सुरू उसासारखीच असते. ही मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्यावी. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत एकरी ५० किलो नत्र, स्फुरद २३ ते २५ किलो, पालाश २३ ते २५ किलो या प्रमाणे द्यावा. त्यानंतर साधारण १३० दिवसांनी तेवढीच खत मात्रा द्यावी. ही खते पहारीच्या साह्याने मुळांच्या सान्निध्यात द्यावीत.

खोडवा पिकास सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट आणि ४ किलो मॅंगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावीत. त्याचबरोबर खोडव्यामध्ये असलेले पाचट कुजून, त्यातील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्ये उसाला उपलब्ध होत जातात. या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीची जलधारण शक्ती वाढते. जमिनीचे इतर भौतिक गुणधर्म सुधारतात. उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.

Sugarcane
Sugarcane Management : उसातील खोडवा, पाचट व्यवस्थापनावर कार्यशाळा

पाणी व्यवस्थापन :

खोडवा उसासाठी २२५ ते २५० हेक्टर सेंमी पाण्याची गरज असते. साधारण कमीत कमी २० ते २२ पाणी पाळ्या असल्या, तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळू शकते. पाण्याची उपलब्धता असल्यास गरजेनुसार दर १५ दिवसांनी पाणी द्यावे. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे पाण्याचा थोडाफार तुटवडा पडला तरी उसाचे पीक चांगले तग धरू शकते.

आंतरमशागत :
खोडवा उसाला विशेष आंतरमशागत करण्याची आवश्यकता नाही. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे खाते पहारीच्या साह्याने दिल्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. थोड्याफार प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव असल्यास ते गवत उपटून पाचटावर टाकावे.

तोडणी व त्यानंतरचे नियोजन :

नवीन लागवड केलेल्या उसापेक्षा खोडवा ऊस लवकर म्हणजेच ११ ते १२ महिन्यांत पक्व होतो. या वयात उसाची तोडणी केल्यास साखरेचा उतारा चांगला मिळतो. खोडवा उसाची तोडणी झाल्यावर ऊस काढून टाकावयाचा असला तरी शेतातील पाचट जाळू नये किंवा बाहेर काढू नये. पाचट चांगले वाळल्यानंतर तिथेच कुट्टी यंत्राच्या साह्याने पाचटाची कुट्टी करावी. उसाची मुळे किंवा बुडखे बारीक करण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.

पाचट कुजण्यासाठी युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट तसेच पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा. पलटी नांगराच्या साह्याने पाचट जमिनीत मातीआड करून घ्यावे. त्यानंतर पाणी दिल्यास पाचट चांगल्या प्रकारे कुजते.
अशा प्रकारे खोडव्याचे योग्य प्रकारे नियोजन केले तर खोडव्यापासून भरघोस उत्पादन मिळू शकते. तसेच जमिनीची सुपीकताही टिकवली जाते.

डॉ. विशाल गमे, ९४०३९२९६१७
(सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, मराठा विद्या प्रसारक समाज, क. दु. सि. पा. कृषी महाविद्यालय, नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com